(प्रतिकात्मक छायाचित्र) |
कोल्हापूर, दि.
२८ जुलै: योगशास्त्राचे
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या योगप्रेमी, जिज्ञासूंसह योग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी
विद्यापीठातर्फे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून एम.
ए. (योगशास्त्र) हा द्वैवार्षिक
पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती विद्यापीठाचे आजीवन अध्ययन
व विस्तार विभागाचे संचालक डॉ रामचंद्र पवार
यांनी आज येथे दिली.
विद्यापीठाच्या आजीवन
अध्ययन आणि विस्तार अधिविभागामार्फत योगशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
सुरू करण्याच्या प्रस्तावाला अधिकार मंडळांची मान्यता प्राप्त झाली आहे. योग क्षेत्रामध्ये व्यावसायिक कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
पदवीनंतर लगेचच हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. शिवाजी विद्यापीठात
प्रथमच अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ कॅम्पसमध्ये उपलब्ध केला
जात आहे.
अभ्यासक्रमात काय?
एम.ए.
योगशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात शरीरशास्त्र, शरीर क्रिया विज्ञान, विविध प्राचीन आणि आधुनिक योग ग्रंथातील
हठयोग, शास्त्रीय योग, निसर्गोपचार,
आयुर्वेदाचे सिद्धांत, योग तत्त्वज्ञान,
पूरक चिकित्सा पद्धती, मानसशास्त्र, व्यक्तिमत्व विकास, इत्यादी गोष्टींसह सर्वसमावेशक अभ्यासक्रम
आहे.
यासाठी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ.
महादेव
देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. मेघा गुळवणी आणि डॉ. सरिता ठकार यांचे मार्गदर्शन लाभले
असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.
संधी कुठे?
या
अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या पदवीधरांना पुढे युजीसी नेट, पीएचडी करून सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक होता येते.
याशिवाय सरकारी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र
या ठिकाणी योग प्रशिक्षक, योग चिकित्सक इत्यादी संधी आहेत.
अनेक नामांकित खाजगी हॉस्पिटल्समध्ये सुद्धा योगथेरपिस्ट म्हणून संधी
आहेत. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, योग संस्था, हॉटेल्स,
स्पा, जिम (व्यायाम शाळा)
या ठिकाणीही रोजगाराच्या संधी आहेत.
भारत सरकारने योग
आणि तत्सम भारतीय चिकित्सा पद्धतींच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष मंत्रालयाची स्थापना
केली आहे. अनेक ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालये, विद्यापीठे
या ठिकाणी योगविषयक शिक्षण आणि संशोधनाचे कार्य सुरू आहे. सरकारी
आस्थापना, विविध मंत्रालयीन विभाग येथेही उच्चशिक्षित योगशिक्षकांची
आवश्यकता भासत आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर योगशास्त्राचे उच्च शिक्षण उपलब्ध व्हावे
आणि त्यातून योग क्षेत्रातील विविध रोजगारांसाठी मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, या
हेतूने विद्यापीठाने योगशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. या पदवीनंतर
सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, योगचिकित्सक
अशा विविध रोजगार संधी उपलब्ध होतील. स्वयंरोजगारासाठी सुद्धा हे शिक्षण महत्त्वाचे
ठरेल.
योग क्षेत्रात अनेक
नवनवीन योग संस्था विकसित होत आहेत. तेथेही योग प्रशिक्षकांची मागणी वाढली आहे. तरुणाई हा व्यवसाय म्हणून स्वीकारून स्वतःला तयार करीत आहे. विविध देशांमध्ये भारतीय योग प्रशिक्षकांची मागणी वाढत आहे. जगात नोकरी-रोजगाराची नवीन बाजारपेठ योगामुळे तयार झाली
आहे. या सगळ्यात भारतीय लोकांना प्राधान्याने मागणी आहे. युनेस्कोनेही
भारतातील योगाभ्यासाला मानवी संस्कृतीचा अमर वारसा, म्हणून मान्यता दिली आहे.
जागतिक संस्था, शाळा, महाविद्यालय
योग प्रशिक्षणाचा भाग होत आहेत. भारतातही अनेक राज्यांनी शालेय,
महाविद्यालयीन योगाभ्यासाला शैक्षणिक उपक्रमाचा अविभाज्य घटक बनविले
आहे.
योगाचे महत्त्व:
सध्याच्या स्थितीमध्ये
योगमध्ये अनेक वैश्विक, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय समस्यांवर
उत्तर दडलेले आहे. योगाच्या बाजारपेठेचे आकारमान लक्षात घेण्याचा
प्रयत्न केल्यास लक्षात येईल की, योग क्षेत्रामध्ये नवनवीन रोजगाराच्या
अनेक संधी असून त्यामध्ये वेगाने वाढ होत आहे. “हिल इन इंडिया”
आणि “हिल बाय इंडिया” या
दोन्ही उपक्रमांमध्ये योग केंद्रस्थानी आहे. अशावेळी योग फक्त
व्यक्तीच्या जीवनातच नाही, तर राष्ट्रीय आणि वैश्विक स्तरावर
परिवर्तन घडवून आणण्यासाठी सक्षम आहे.
भारतात योग क्षेत्रामधील वाढती बाजारपेठ
भारतात योगाविषयी किरकोळ तंदुरुस्ती सेवा बाजार २.६ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा आहे. योग क्षेत्राची एकूण बाजारपेठ ८० अब्ज डॉलर्सची आहे. योग क्षेत्राशी संबंधित उपकरणांची बाजारपेठ कोविड-१९ दरम्यान १५४ टक्क्यांनी वाढली. परदेशातील विद्यापीठांमध्ये सुद्धा योग विभाग आणि योग संबंधित पदवीचे शिक्षण दिले जात आहे. गेल्या काही वर्षापासून योग शाळा, योग थेरपी सेंटर यामध्ये वाढ होत आहे. सन २०२२ ते २०३० दरम्यान ५.८ टक्के वार्षिक वाढीचा अंदाज आहे. (स्रोत - https://www.grandviewresearch.com)
No comments:
Post a Comment