२६ एप्रिल रोजी विशेष प्रदान
सोहळ्याचे आयोजन
Dr. Devanand Shinde |
कोल्हापूर, दि. २० एप्रिल: शिवाजी विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एन.सी.सी.मध्ये ‘कर्नल कमांडंट’ या मानद कर्नलपदाचा बहुमान
प्रदान करण्याचा निर्णय एनसीसीच्या केंद्रीय मुख्यालयाकडून घेण्यात आल्याचे
विद्यापीठास कळविण्यात आले आहे. येत्या गुरूवारी (दि. २६ एप्रिल) विद्यापीठाच्या
प्रांगणात कुलगुरू डॉ. शिंदे यांना विशेष सोहळ्याद्वारे कर्नलपदाचा बहुमान प्रदान
करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली आहे.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी दिलेल्या
माहितीनुसार, राष्ट्रीय छात्र सेनेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयाकडून विद्यापीठाच्या
कुलगुरूंना एनसीसीचे मानद कर्नलपद प्रदान केले जाते. एनसीसीच्या विविध उपक्रमांना
विद्यापीठ परिक्षेत्रात प्रोत्साहन व चालना देण्यामधील कुलगुरूंची प्रमुख भूमिका
लक्षात घेऊन हा बहुमान त्यांना देण्यात येत असतो. त्यानुसार शिवाजी विद्यापीठास मुंबईस्थित
एनसीसी महाराष्ट्र महासंचालनालयाचे अपर महासंचालक मेजर जनरल गजेंद्र प्रसाद
यांच्याकडून नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. कोल्हापूर ग्रुपचे एनसीसी प्रमुख
ब्रिगेडियर पी.एस. राणा, कर्नल एम.आर. चौधरी, कर्नल एफ.एफ. अंकलेश्वरा आणि ऑनररी
मेजर रुपा शहा यांनी कुलगुरूंची प्रत्यक्ष भेट घेऊन हे पत्र त्यांना प्रदान केले.
त्यानुसार, एनसीसीतर्फे येत्या गुरूवारी (दि. २६ एप्रिल) सकाळी १० वाजता विद्यापीठात
विशेष ‘गार्ड ऑफ ऑनर’ सोहळ्याचे आयोजन करण्यात
आले असून त्यामध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांना अत्यंत सन्मानपूर्वक ‘मानद कर्नल’पद प्रदान करण्यात येणार
आहे. यावेळी कुलगुरू एनसीसीच्या छात्रांकडून सलामी स्वीकारतील. त्यानंतर कुलगुरू
पत्रकार परिषदेस संबोधित करतील, अशी माहितीही कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment