शालेय विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया; कीटक प्रदर्शनाचा समारोप
शिवाजी विद्यापीठात आयोजित कीटक प्रदर्शन पाहण्यासाठी अखेरच्या दिवशीही शालेय विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली.
कोल्हापूर, दि. १५ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे
आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीटक प्रदर्शनामुळे कीटकविश्वाकडे पाहण्याचा आमचा
दृष्टीकोन बदलून गेला. यापुढे आम्ही कीटकांना, मधमाशांना मारणार नाही, तर त्यांना
जगविणार, कारण ते जगले, तरच आपण जगू शकू, अशी भावना आज अखेरच्या दिवशी अनेक
विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
विद्यापीठात आयोजित
तीनदिवसीय कीटक प्रदर्शनाला दररोज सरासरी पाच हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि
नागरिकांनी भेट दिली. आज अखेरच्या दिवशी तर गर्दीचा उच्चांक गाठला गेला. तरीही
अभ्यागत शिक्षक, विद्यार्थ्यांनी अत्यंत चोख शिस्तीचे पालन करून प्रदर्शनाचा लाभ घेतला.
तिन्ही दिवसांत मिळून पंधरा हजारांहून अधिक जणांनी प्रदर्शन पाहिले.
प्रदर्शन पाहिल्यानंतर
अनेक अभ्यागतांनी याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. सिद्धांत खोत या शालेय विद्यार्थ्याने
सांगितले की, या प्रदर्शनामुळे माझा कीटकांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. पूर्वी
मला त्यांची कीळस वाटायची आणि मी त्यांना मारुन टाकायचो. आता मात्र मी कीटक मारणार
नाही. त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी माझी आहे, हे मला समजले.
आर्या हडपल या
विद्यार्थिनीने सांगितले की, पर्यावरणामध्ये इतके वैविध्यपूर्ण कीटक, फुलपाखरे
आहेत, हे मला पहिल्यांदाच समजले. त्यांच्यामुळेच जीवसृष्टीचे अस्तित्व कायम आहे.
जैवसाखळीमधील त्यांचे महत्त्व येथील संशोधकांनी आम्हाला सांगितले. त्यामुळे या
कीटकवर्गाची हानी होणार नाही, यासाठी आपण मिळून प्रयत्न करायला हवेत.
संजय डावत इंटरनॅशनल
स्लूकचे शिक्षक इंद्रजीत थोरात म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाने या प्रदर्शनाच्या
माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनाही पर्यावरणविषयक जनजागृतीच्या कार्यात सहभागी
करून घेतले, ही बाब राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी अत्यंत सुसंगत आहे. यापुढील
काळातही असे विद्यार्थीभिमुख उपक्रम आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली.
विद्या ताकवले या पालक
आपल्या मुलाला प्रदर्शन दाखविण्यासाठी घेऊन आल्या होत्या. त्या म्हणाल्या, या
प्रदर्शनामुळे केवळ मुलालाच नाही, तर मलाही अनोख्या कीटकविश्वाची ओळख झाली. कीटक
आपल्या पर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना जपायला हवे, याची जाणीव
झाल्याचे त्यांनी सांगितले.
विभागाच्या ३५ वर्षांतील संशोधनाचे फलित
शिवाजी विद्यापीठातील
प्राणीशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी गेल्या ३५ वर्षांत वन विभाग आणि जैवविविधता
मंडळ यांच्या सौजन्याने संशोधनासाठी विविध कीटक परिसरातील निसर्गसंपदेमधून संकलित
केले आहेत. भावी पिढीमध्ये या कीटकांविषयी जाणीवजृती व्हावी म्हणून यामधील विविध
प्रजातींच्या २२०० कीटकांचे प्रदर्शन मांडले. यासाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के,
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सर्वच
अधिकाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे समन्वयक डॉ. सुनील गायकवाड यांनी
सांगितले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या समस्त शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य,
मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक आणि नागरिकांना त्यांनी
धन्यवाद दिले.
परजिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांचीही भेट
या प्रदर्शनाला
कोल्हापूर शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्याच.
त्याबरोबरच हेर्ले, उजळाईवाडी, तामगांव, दुधाळ, पेठ वडगांव, इचलकरंजी, गडहिंग्लज,
कुंभोज, शिरोळ, निपाणी, चंदगड, जत, सांगली या ठिकाणच्या शाळा-महाविद्यालयांनीही
भेटी दिल्या.
No comments:
Post a Comment