Monday, 4 March 2024

शिवाजी विद्यापीठात लवकरच मर्दानी खेळांचा अभ्यासक्रम: कुलगुरू डॉ. शिर्के

 शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवाला उत्साही प्रारंभ

 

शिवाजी विद्यापीठात चारदिवसीय शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या क्रीडाज्योत प्रज्वलन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर अधिकारी आणि खेलो इंडिया स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे विद्यापीठाचे क्रीडापटू.

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात विद्यापीठाचा योगा चमू प्रात्यक्षिके सादर करताना.

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात कोल्हापूरचे ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांची सुप्रसिद्ध पोझ सादर करताना मल्लखांबपटू विद्यार्थी.

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात सादरीकरण करताना विद्यापीठाचे मल्लखांबपटू

शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मान्यवरांना मानवंदना देताना सहभागी अधिविभागांचे संघ.

(शिवस्पंदन क्रीडा महोत्सव उद्घाटन समारंभाची चित्रफीत)

कोल्हापूर, दि. ४ मार्च: शिवाजी विद्यापीठात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मर्दानी खेळांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केली.

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलाच्या मैदानावर आजपासून चार दिवसीय शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला. त्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. क्रिकेट, बास्केटबॉल, रस्सीखेच, बॅडमिंटन, कबड्डी, बुद्धीबळ, ॲथलॅटिक्स आणि मॅरेथॉन या आठ क्रीडा प्रकारांत होणाऱ्या या स्पर्धेत विद्यापीठ कॅम्पसवरील सुमारे १७५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवकालीन मर्दानी खेळांची परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत पूर्वापार रुजली आहे. पुरूषांमध्ये कौशल्य आणि महिलांमध्ये आत्मसन्मान व स्वसंरक्षण या भावना रुजविण्याच्या दृष्टीने या खेळांना वर्तमानामध्येही महत्त्व आहे. त्या दृष्टीने पुढील वर्षीपासून प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने पदविका आणि पदवी अशा पद्धतीने त्याचा विकास करण्याचा मानस आहे.

यावेळी सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून तसेच ध्वजवंदनाने स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगेही सोडण्यात आले. त्यानंतर खेलो इंडिया स्पर्धेत विविध क्रीडाप्रकारांत पदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हस्ते क्रीडाज्योत समारंभस्थळी आणण्यात येऊन कुलगुरूंच्या हस्ते तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. स्पर्धेत सहभागी विविध अधिविभागांच्या खेळाडूंना अतिशय देखणे संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, ऊर्जासंवर्धन, वनसंवर्धन, विकसित भारत, शेतकरी आत्महत्यामुक्ती, विविधतेतून एकता, शाश्वत विकास अशा विविध सामाजिक विषयांवरील जागृतीपर फलक घेऊन खेळाडू संचलनात सहभागी झाले. इतिहास अधिविभागाची शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू स्वप्नाली वायदंडे हिने सर्व खेळाडूंना शपथ दिली.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते खेलो इंडिया स्पर्धेत पदकविजेती कामगिरी करून विद्यापीठ संघाला स्पर्धेत ११वे स्थान प्राप्त करून देणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये स्पर्धेत अजिंक्य राहणाऱ्या महिला रग्बी संघासह मल्लखांब संघाचा आणि वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या अपेक्षा ढोणे (वेटलिफ्टिंग), श्रावणी शेळके (कुस्ती), पृथ्वीराज डांगे (जलतरण), सुमेध सासणे (शूटिंग) यांचा समावेश होता. त्यांचे प्रशिक्षक दीपक पाटील, अर्जुन पिटुक, डॉ. सी.एस. गिरी होते.

यावेळी गारगोटी तालुक्यातील वेणुग्राम येथील सव्यसाची गुरूकुलमच्या पथकाने लखन जाधव, श्रीकांत लुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. विद्यापीठाच्या जिम्नॅस्टीक्स, मल्लखांब, योगा, बॉक्सिंग आणि धनुर्विद्येच्या संघातील खेळाडूंनीही सुमारे तासभर अतिशय नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एन.डी. पाटील आणि किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह डॉ. आय.एच. मुल्ला, डॉ. प्रशांत पाटील, सुभाष पवार, सुरेश धुरे, एन.आर. कांबळे, पी.ए. सरनाईक, सविता भोसले आणि मनिषा शिंदे आदी शारीरिक शिक्षण संचालक व प्रशिक्षक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment