Saturday 29 June 2019

नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष चर्चासत्रात सूर

शिवाजी विद्यापीठात नव्या शै७णिक धोरणाच्या अनुषंगाने आयोजित विशेष चर्चासत्रात बोलताना ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी.एम. हिर्डेकर आणि डॉ. आर.के. कामत.



कोल्हापूर, दि. २९ जून: केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण हे सर्वसमावेशक असून त्यामध्ये सर्व स्तरांवरील शिक्षणाचा साकल्याने विचार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी तितक्याच प्रभावीपणे झाल्यास निर्धारित शैक्षणिक उद्दिष्टे गाठणे शक्य होईल, असा सूर शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष चर्चासत्रात उमटला.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापीठ व महाविद्यालय विकास विभागातर्फे काल सायंकाळी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले.  या चर्चासत्रात संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी नव्या शैक्षणिक धोरणातील शालेय शिक्षण, ज्येष्ठ अर्थ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे.एफ. पाटील यांनी उच्च शिक्षण आणि विद्यापीठाच्या इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. आर.के. कामत यांनी संशोधन या संदर्भातील तरतुदींवर सविस्तर प्रकाश टाकला. यावेळी अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के उपस्थित होते.
डॉ. बी.एम. हिर्डेकर
नव्या शैक्षणिक धोरणातील शालेय शिक्षणविषयक तरतुदींचा वेध घेताना डॉ. बी.एम. हिर्डेकर म्हणाले, शालेय शिक्षणामध्ये अभ्यासक्रमाचा बोजा कमी करून सर्वंकष कौशल्य विकासावर देण्यात आलेला भर महत्त्वाचा आहे. कोठारी आयोगाचा १०+++२ हा पॅटर्न ५० वर्षे व्यवस्थित आणि यशस्वीपणे चालला. आता तो ५+++४ असा बदलण्यात आला आहे. हा वयाधारित पॅटर्न नाही, तर सर्वांगीण विकासाभिमुख अशी त्याची निर्मिती करण्यात आली आहे. बालकांच्या भरणपोषणाबरोबरच शिक्षण प्रक्रियेला देण्यात आलेले महत्त्व नोंद घेण्यासारखे आहे. अंगणवाड्या आणि अंगणवाडी सेविकांचे सक्षणीकरण व विस्तार आणि त्याचबरोबर प्राथमिक शाळांपासूनचे त्यांचे अंतर, साहचर्य या संदर्भातही शैक्षणिक धोरण बारकाईने विचार करताना दिसते. शैक्षणिक, सहशैक्षणिक आणि शिक्षणेतर उपक्रमांमधील भेद नव्या धोरणामध्ये नष्ट करण्यात आले असून या सर्व उपक्रमांचा समावेश शैक्षणिक म्हणूनच करण्यात आला आहे. मुलांची घोकंपट्टीपासून मुक्तता करून त्यांच्यात एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसित करून देशाचे समर्थ नागरिक बनविण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या तरतुदी या धोऱणात करण्यात आल्या आहेत.
उच्चशिक्षणविषयक तरतुदींचा वेध घेताना डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले, बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत, सक्तीचे आणि देशभरात एकजिनसी, एकाच पॅटर्नचे करण्याचे महत्त्वाचे काम नव्या शैक्षणिक धोरणाने साध्य होणार आहे. उच्चशिक्षणाची पुनर्रचना आणि नवनिर्माण असे दुहेरी उद्दिष्ट धोरण बाळगून आहे. जागतिक दर्जाच्या बहुविद्याशाखीय शिक्षण संस्थांची निर्मिती करून त्या माध्यमातून सन २०३०पर्यंत ग्रॉस एन्रॉलमेंट रेशो (जीआआर) ५० टक्क्यांच्या घरात नेण्याचे उद्दिष्टही आहे. बुद्धिमान, सेवाव्रती आणि सशक्त नैतिक मूल्याधारित संपूर्ण व्यक्तीमत्त्वाची माणसे घडविली जावीत, अशी अपेक्षा धोरणात आहे. शिक्षण संस्थांचे केवळ संशोधन करणाऱ्या, संशोधनासह अध्यापन करणाऱ्या आणि केवळ अध्यापन करणाऱ्या असे तीनच प्रकार येथून पुढे असतील. शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि व्यावसायीकरण या बाबींनाही महत्त्व देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर उच्चशिक्षणाचे नियमन करण्यासाठी नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी ऑथॉरिटीची स्थापना करण्यात आली आहे. तथापि, सध्याच्या शिक्षण संस्थांचे फेरवर्गीकरण व फेररचना, प्रवेश प्रक्रिया, शुल्कनिश्चिती आणि शिक्षणाचे माध्यम आदी काही बाबींसंदर्भात आपल्याला संघर्षाचे प्रसंग टाळून कार्यवाहीची निश्चिती करणे गरजेचे आहे. या अहवालाची कालबद्ध अंमलबजावणी करण्याची योजनाही यात दिली आहे, ही बाबही अत्यंत लक्षणीय आहे.
डॉ. आर.के. कामत
नव्या धोरणामधील संशोधनविषयक तरतुदींचा वेध घेताना डॉ. आर.के. कामत म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात एकविसाव्या शतकाची कौशल्ये शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना देण्याची योजना महत्त्वाची आहे. त्यासाठी आंतरविद्याशाखीय व बहुविद्याशाखीय शिक्षणपद्धतीचा अंगिकार ही क्रांतीकारी बाब आहे. संशोधनाच्या दृष्टीने नॅशनल रिसर्च फौंडेशनच्या स्थापनेची शिफारस अत्यंत महत्त्वाची आहे. आता राष्ट्रीय विकासाचे केवळ भागीदार नव्हे, तर निर्माण प्रक्रियेचे शिलेदार होण्याच्या दिशेने विद्यार्थ्यांना घडविणारे हे धोरण आहे. देशात खऱ्या अर्थाने संशोधनाची संस्कृती व क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश या धोरणात आहे. केवळ अनुदाने व निधी देऊन उत्तम संशोधन साकार होऊ शकत नाही, याची जाणीव होऊन त्या पलिकडे संशोधनाची संस्कृती विकसित करण्याचा प्रयत्न दिसतो. यानुसार आता एम.फील. हद्दपार होणार असून तत्सम संशोधन प्रकल्पाचा पदव्युत्तर शिक्षणातच समावेश करण्यात आला आहे. तसेच चार वर्,चा पदवी अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणारा विद्यार्थी पीएच.डी. संशोधनासाठी पात्र असेल. स्थानिक विद्यापीठांचे परदेशी विद्यापीठांसोबत लिंकेजिस प्रस्थापित करणे, राज्य विद्यापीठांचे पोस्ट डॉक्टरल फेलोशीपसह सक्षणीकरण करणे, राष्ट्रीय प्राधान्याच्या विषयांवरील संशोधनाला प्रोत्साहन देणे, विज्ञानाखेरीज कला आणि मानव्यशास्त्रांतील संशोधनाला प्रोत्साहन देणे, संशोधनासाठी राष्ट्रीय स्तरावर क्राऊड फंडिंगची संकल्पना राबविणे, एक्विपच्या (EQUIP) माध्यमातून दरवर्षी किमान २५०० कोटींचा निधी जमविणे आणि तो दहा लाख संशोधक विद्यार्थ्यांना वितरित करणे अशा अनेक योजना नव्या धोरणात आहेत. एकूणच संशोधन, नवनिर्माण आणि नवीन ज्ञान निर्मिती या दृष्टीने हे धोरण सकृतदर्शनी अत्यंत प्रभावी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच घटकांनी नव्या शैक्षणिक धोरणाचा संपूर्ण मसुदा शब्दनिहाय समजून घेणे आवश्यक आहे. त्यातील कित्येक बाबी अगदी आजही प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेमध्ये अंगीकृत करणे, अंमलात आणणे सहजशक्य आहे. त्या दृष्टीने त्याचा विचार होणे आवश्यक आहे. काही बाबी त्रुटीपूर्ण किंवा सदोष आहेत, अशी भावना असेल, तर त्यांचे पुनरावलोकन करून त्या निरसित करण्याची शिफारस करीत असताना त्याला पर्यायी व्यवस्था काय असावी, यासंदर्भातील दिग्दर्शन करणेही महत्त्वाचे आहे. कोठारी कमिशनच्या धोरण निर्मितीमध्ये महाराष्ट्राच्या डॉ. जे.पी. नाईक यांचे बहुमूल्य योगदान होते. या नव्या धोरणामध्येही डॉ. वसुधा कामत यांचे महत्त्वाचे योगदान आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी वाढले.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. भालबा विभुते, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. नीलेश बनसोडे, डॉ. मेघा पानसरे आदींनी सहभाग घेतला.
चर्चासत्राच्या सुरवातीला विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर श्रीमती टी. एस. भुतकर यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

Friday 28 June 2019

शिवाजी विद्यापीठाच्या मेळाव्यात ८० दिव्यांगांना रोजगार




कोल्हापूर, दि. २८ जून: शिवाजी विद्यापीठातर्फे केवळ दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार व कौशल्य विकास मेळाव्यात आज ८० दिव्यांग उमेदवारांची विविध आस्थापनांमध्ये निवड झाली, अशी माहिती मेळाव्याचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी दिली.
आजच्या मेळाव्यास मेंदू विकारग्रस्त १४, मूक व कर्णबधीर ६९, अंध ३८, अस्थी व इतर व्यंग असणारे १७५ असे एकूण २९६ दिव्यांग उमेदवार उपस्थित राहिले. त्यामध्ये मुलींचे प्रमाण सुमारे ४० टक्के होते. यापैकी ८० उमेदवारांची विविध रोजगारांसाठी निवड झाली. यामध्ये डॉ. रेड्डीजमध्ये २८, एल.आय.सी.मध्ये ९, युरेका फोर्ब्जमध्ये ८, स्कायलार्कमध्ये १० तर शिवाजी विद्यापीठात २५ उमेदवारांची निवड झाली.

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित दिव्यांग रोजगार मेळाव्यास लक्षणीय प्रतिसाद

दिव्यांगांप्रती बांधिलकीतूनच विद्यापीठाकडून

विशेष मेळावा: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के


शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात नोंदणी अर्ज भरताना दिव्यांग विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्यास उपस्थित असलेले दिव्यांग उमेदवार.

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित दिव्यांग मेळाव्यास उपस्थित उमेदवारांना मेळावा स्थळी आणण्यासाठी विद्यापीठाने विशेष वाहन व्यवस्था केली.

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित दिव्यांग मेळाव्यास उपस्थित उमेदवारांना मदतीसाठी तत्पर असलेले सुरक्षा रक्षक.

शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्यास उपस्थित असलेले दिव्यांग उमेदवार.

शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्यास उपस्थित असलेले दिव्यांग उमेदवार.

शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्याच्या नोंदणीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्याअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांची मुलाखत घेताना विविध आस्थापनांचे अधिकारी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्याअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांची मुलाखत घेताना कंपनी अधिकारी.

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्याचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) महेश चव्हाण, डॉ. नमिता खोत, डॉ. जी.एस. राशिनकर, व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी, डॉ. ए.एम. गुरव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. पी.बी. बिलावर आदी.

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित दिव्यांग रोजगार व कौशल्य मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. नमिता खोत, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी, डॉ. ए.एम. गुरव.

कोल्हापूर, दि. २८ जून: शिवाजी विद्यापीठाने सर्वसमावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमांची देशपातळीवर नॅबसारख्या संघटनांनी दखल घेऊन पुरस्कार देऊन गौरविले आहे. दिव्यांगांप्रती ही बांधिलकी जपताना विद्यापीठाने केवळ त्यांच्यासाठी कौशल्य व रोजगार मेळावा आयोजित केला आहे. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता या पुढील काळातही विद्यापीठ अशा प्रकारचे उपक्रम दिव्यांगासाठी राबवेल, अशी ग्वाही प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे दिली.
शिवाजी विद्यापीठाचे मध्यवर्ती रोजगार कक्ष, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, सर्वसमावेशी शिक्षण संसाधन केंद्र आणि युजीसी- दिव्यांग व्यक्तींसाठी योजना यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कौशल्य व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटनानंतर नोंदणीकृत दिव्यांग उमेदवारांशी संवाद साधताना प्र-कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. मेळाव्यासाठी सुमारे तीनशे दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
डॉ. शिर्के म्हणाले, केवळ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र रोजगार व कौशल्य मेळावा आयोजित करणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ असावे. या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त सबलीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दिव्यांग उमेदवारांना सन्मानाने रोजगार संधींची उपलब्धता, सर्वसमावेशकता आणि सबलीकरण या त्रिसूत्रीच्या आधारावर प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्याखेरीज विविध जीवन कौशल्ये देऊन त्यांचे सक्षमीकरणही करण्यात येत आहे. रोजगार कदाचित मिळाला नाही, तरी रोजगाराभिमुखता विकसित करण्यासाठी, आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी ही कौशल्ये निश्चितपणे उपयोगी ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वेळी मेळाव्याचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जी.एस. राशिनकर यांनी स्वागत केले तर बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांनी आभार मानले. यावेळी युजीसी-स्कीम फॉर पर्सन विथ डिसॅबिलीटीज योजनेच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई, कौशल्य विकास अधिकारी महेश चव्हाण आदी उपस्थित होते.

दिव्यांग विद्यार्थ्यांची भर पावसातही उपस्थिती
विद्यापीठाच्या या रोजगार व कौशल्य विकास मेळाव्याला दिव्यांग विद्यार्थ्यांचा भर पावसातही लक्षणीय प्रतिसाद लाभला. सकाळी दहा वाजल्यापासूनच दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मानव्यशास्त्र इमारतीमध्ये रीघ लागली होती. त्यांना इमारतीकडे आणण्यासाठी विशेष वाहन व्यवस्थाही विद्यापीठाने पुरविली. उमेदवारांच्या नोंदणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नोंदणीकृत प्रत्येक उमेदवाराला मोफत चहा-नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विशेष रॅम्प उभारण्यापासून आवश्यक सुविधांची उभारणीही इमारतीमध्ये करण्यात आली. पायाने अधू विद्यार्थ्यांना व्हीलचेअरसह येता-जाता येईल, अशी व्यवस्था तळमजल्यावर करण्यात आली होती. त्यांच्या मुलाखतीची व कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्थाही तळमजल्यावरच करण्यात आली. इतर दिव्यांगांना पहिल्या मजल्यावरील सभागृहात कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.
मेळाव्यात मूकबधीर, अंध, अस्थिव्यंग अशा २९६ दिव्यांग उमेदवारांनी नोंदणी केली. दिवसभरात शिवाजी विद्यापीठासह युरेका फोर्ब्ज, स्कायलार्क ग्लोबल, डॉ. रेड्डीज फौंडेशन, एल.आय.सी. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आदी आस्थापनांनी रोजगार भरतीसाठी नोंदणीकृत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
सहभागींना मुलाखत तंत्र, छायाचित्रण, आयसीटी कौशल्ये, ग्रुप डिस्कशन, सकारात्मक विचार कौशल्ये, रिझ्युम लेखन, टॅक्स प्रॅक्टीस, सेट-नेट व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध कौशल्यांबाबत डॉ. ए.एम. गुरव, डॉ. के.व्ही. मारुलकर, डॉ. पी.एन. देवाळी, डॉ. जी.एस. राशिनकर, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. व्ही.एस. खंडागळे, प्रमोद कसबे, महेश चव्हाण आणि जयंत नागराळे यांनी मार्गदर्शन केले.

Wednesday 26 June 2019

शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू जयंती उत्साहात



कोल्हापूर, दि.26 जून - शिवाजी विद्यापीठात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, वित्त लेखाधिकारी व्ही.टी.पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.आर.व्ही.गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी समन्वयक डॉ.डी.के.गायकवाड, अधिष्ठाता डॉ.ए.एम.गुरव, डॉ.पी.डी.राऊत,डॉ.एस.एस.महाजन, डॉ.जे.एच.कराडे, डॉ.एन.बी.गायकवाड, डॉ.जे.एस.बागी, उपकुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, डॉ.पी.एस.पांडव, देविकाराणी पाटील, सचिन घोरपडे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी सेवक मोठया संख्येने उपस्थित होते. 
------

Friday 21 June 2019

शिवाजी विद्यापीठात योग दिन उत्साहात;

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचाही सहभाग

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित शिबिराचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामी, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह मान्यवर.


योगसाधना करताना मान्यवर.

योग शिबिरात सहभागी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी.

योग शिबिरात सहभागी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मान्यवरांसमवेत.

योगसाधना करताना शालेय विद्यार्थिनी.

योगसाधना शिबिरात सहभागी महिला व बालके.

शिवाजी विद्यापीठात आयोजित योगसाधना शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिवाजी विद्यापीठात आयोजित योगसाधना शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिवाजी विद्यापीठात आयोजित योगसाधना शिबिरात सहभागी शालेय विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित शिबिरात योगसाधना करणारे नागरिक.


कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठात आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे यंदाचा योग दिन अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग, श्री सिद्धगिरी मठ, कणेरी आणि टाइम्स ऑफ इंडिया समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी साडेसहा वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात (पूर्वीचे लोककला केंद्र) आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कणेरी मठाचे मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामी, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, प्रा. भारत खराटे, डॉ. संदीप पाटील आदींच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून योग दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि समाजातील आबालवृद्धांनी योग दिन प्रशिक्षणात सहभाग घेतला. मठाचे प्रशिक्षक सूरज पाटील यांनी योग प्रशिक्षण दिले.
शिवाजी विद्यापीठाने कणेरी मठाच्या सहकार्याने पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनापासून विद्यापीठात दररोज सकाळी योग प्रशिक्षण शिबीर चालविले आहे. हे शिबीर सर्व समाजघटकांसाठी संपूर्णतः मोफत व मुक्त आहे. यामध्ये दररोज दोनशे साधक सहभागी होत असतात. या शिबिराचा पाचवा वर्धापनदिनही आज साजरा करण्यात आला.
दरम्यान, शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित २९३ महाविद्यालयांमध्येही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Saturday 15 June 2019

विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुका निकोप वातावरणात पार पाडाव्यात: आनंद मापुसकर


शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, अमित कुलकर्णी, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, आनंद मापुसकर व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आनंद मापुसकर

कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यापीठ विभाग व महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी


कोल्हापूर, दि. १५ जून: नव्या विद्यापीठ कायद्यानुसार यंदा महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालये सुमारे २५ वर्षांनंतर नव्याने विद्यार्थी परिषद निवडणुकीला सामोरी जात आहेत. या संदर्भातील संभ्रम, गतानुभव अथवा पूर्वग्रह बाजूला ठेवून सर्व घटकांनी निवडणुका निकोप वातावरणात यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ आनंद मापुसकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित एकदिवसीय कार्यशाळा आज वि.स. खांडेकर भाषा भवनमध्ये पार पडली. या परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. कोल्हापूर विभागाचे उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी व कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते.
Anand Mapuskar
आनंद मापुसकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या लिंगडोह समिती आणि वेळुकर समिती या दोन समित्यांच्या शिफारशींचा अभ्यास करून विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या संदर्भातील कार्यवाहीचे स्वरुप निर्धारित केले आहे. उत्तम राजकीय नेतृत्व शैक्षणिक क्षेत्रामधून निर्माण व्हावे, अशी स्वतः विद्यार्थी चळवळीमधून पुढे आलेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची अपेक्षा आहे. मात्र, या निवडणुकांमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसेल, अशाच स्वरुपाचे एकरुप परिनियम शासनाने तयार केले आहेत. अगदी कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप या विद्यार्थी निवडणुकांत असणार नाही. तसे निदर्शनास आल्यास उमेदवारी रद्द करण्यापर्यंतच्या तरतुदी यात केल्या आहेत. कोणत्याही कायद्याचे यश हे त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये असते. त्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालयांतील संबंधित घटक या निवडणूकविषयक परिनियमांतील तरतुदींची किती प्रभावीपणे अंमलबजावणी करतात, यावर अवलंबून आहे. कायद्यात ठोस तरतुदी आहेत, त्याची कडक अंमलबजावणी पहिल्या निवडणुकांपासूनच केली तर पुढील निवडणुकांमध्ये त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या कामकाजाची कार्यकारी यंत्रणेसंदर्भातील एकरुप परिनियमांचीही अंमलबजावणी तातडीने करण्याची गरज असल्याचेही मापुसकर यांनी नमूद केले.
अमित कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित घटकांसाठी मध्यवर्ती कार्यशाळा घेणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले असल्याचे सांगितले. नजीकच्या काळात जिल्हा स्तरावर अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत महाविद्यालयांतही कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यालाही सर्वांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Dr. D. T. Shirke
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, पूर्वी १९७४च्या विद्यापीठ कायद्यानुसार झालेल्या निवडणुका आणि सध्याच्या विद्यापीठ कायद्यानुसार घेण्यात येत असलेल्या निवडणुका यांतील फरक सर्व संबंधित घटकांनी समजावून घ्यायला हवा. या निवडणुकांमध्ये कोणत्याही गैरप्रकाराला अजिबात स्थान नाही. हा कायदा अधिक विद्यार्थीकेंद्रित आहे. विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांचा विकास करण्यासाठी निवडणुकांचा अंतर्भाव कायद्यात केला आहे. माजी कुलगुरू प्रा. आर.एस. माळी, प्रा. राव यांच्यासह श्री. मापुसकर आदींनी या संदर्भातील कलमे व परिनियम तयार करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. प्रत्येक कलम अत्यंत विचारपूर्वक तयार केले आहे. त्यामुळे त्यातील तरतुदी समजून घेऊन दोन महिन्यांच्या आत विद्यार्थी परिषद निवडणुकीची प्रक्रिया मार्गी लावण्याच्या दृष्टीने सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनीही मार्गदर्शन केले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
कार्यशाळेत दिवसभरातील विविध तांत्रिक सत्रांमध्ये प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी रेग्युलेटरी फ्रेमवर्क ऑफ इलेक्शन्स, आनंद मापुसकर यांनी प्रोसिजरल अस्पेक्ट्स ऑफ इलेक्शन्स आणि डॉ. आर.व्ही. गुरव यांनी टाइमलाइन फॉर इलेक्शन प्रोग्राम या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

Thursday 13 June 2019

महाराष्ट्राच्या रेशीम सल्लागार समितीवर

डॉ. ए. डी. जाधव यांची निवड



Dr. A. D. Jadhav
कोल्हापूर, दि. १३ जून: महाराष्ट्र शासनातर्फे नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या रेशीम सल्लागार समितीवर येथील शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. ए. डी. जाधव यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे वस्त्रोद्योग सचिव हे समितीचे अध्यक्ष राहणार असून नागपूरचे रेशीम संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
डॉ. जाधव रेशीमशास्त्र विषयाचे अध्यापन, संशोधन, प्रसार व प्रचार यासाठी मोलाचे योगदान देत आहेत. क्युबा या देशासाठीही ते रेशीम सल्लागार म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन या समितीवर त्यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील सर्वांगीण रेशीम विकासाच्या दृष्टीने धोरण तयार करणे, राज्यातील रेशीम विस्तार व विकासासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू इत्यादी राज्यांच्या धर्तीवर तुती रेशीम उद्योगाची आणि झारखंड, छत्तीसगड राज्यांच्या धर्तीवर टसर रेशीमगाठी विकास कार्यक्रमांचा सर्वंकष कृती आराखडा तयार करणे, धोरण तसेच आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी कामकाजाची दिशा ठरविणे, राज्यात पैठणी, येवला इत्यादी पारंपरिक कौशल्यावर आधारित रेशीम उत्पादनाचा जागतिक पातळीवर प्रचार करून त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सेरी-टुरिझम प्रकल्प हाती घेण्यासाठी उपाययोजना सुचविणे आदी कामकाज समितीमार्फत करणे अपेक्षित आहे. सदर समितीने घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने रेशीम संचालक सल्लामसलत करून त्याची विस्तृत पृथक्करण व अंमलबजावणी करतील. त्याचप्रमाणे सदर समितीची बैठक दोन महिन्यांतून एकदा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती रेशीम संचालनालयाच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.



‘आव्हान’मध्ये शिवाजी विद्यापीठास

रॅली सादरीकरणासाठीचा फिरता चषक

नांदेड येथे झालेल्या ‘आव्हान २०१९ या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात उत्कृष्ट रॅली सादरीकरणासाठीचा फिरता चषक पटकावलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या संघासमवेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील.


कोल्हापूर, दि. १३ जून: नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात झालेल्या आव्हान २०१९ या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघाने उत्कृष्ट रॅली सादरीकरणासाठीचा फिरता चषक पटकावला आहे.
आज सकाळी या विजयी संघाचे विद्यापीठात आगमन झाल्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले.
राजभवन कार्यालय, महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय सेवा योजना, उच्च तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या सयुंक्त विद्यमाने जून ते १२ जून २०१९ या कालावधीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आव्हान २०१९ राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर पार पडले. शिबीरा राज्यभरातील २१ विदयापीठांतील एकूण १२३७ शिबीरार्थी सहभागी झाले. शिवाजी विदयापीठाकडून कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांमधून प्रत्येकी ३० (२० मुले व १० मुली याप्रमाणे) शिबिरार्थी सहभागी झाले.त्यांच्यासमवेत प्रत्येक जिल्हयाकडून प्रत्येकी एक पुरूष आणि एक महिला संघव्यवस्थापक सहभागी झाले. शिबीरा राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) आणि ज्ज्ञ मार्गदर्शक यांनी आपत्कालीन रिस्थितीत बचावकार्यासाठी तसेच आपत्तीची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रात्याक्षिक आणि सराव प्रशिक्षण दिले. ज्या प्रामुख्याने, वैदयकीय तसेच प्रत्यक्ष कृती यांचा समावेश होता. शिवाजी विद्यापीठ संघाने शिबिरात त्कृष्ट सहभाग नोंदविला आणि उत्कृष्ट रॅली सादरीकरणाचा फिरता चषकही पटकावला.
संघाला विदयापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त लेखाधिकारी व्ही. टी. पाटील यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. शिबीरात यशस्वी सहभागासाठी विदयापीठ प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सुजित मुंढे, संग्राम मोरे, संघ व्यवस्थापक प्रा. संगीता पाटील, प्रा. संजीवनी पाटील, प्रा. जयमाला उथळे, प्रा. महेंद्र वाघमारे, प्रा. टी. के. बदामे, प्रा. दिगंबर नागर्थवार यांनी परिश्रम घेतले.