शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना श्री. अरुण खोरे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. शिवाजी जाधव, ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक आणि डॉ. भारती पाटील. |
महात्मा गांधी यांच्या
पत्रकारितेविषयी राष्ट्रीय चर्चासत्राचे विद्यापीठात उद्घाटन
कोल्हापूर, दि. २६
मार्च: सेवाभाव, सत्यकथन आणि पारदर्शकता ही महात्मा गांधी यांच्या पत्रकारितेची
मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. आजच्या काळात गांधींच्या मूल्याधिष्ठित पत्रकारितेची
प्रस्तुतता अधिकच अधोरेखित झालेली आहे, असे प्रतिपादन गांधी-विचारांचे ज्येष्ठ
अभ्यासक अरुण खोरे यांनी आज येथे केले.
शिवाजी
विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने ‘महात्मा गांधी यांची पत्रकारिता आणि तिची
प्रस्तुतता’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी बीजभाषण करताना श्री. खोरे बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यविद्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक होते.
Arun Khore |
श्री. खोरे म्हणाले,
बौद्धिक प्रामाणिकता आणि विचारांची स्पष्टता यामुळे महात्मा गांधी यांची
पत्रकारिता तत्कालीन परिस्थितीत झळाळून पुढे आली. लंडन टाइम्स, डेली मेल आदी
दक्षिण आफ्रिकेबाहेरील देशांमधील वृत्तपत्रांना पत्रे पाठवून त्यांनी आफ्रिकेमधील
लढा जगभर पोहोचविला. जनमानसाला शिक्षित करण्याचे ध्येय उराशी बाळगून त्यांनी पत्रकारितेचे
व्रत हाती घेतले होते. राष्ट्रभावनेने प्रेरित निर्भय समाजमन घडविण्याकडे
त्यांच्या समग्र पत्रकारितेचा कल होता. गांधीजी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूचे
होते; मात्र, हाती आलेल्या सत्तेचा दुरुपयोग करणे मात्र चुकीचे आहे, असे त्यांचे
स्पष्ट मत होते.
श्री. खोरे पुढे
म्हणाले, ग्रामस्वराज्य आणि ग्रामस्वच्छता या बाबींना आपल्या पत्रकारितेच्या
माध्यमातून प्राधान्याने देशासमोर आणताना ग्रामीण भारताचे प्रश्न ऐरणीवर आणून ते
प्रश्न सोडविण्यासाठी कृतीशील कार्यक्रम देण्यातही गांधींची पत्रकारिता आघाडीवर
होती. देश आत्मनिर्भर होण्यासाठी ग्रामीण भारत स्वंयपूर्ण व स्वावलंबी झाला
पाहिजे, यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी
त्यांनी हरिजन वृत्तपत्राच्या माध्यमातून अस्पृश्यता निवारणाचे महत्त्वाचे कार्य
हाती घेतले. मात्र, गांधीजींच्या या कार्याकडे त्यांच्या समकालीनांनी मात्र
म्हणावे तितके लक्ष दिले नाही, याची खंत वाटते.
संपादकाची बांधिलकी
ही मालक किंवा संस्थेशी नव्हे, तर वाचकाशी असली पाहिजे, असे सांगणाऱ्या गांधीजींची
पत्रकारितेची मूलतत्त्वे आजच्या भोवतालात अप्रस्तुत ठरतात की काय, अशी भीती
निर्माण झाल्याचे मतही श्री. खोरे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात
विजय नाईक म्हणाले की, गांधीजी हे विसाव्या शतकातील एक महान संज्ञापक होते. दक्षिण
आफ्रिका असो अगर भारत, या दोन्ही देशांतील सर्वसामान्य, शोषित नागरिकांच्या हक्कांसाठी
लढा देण्यासाठी त्यांनी आपली पत्रकारिता पणाला लावली. जे आजच्या पत्रकारितेच्या
सद्यस्थितीची चिंता करतात, त्यांच्यासाठी गांधींची पत्रकारितेचे मूल्य मोठे आहे; मात्र, ज्याचे त्यांना मोल
नाही, त्यांच्यासाठी गांधी अप्रस्तुत ठरतील, ही मात्र चिंतेची बाब असल्याचे मत
त्यांनी व्यक्त केले.
यावेळी गांधी अभ्यास
केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. शिवाजी
जाधव यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, दशरथ पारेकर, प्रा.
मीना देशपांडे, डॉ. चैत्रा रेडकर, डॉ. राजन गवस, डॉ. नंदा पारेकर, डॉ. अवनिश
पाटील, डॉ. व्यंकाप्पा भोसले, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे आदींसह संशोधक,
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment