डॉ. जब्बार पटेल |
१३ एप्रिल रोजी पुरस्कार प्रदान सोहळा
कोल्हापूर, दि. ३ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रदान करण्यात
येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ
निर्माते-दिग्दर्शक जब्बार पटेल यांना आज जाहीर करण्यात आला. येत्या १३ एप्रिल
रोजी दुपारी ४ वाजता श्री. पटेल यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार
आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज सायंकाळी पत्रकार
परिषदेत ही घोषणा केली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी
विद्यापीठाचे माजी
कुलगुरू (स्व.) प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांची ठेव प्रदान केली
आहे. श्रीमती शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या सामंजस्य करारातून शिवाजी विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रित्यर्थ 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कारा'ची संयुक्त
निर्मिती करण्यात आली. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक,
सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. रुपये १ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी प्रथम
पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव यांना तर गतवर्षी दुसरा
पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला. यंदा ज्येष्ठ
निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी पुरस्कारासंदर्भात अधिक माहिती
देताना शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले की, कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील शोध समितीने यंदा डॉ.
जब्बार पटेल यांच्या भारतीय नाट्य-चित्रपट क्षेत्रातील योगदानाची आणि त्या
माध्यमातून भारतीय समाजासाठी केलेल्या सेवेची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी
एकमताने निवड केली. येत्या १३ एप्रिल २०१८ रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान
करण्यात येणार आहे.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के,
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शोध समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.ए. खोत, डॉ.
भालबा विभुते, डॉ. एन.व्ही. चिटणीस, उपकुलसचिव विलास सोयम उपस्थित होते.
--
डॉ. जब्बार पटेल यांच्याविषयी थोडक्यात...
Dr. Jabbar Patel |
पंढरपूर येथे दि. २३ जून १९४२ रोजी जन्मलेल्या डॉ. जब्बार
पटेल यांची एक अत्यंत प्रतिभाशाली आणि सर्जनशील दिग्दर्शक ओळख आहे. घाशीराम
कोतवाल, तीन पैशांचा तमाशा, अशी
पाखरे येती यांसारख्या अजरामर नाटकांद्वारे
जब्बार पटेल यांनी मराठी नाट्यसृष्टीला
एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले. उत्तम अभिनेते, निर्माते
आणि प्रयोगशील दिग्दर्शक अशा बहुआयामी कर्तृत्वाच्या डॉ. पटेल मराठी रंगभूमीच्या वाटचालीत अतुलनीय योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे सामना, सिंहासन, जैत रे जैत, मुक्ता,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण: बखर एका वादळाची असे मराठीतील संस्मरणीय चित्रपट पटेल यांनी दिग्दर्शित केले आहेत.
वेगळा विषय, वेगळा आशय नि वेगळी मांडणी हे पटेल यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
डॉ. पटेल यांनी पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय
शिक्षण घेतले तरी त्यांनी कारकीर्द मात्र चित्रपट क्षेत्रातच
करावयाचे ठरविले. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी लेखन, दिग्दर्शनात अनेक प्रयोग केले. अनेक एकांकिका, नाटके
बसवली. नाट्य स्पर्धा गाजवल्या. अनिल अवचट यांच्यापासून ते कुमार सप्तर्षी यांच्यासारख्या मंडळींचा त्यांना सहवास लाभला. या काळात त्यांचा नाट्यसंस्था व कलावंतांशी संपर्क आला. डॉ. पटेलांनी त्यानंतर संपूर्णतः नाट्य व चित्रपट क्षेत्राला वाहून घेताना एकापेक्षा एक सरस नाटक व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह काटशह मांडणारे सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर
आधारित जैत रे जैत, मुक्ता, पु.ल. देशपांडेनी लिहिलेला 'एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट त्यांच्या कारकिर्दीवर कळस चढविणारा ठरला. अनेक पैलू असणार्या आंबेडकरांचा
जीवनपट अवघ्या
तीन तासांत मांडणे ही अवघड बाब त्यांनी अत्यंत कौशल्याने साधली.
डॉ. पटेल यांनी थिएटर
अॅकेडमी नावाच्या प्रायोगिक नाट्यसंस्थेची स्थापना केली आहे. सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाने देशातील सामाजिक, सांस्कृतिक वातावरण ढवळून
काढले. या नाटकाचे दिग्दर्शन करून पटेलांनी ते परत रंगमंचावर आणले. या नाटकाने विक्रमी
प्रयोगांची नोंद केली आहे. त्यांनी
अनेक लघुपटही निर्माण केले आहेत. कुसुमाग्रजांवरील लघुपटासह इंडियन थिएटर, लक्ष्मण जोशी, मी एस. एम. असे
काही महत्त्वाचे लघुपट सांगता येतील. अभिनेता म्हणूनही डॉ. पटेल यांनी काही
नाटकांमधून कामे केली आहेत.
No comments:
Post a Comment