मराठी विज्ञान कथा लेखन कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ.पां. देशपांडे, शिवाजीराव पवार आणि अधिविभागप्रमुख डॉ. राजन गवस. |
डॉ. लक्ष्मीकांत देशमुख. |
कोल्हापूर दि.6 मार्च - जीवनामध्ये विज्ञान विषयक दृष्टीकोन तयार होताना जगणे आणि लिहिणे यामध्ये अंतर नसावे. जगण्याचा दृष्टीकोन वैज्ञानिक झाला तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते, असे प्रतिपादन 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (बडोदा) लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या गणित अधिविभागातील रामानुजन सभागृहामध्ये आयोजित तीन दिवसीय मराठी विज्ञानकथा लेखन कार्यशाळेच्या उद्धाटन प्रसंगी लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के उपस्थित होते.
लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले, नवोदित लेखकांनी विज्ञाननिष्ठ कथा लेखनाचा सातत्याने अभ्यास करणे आवश्यक आहे. भारतामध्ये बावीस राजभाषा आहेत. भाषेचे राजकारण आहे. इंग्रजीचा प्रभाव आहे. भाषिक गुंतागुंत आहे. हे पहाता विज्ञानाची भाषा वाढली पाहिजे यासाठी आवश्यक प्रयत्न होणे गरजेचे आहे. विज्ञानाने आपले आयुष्य व्यापुन ठेवलेले आहे आणि मानवी जीवन प्रभावित करुन टाकलेले आहे. विज्ञानाच्या प्रसाराचा वेग आज वाढलेला आहे. वैज्ञानिक शोध ही मानवी बुध्दीची प्रतिभा आहे. प्रतिभासंपन्न वैज्ञानिक शोधांंमुळे मानवी जीवन आनंदी व सुखकर बनले आहे. विज्ञान कथेचा विस्तार विविध ज्ञानशाखेस कवेत घेवून समृदध् झालेला आहे. विज्ञानाचा वापर विकासासाठी करावयाचा की अविकासासाठी याचा विचार विज्ञान करीत नाही. विज्ञानामुळे मानवी जीवन जसे प्रभावित होते तसे बाधितही होते. याचा अचुक वेध प्रतिभाशाली लेखनामुळे घेणे शक्य होवू शकते. मानवी जीवनाचा आणि विज्ञानाचा शोध फार जवळचा आहे. विज्ञान कथा ही मुलत: माणसाची कथा असते पण ती विज्ञानाच्या पायावर उभी असते. विज्ञान शोधाचा अधार मानवी जीवनास उपकार की अपकार याचा नवोदितांनी अभ्यास करावा. वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व प्रत्येकाच्या जीवनात आहे. विज्ञानाच्या अभ्यासातून जे प्रश्न निर्माण होतात त्याचा मानवी जीवनावर कसा परिणाम होवू शकतो हे तर्काच्या आधारावर जे जाणतात तेच चांगले विज्ञानकथा लेखक होवू शकतात. आर्थिक, सामाजिक बाजू निर्माण करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग केला जात आहे, ही प्रत्येकाची नैतिक बाजू आहे. याचे आकलन लेखक म्हणून होणे गरजेचे आहे. चांगली विज्ञानकथा कल्पनारम्यापेक्षाही तर्काच्या पायावर उभी असते ती मोडता कामा नये. विज्ञानाची भाषा मराठी अधिक समृध्द झाली पाहिजे. विज्ञान साहित्य, विज्ञान लेखन, विज्ञान कथा जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण केले पाहिजेत. अधिकाधिक लोकांपर्यत ते पोहचले पाहिजेत. त्यामुळे माणूस चांगल्या प्रकारे विज्ञाननिष्ठ होवू शकेल.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, नवोदित लेखकांना विज्ञानामधील तंत्रज्ञानाचे मराठीमधून लेखन करण्याची अमाप संधी उपलबध आहे. तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन प्रगल्भ होणे गरजेचे आहे. प्रत्येकजण विज्ञाननिष्ठता पाळणारा एक भारतीय नागरिक होणे आवश्यक आहे.
यावेळी मराठी विज्ञान परिषद, मुंबई येथील कार्यवाहक अ.पां.देशपांडे यांची आपले मनोगत व्यक्त केले.
मराठी अधिविभागप्रमुख डॉ.राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. डॉ.रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. मराठी विज्ञानकथा लेखन कार्यशाळेचे समन्वयक डॉ.नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. यावेळी उपकुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांच्यासह शिवाजीराव पवार, यशवंत देशपांडे, माधुरी शानभाग, स्मिता पोतनीस, शिरीष गोपाळ देशपांडे, सुधा रिसबूड, सतीश बडवे, सखाराम देशमुख, व्यंकाप्पा
भोसले, गौतमीपुत्र कांबळे, अनुराधा गुरव यांचेसह नवोदित विज्ञानकथा लेखक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment