Tuesday, 12 March 2024

यशवंतराव चव्हाण यांच्याकडून पुरोगामी, सुसंस्कृत महाराष्ट्राची पायाभरणी: डॉ. अंबादास मोहिते

 

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. अंबादास मोहिते.

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. अंबादास मोहिते. मंचावर (डावीकडून) डॉ. नितीन माळी, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व डॉ. उमेश गडेकर

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. उमेश डेकर, डॉ. अंबादास मोहिते व डॉ. नितीन माळी आदी

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त प्रतिमापूजन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवर, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आदी.


कोल्हापूर, दि. १२ मार्च: महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान आहे. पुरोगामी, सुसंस्कृत आणि विकसित महाराष्ट्राची पायाभरणी यशवंतरावांनी केली, असे प्रतिपादन अमरावती येथील डॉ. अंबादास मोहिते यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासन, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्या वतीने 'महाराष्ट्राची जडणघडण आणि यशवंतराव चव्हाण' या विषयावर अमरावती येथील महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते.

डॉ.अंबादास मोहिते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा आणि पुढाकार होता.  राजकीय, सामाजिक, आर्थिक, सहकार, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्र असेल अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याची छाप उमटवणारे नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्वाचे गुण धारण करणारे, संयमी, धीरोदात्त, गुणग्राहकता, उत्तम प्रशासक आणि भविष्याचा वेध घेणारे असे त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करताना राज्याची भविष्यकालीन वाटचाल कशी सुखकर होईल, हे त्यांनी जाणीवपूर्वक पाहिले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते या देशाचे संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, देशाचे उपपंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी कार्य केले. या माध्यमातून त्यांनी राज्य पातळीवर आणि देश पातळीवर आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखविली. प्रचंड वाचन, चिंतन, मनन यांतून त्यांची वैचारिक जडणघडण झाली. त्यांच्यावर महात्मा गांधी, शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता. या प्रगल्भ वैचारिक बैठकीतूनच त्यांनी महाराष्ट्राला नवीन दिशा दिली.  यशवंतरावांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये माणसे तयार केली, नेतृत्व फुलवले. त्यातून सर्व क्षेत्रातील माणसे पुढे आली आणि महाराष्ट्र साकार झाला. 

महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाकरिता सहकार क्षेत्रामध्ये भरीव कार्य होणे आवश्यक आहे, या भावनेतून यशवंतरावांनी काम केल्याचे सांगून डॉ. मोहिते म्हणाले, डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या मदतीने सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया महाराष्ट्रात रूजविला. सहकार क्षेत्राला कायद्याचे आणि संस्थात्मक स्वरूप देण्याचे काम त्यांनी केले.  त्यांच्या कार्यकाळामध्ये १८ सहकारी साखर कारखाने सुरू झाले. सहकारी कामगार संस्था, सहकारी ग्राहक भांडार, सहकारी खरेदी विक्री संघ सुरू झाले. सहकारातून विकास साधण्यासाठी वेळप्रसंगी सहकाऱ्यांची मदत घेतली. योग्य व्यक्तींची, योग्य वेळी, योग्य ठिकाणी निवड करणे हे यशवंतराव चव्हाणांच्या उत्तम प्रशासनाचे सूत्र होते.  उत्तम प्रशासक म्हणूनही त्यांचे नांव लौकिक होते.  महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्य व्यवस्था अधिक मजबूतपणे रूजली त्याचे संपूर्ण श्रेय यशवंतराव चव्हाणांना जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, सामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून यशवंतरावांनी कार्य केले. त्यांनी देशामधील कोयना धरणासारख्या मोठया प्रकल्पांची उभारणी पूर्ण केली. उद्योगांचा विकास साधण्यासाठी औद्योगिक वसाहती स्थापण्याचा प्रारंभ केला. ऑटोमोबाईल हबसाठी पुणे येथील भोसरीची जागा त्यांनी निश्चित केली.  लोकांना सामाजिक न्याय देण्याचा मूळ उद्देश होता. सामाजिक न्यायाचे ते मोठे पुरस्कर्ते होते.  १९६१ मध्ये वतनदारी पध्दती रद्द करण्याचे काम यशवंतरावांनी केले. विरोधकांनी टीका केली तरी त्यांच्या मतांचा आदर व सन्मान करीत होते. त्यामुळे राज्यात आणि देशात लोकशाही रूजली आणि समृध्द झाली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे. व्यवस्थापनाची जोड फक्त पुस्तकी नसून माणसाच्या कार्य कर्तृत्वामध्येही असते, हे यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिलेले आहे. त्यांचे विचार समजावून घेवून आचरणात आणले पाहिजे आणि आत्मसातही केले पाहिजेत. 

सुरूवातीला यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटचे प्रभारी संचालक डॉ. नितीन माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. उर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले. यशवंतराव चव्हाण अध्यासनाचे समन्वयक डॉ. उमेश गडेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. अमोल मिणचेकर, डॉ. प्रल्हाद माने, डॉ.कविता वड्राळे यांच्यासह विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट येथे यशवंतराव चव्हाण यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी केले. या प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, डॉ.अंबादास मोहिते, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, श्रीमती शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ.भारती पाटील, डॉ.नितीन माळी, डॉ.उमेश गडेकर, डॉ.अमोल मिणचेकर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment