Monday 26 March 2018

सेवाभाव, सत्यकथन, पारदर्शकता ही गांधीजींच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये: अरुण खोरे

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना श्री. अरुण खोरे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. शिवाजी जाधव, ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक आणि डॉ. भारती पाटील.


महात्मा गांधी यांच्या पत्रकारितेविषयी राष्ट्रीय चर्चासत्राचे विद्यापीठात उद्घाटन
कोल्हापूर, दि. २६ मार्च: सेवाभाव, सत्यकथन आणि पारदर्शकता ही महात्मा गांधी यांच्या पत्रकारितेची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. आजच्या काळात गांधींच्या मूल्याधिष्ठित पत्रकारितेची प्रस्तुतता अधिकच अधोरेखित झालेली आहे, असे प्रतिपादन गांधी-विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक अरुण खोरे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने महात्मा गांधी यांची पत्रकारिता आणि तिची प्रस्तुतता या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी बीजभाषण करताना श्री. खोरे बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक होते.
Arun Khore
श्री. खोरे म्हणाले, बौद्धिक प्रामाणिकता आणि विचारांची स्पष्टता यामुळे महात्मा गांधी यांची पत्रकारिता तत्कालीन परिस्थितीत झळाळून पुढे आली. लंडन टाइम्स, डेली मेल आदी दक्षिण आफ्रिकेबाहेरील देशांमधील वृत्तपत्रांना पत्रे पाठवून त्यांनी आफ्रिकेमधील लढा जगभर पोहोचविला. जनमानसाला शिक्षित करण्याचे ध्येय उराशी बाळगून त्यांनी पत्रकारितेचे व्रत हाती घेतले होते. राष्ट्रभावनेने प्रेरित निर्भय समाजमन घडविण्याकडे त्यांच्या समग्र पत्रकारितेचा कल होता. गांधीजी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूचे होते; मात्र, हाती आलेल्या सत्तेचा दुरुपयोग करणे मात्र चुकीचे आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते.
श्री. खोरे पुढे म्हणाले, ग्रामस्वराज्य आणि ग्रामस्वच्छता या बाबींना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्राधान्याने देशासमोर आणताना ग्रामीण भारताचे प्रश्न ऐरणीवर आणून ते प्रश्न सोडविण्यासाठी कृतीशील कार्यक्रम देण्यातही गांधींची पत्रकारिता आघाडीवर होती. देश आत्मनिर्भर होण्यासाठी ग्रामीण भारत स्वंयपूर्ण व स्वावलंबी झाला पाहिजे, यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी त्यांनी हरिजन वृत्तपत्राच्या माध्यमातून अस्पृश्यता निवारणाचे महत्त्वाचे कार्य हाती घेतले. मात्र, गांधीजींच्या या कार्याकडे त्यांच्या समकालीनांनी मात्र म्हणावे तितके लक्ष दिले नाही, याची खंत वाटते.
संपादकाची बांधिलकी ही मालक किंवा संस्थेशी नव्हे, तर वाचकाशी असली पाहिजे, असे सांगणाऱ्या गांधीजींची पत्रकारितेची मूलतत्त्वे आजच्या भोवतालात अप्रस्तुत ठरतात की काय, अशी भीती निर्माण झाल्याचे मतही श्री. खोरे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात विजय नाईक म्हणाले की, गांधीजी हे विसाव्या शतकातील एक महान संज्ञापक होते. दक्षिण आफ्रिका असो अगर भारत, या दोन्ही देशांतील सर्वसामान्य, शोषित नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी त्यांनी आपली पत्रकारिता पणाला लावली. जे आजच्या पत्रकारितेच्या सद्यस्थितीची चिंता करतात, त्यांच्यासाठी गांधींची पत्रकारितेचे मूल्य मोठे आहे; मात्र, ज्याचे त्यांना मोल नाही, त्यांच्यासाठी गांधी अप्रस्तुत ठरतील, ही मात्र चिंतेची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, दशरथ पारेकर, प्रा. मीना देशपांडे, डॉ. चैत्रा रेडकर, डॉ. राजन गवस, डॉ. नंदा पारेकर, डॉ. अवनिश पाटील, डॉ. व्यंकाप्पा भोसले, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे आदींसह संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday 17 March 2018

संशोधनाच्या क्षेत्रात अकृषी राज्य विद्यापीठांत

शिवाजी विद्यापीठ देशात अग्रस्थानी




मटेरियल सायन्समधील संशोधनातील राष्ट्रीय आघाडी कायम;
भौतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रिकी संशोधनातही प्रथम

कोल्हापूर, दि. १७ मार्च: शिवाजी विद्यापीठाने संशोधनाच्या क्षेत्रातील आपली आगेकूच कायम राखताना देशातील अकृषी राज्य विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर अग्रस्थान प्राप्त केले आहे. आघाडीच्या टॉप-१० संशोधन संस्थांच्या सर्वसाधारण यादीत विद्यापीठ देशात आठवे आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने मटेरियल सायन्स, भौतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रिकी या तीन विषयांमध्ये राष्ट्रीय स्तरावर अकृषी राज्य विद्यापीठांत प्रथम स्थान प्राप्त केले आहे. करन्ट सायन्स या जागतिक आघाडीच्या ताज्या अंकात ही क्रमवारी जाहीर झाली आहे.
विद्यापीठाच्या ५४व्या दीक्षान्य समारंभाच्या पार्श्वभूमीवर, संशोधनाच्या क्षेत्रातील शिवाजी विद्यापीठाचे देशातील अग्रस्थान या निमित्ताने पुनश्च अधोरेखित झाले आहे.
करन्ट सायन्सच्या दि. २५ फेब्रुवारी २०१८च्या अंकात रिसर्च आऊटपुट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूशन्स ड्युरिंग २०११-१६: क्वालिटी अॅन्ड क्वांटिटी परस्पेक्टिव्ह हा विशेष लेख प्रकाशित झाला आहे. यामध्ये जागतिक संशोधनाचा दर्जा निश्चित करणाऱ्या साय-व्हॅल निर्देशांकाच्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला आहे. सरासरी राष्ट्रीय निर्देशांकापेक्षा ज्या संशोधन संस्थांचे निर्देशांक अधिक आहेत, अशा सात विद्याशाखांचा दर्जात्मक अभ्यास या लेखात करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र व खगोल, रसायनशास्त्र, बीजीएम अर्थात बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स व मॉलेक्युलर बायोलॉजी आणि मटेरियल सायन्स यांचा समावेश आहे.
सन २०११ ते २०१६ या कालावधीत वर्षाला ३००हून अधिक शोधनिबंधांचे प्रकाशन आणि राष्ट्रीय सरासरी (९ टक्के) पेक्षा टॉप-१० पर्सेंटाईल आऊटपुट या निकषांवर देशातील आघाडीच्या संशोधन संस्थांची क्रमवारी लेखात देण्यात आली आहे. यामध्ये इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, कोलकता ही संस्था २८९८ प्रकाशने व २६.३ पर्सेंटाईलसह प्रथम क्रमांकावर आहे. या यादीत शिवाजी विद्यापीठ १९२८ प्रकाशने व २०.४ पर्सेटाईलसह देशात आठव्या आणि अकृषी विद्यापीठांत प्रथम स्थानी आहे. मुंबई विद्यापीठ ३८२८ प्रकाशने व १५.६ पर्सेंटाईलसह बाराव्या स्थानी आहे.
त्याखेरीज, या संशोधन संस्थांचे फिल्ड वेट सायटेशन निर्देशांक (एफ.डब्ल्यू.सी.आय.) यावर आधारित विषयनिहाय विश्लेषण करण्यात आले असून त्यामध्ये मटेरियल सायन्स, भैतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रिकी या तीन विषयांमध्ये शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर सर्वसाधारण यादीत तिसऱ्या तर अकृषी राज्य विद्यापीठांत प्रथम स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मटेरियल सायन्समध्ये सर्वसाधारण जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च, बेंगलोर प्रथम स्थानी, इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, कोलकता द्वितिय स्थानी तर शिवाजी विद्यापीठ तिसऱ्या व अकृषी राज्य विद्यापीठांत प्रथम स्थानी आहे.
भौतिकशास्त्र व खगोल विषयात पंजाब विद्यापीठ, चंदीगड पहिल्या स्थानी, विश्वभारती विद्यापीठ, कोलकता दुसऱ्या स्थानी तर शिवाजी विद्यापीठ तिसऱ्या स्थानी आहे. तसेच, अभियांत्रिकी विषयात साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स, कोलकता प्रथम स्थानी, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च, बेंगलोर द्वितिय स्थानी तर शिवाजी विद्यापीठ तृतीय व अकृषी राज्य विद्यापीठांत प्रथम स्थानी आहे.

संशोधनाच्या दर्जावर शिक्कामोर्तब: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
Dr. Devanand Shinde
यापूर्वीही, सन २०१६मध्ये करन्ट सायन्सच्या सर्वेक्षणामध्ये शिवाजी विद्यापीठ मटेरियल सायन्स विषयातील संशोधनात अकृषी राज्य विद्यापीठांत देशात आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले होते. आणि आता सन २०११ ते २०१६ या कालावधीतील संशोधनावर आधारित जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनाच्या क्षेत्रातील दर्जा व गुणवत्तेवर पुनश्च शिक्कामोर्तब झाले आहे. विद्यापीठातील संशोधकांचे शोधनिबंध जागतिक स्तरावरील संशोधकांकडून अभ्यासले जातात, विविध शोधनिबंधांमधून त्यांच्या शोधनिबंधांचे साइटेशन्स मोठ्या प्रमाणावर दिले जातात, ही अभिमानास्पद बाब आहे. अकृषी विद्यापीठांत देशात आणि राज्यातही प्रथम स्थान मिळवून शिवाजी विद्यापीठाने संशोधनाची संख्या व गुणवत्ता या दोन्ही बाबतीत संतुलन सांभाळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मटेरिअल सायन्स, भौतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रिकी या विषयांमधील संशोधनात राष्ट्रीय स्तरावर सर्वसाधारण यादीत तिसरे व अकृषी विद्यापीठांत पहिले स्थान पटकावून या क्षेत्रातील आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे. याबद्दल विद्यापीठातील शिक्षक, संशोधक आणि संशोधक विद्यार्थी हे सर्वच घटक अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.

Monday 12 March 2018

अहिल्यादेवी होळकर अतिशय मुत्सद्दी, धोरणी आणि कणखर - डॉ.चंद्रकांत अभंग




शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यान प्रसंगी (डावीकडून) डॉ.निलीशा देसाई, डॉ.निलांबरी जगताप, प्राचार्य डॉ.ए.बी.राजगे, डॉ.एन.डी.पारेकर, डॉ.चंद्रकांत अभंग.
कोल्हापूर, दि.१२ मार्च - माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या अहिल्यादेवी होळकर अतिशय मुत्सद्दी, धोरणी, उत्तम प्रशासक आणि कणखर भूमिका घेणा-या तत्वज्ञानी राणी होत्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.चंद्रकांत अभंग यांनी केले. 
          शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासन, सामाजिक वंचितता समावेशक धोरण अभ्यास केंद्र आणि छत्रपती शाहूमहाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'राजमाता अहिल्याबाई होळकर-जीवन कार्य' या विषयावर दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामध्ये करण्यात आले होते. या परिसंवादाच्या उद्धाटन प्रसंगी उद्धाटक प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.चंद्रकांत अभंग बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ए.बी.राजगे उपस्थित होते. 
डॉ.चंद्रकांत अभंग
            डॉ.चंद्रकांत अभंग पुढे म्हणाले, खंडेराव होळकर 1754 मध्ये कुम्हेरच्या लढाईमध्ये धारातीर्थ पडल्यानंतर सासरे मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींना सती जाण्यापासून रोखले, त्यांचे मतपरिवर्तन केले. प्रशासकीय सैन्याच्या कामात त्यांना मल्हारावांनी निपूण केले हाते. 1754 नंतर अहिल्याबाई रसद पुरवठा अधिकारी म्हणून कार्य केलेल्या आहेत. नोव्हेंबर 1761 मध्ये मांगरुळ भकवाडा येथील आठ गांवे आपल्या ताब्यात यावी म्हणून लढाई सुरुवात झाली. अहिल्यादेवी तातडीने तोफा, बैला अन्य युध्द सामग्री पाठविण्याचे व्यवस्थापन केले. रामपुरा, भांडपुरा या भागामध्ये तोफांचे कारखाने उभारले गेले होते. अहिल्यादेवींच्या जीवनातील जास्तकाळ रामपुरा, भांडपुरा या गांवात गेल्याचे दिसून येते. अहिल्यादेवीकडे सैनिकीपोषाखामध्ये स्त्रीयाही होत्या.  राघोबांनी ज्यावेळेस अहिल्यादेवींवर आक्रमणाची तयारी केली त्यावेळेस इतर मराठा सरदारांनी अहिल्यादेवींचा पक्ष घेतला आणि रोघोबांना माघारी फिरावे लागले. महादजी शिंदे, तुकोजी हे समवयस्क असूनही अहिल्यादेवींना मातोश्री म्हणून संबोधत होते. इंग्रजांच्या धोक्याकडे लक्ष वळविण्याचे मोठे काम अहिल्यादेवींनी  केलेले होते.  लाखोरीच्या युध्दाअधी भारताच्या इतिहासामध्ये युरोपीयन पध्दतीने झालेले त्या पहिल्या युध्दामध्ये शिंदेचा विजय झाला होता. यावेळीही अहिल्यादेवींची दूरदृष्टी कामी आली होती. अहिल्यादेवींनी उत्तर, पूर्व, पश्चिम भारतामधील निरनिराळया ठिकाणच्या नदीघाट आणि मंदीरे येथे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहेत. हे त्यांचे कार्य लक्षात घेण्यासारखे आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचा धर्म अहिल्यादेवींनी भारतभर वाढविलेला आहे, हे आपल्याला दिसून येते.
शेतीच्या कामामध्ये परिवर्तन करणे, भिल्लांना राज्यव्यवस्थेमध्ये सामावून घेण्याची दखल त्यांनी घेतली.  महेश्वर या ठिकाणच्या नदीघाट मंदिरांचे काम जवळ जवळ 20 ते 30 वर्षे सुरु होते. यामाध्यमातून तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होत होता.  महेश्वरमध्ये अहिल्यादेवींनी महाराष्ट्रपध्दतीचा किल्ला निर्माण केला. अहिल्यादेवींनी गुजरात मधून विणकर आणले त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला त्यामुळे महेश्वरीसाडीची ख्याती संपूर्ण भारतभर निर्माण झाली. महाराष्ट्र राज्याबाहेरही मराठयांचे फार मोठे कर्तुत्व होते.  अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये चांगली व्यवस्था निर्माण केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. ए. बी. राजगे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिध्द होत्या. अहिल्यादेवींनी अनेक मंदिरे नदीघाट बांधले किंवा त्यांचा जीर्णोध्दार केला. महेश्वर इंदूर या गावांना त्यांनी सुंदर बनवले. अहिल्यादेवींनी रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. कारागीर, मूर्तिकारांना त्यांनी सन्मान दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.एन.डी.पारेकर, कार्यक्रमाचे संयोजक डॉ.निलांबरी जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. संयोजक डॉ.निलीशा देसाई यांनी आभार मानले. डॉ.अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी यशपाल धिंडे, विनयाताई करपेकर, दशरथ पारेकर, डॉ.अवनिश पाटील, श्रीमती छाया राजे यांचेसह प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.