|
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, अमित कुलकर्णी, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, आनंद मापुसकर व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे. |
|
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आनंद मापुसकर |
|
कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यापीठ विभाग व महाविद्यालयांचे प्राचार्य व प्रतिनिधी |
कोल्हापूर, दि. १५ जून: नव्या
विद्यापीठ कायद्यानुसार यंदा महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालये
सुमारे २५ वर्षांनंतर नव्याने विद्यार्थी परिषद निवडणुकीला सामोरी जात आहेत. या
संदर्भातील संभ्रम, गतानुभव अथवा पूर्वग्रह बाजूला ठेवून सर्व घटकांनी निवडणुका
निकोप वातावरणात यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करावेत, असे
आवाहन शिक्षणतज्ज्ञ आनंद मापुसकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित
एकदिवसीय कार्यशाळा आज वि.स. खांडेकर भाषा भवनमध्ये पार पडली. या परिषदेच्या
उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू
डॉ. डी.टी. शिर्के होते. कोल्हापूर विभागाचे उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. अजय
साळी व कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते.
|
Anand Mapuskar |
आनंद मापुसकर म्हणाले, महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या लिंगडोह
समिती आणि वेळुकर समिती या दोन समित्यांच्या शिफारशींचा अभ्यास करून विद्यार्थी
परिषद निवडणुकीच्या संदर्भातील कार्यवाहीचे स्वरुप निर्धारित केले आहे. उत्तम राजकीय
नेतृत्व शैक्षणिक क्षेत्रामधून निर्माण व्हावे, अशी स्वतः विद्यार्थी चळवळीमधून
पुढे आलेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची अपेक्षा आहे. मात्र,
या निवडणुकांमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या
गैरप्रकारांना आळा बसेल, अशाच स्वरुपाचे एकरुप परिनियम शासनाने तयार केले आहेत.
अगदी कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप या विद्यार्थी निवडणुकांत असणार नाही.
तसे निदर्शनास आल्यास उमेदवारी रद्द करण्यापर्यंतच्या तरतुदी यात केल्या आहेत. कोणत्याही
कायद्याचे यश हे त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये असते. त्यामुळे विद्यापीठ व
महाविद्यालयांतील संबंधित घटक या निवडणूकविषयक परिनियमांतील तरतुदींची किती प्रभावीपणे
अंमलबजावणी करतात, यावर अवलंबून आहे. कायद्यात ठोस तरतुदी आहेत, त्याची कडक
अंमलबजावणी पहिल्या निवडणुकांपासूनच केली तर पुढील निवडणुकांमध्ये त्याचे सकारात्मक
परिणाम दिसून येतील. विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाच्या कामकाजाची कार्यकारी
यंत्रणेसंदर्भातील एकरुप परिनियमांचीही अंमलबजावणी तातडीने करण्याची गरज
असल्याचेही मापुसकर यांनी नमूद केले.
अमित कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित
घटकांसाठी मध्यवर्ती कार्यशाळा घेणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले
असल्याचे सांगितले. नजीकच्या काळात जिल्हा स्तरावर अग्रणी महाविद्यालय
योजनेअंतर्गत महाविद्यालयांतही कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यालाही
सर्वांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
|
Dr. D. T. Shirke |
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, पूर्वी
१९७४च्या विद्यापीठ कायद्यानुसार झालेल्या निवडणुका आणि सध्याच्या विद्यापीठ
कायद्यानुसार घेण्यात येत असलेल्या निवडणुका यांतील फरक सर्व संबंधित घटकांनी
समजावून घ्यायला हवा. या निवडणुकांमध्ये कोणत्याही गैरप्रकाराला अजिबात स्थान
नाही. हा कायदा अधिक विद्यार्थीकेंद्रित आहे. विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांचा
विकास करण्यासाठी निवडणुकांचा अंतर्भाव कायद्यात केला आहे. माजी कुलगुरू प्रा.
आर.एस. माळी, प्रा. राव यांच्यासह श्री. मापुसकर आदींनी या संदर्भातील कलमे व परिनियम
तयार करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. प्रत्येक कलम अत्यंत विचारपूर्वक तयार केले
आहे. त्यामुळे त्यातील तरतुदी समजून घेऊन दोन महिन्यांच्या आत विद्यार्थी परिषद
निवडणुकीची प्रक्रिया मार्गी लावण्याच्या दृष्टीने सर्वांनी सकारात्मक प्रयत्न
करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनीही
मार्गदर्शन केले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून कार्यशाळेचे
उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी
स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
कार्यशाळेत दिवसभरातील विविध तांत्रिक सत्रांमध्ये प्र-कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के यांनी ‘रेग्युलेटरी
फ्रेमवर्क ऑफ इलेक्शन्स’, आनंद मापुसकर
यांनी ‘प्रोसिजरल अस्पेक्ट्स ऑफ इलेक्शन्स’ आणि डॉ. आर.व्ही. गुरव यांनी ‘टाइमलाइन फॉर इलेक्शन प्रोग्राम’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment