Friday 27 November 2020

‘शहीद संग्राम पाटील यांच्या कार्याचा विद्यापीठास अभिमान’

 

शहीद संग्राम पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

शहीद संग्राम पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के


कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

कोल्हापूर, दि. २७ नोव्हेंबर: निगवे खालसा (ता. करवीर) येथील शहीद संग्राम पाटील यांनी देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या कार्याचा शिवाजी विद्यापीठ परिवारास अभिमान आहे. त्यांच्या हौतात्म्यामुळे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दुःखात विद्यापीठ परिवार सहभागी आहे, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आणि पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले.

शहीद दिनाच्या संध्येला (दि. २६ नोव्हेंबर) कुलगुरू डॉ. शिर्के यांनी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांच्यासमवेत शहीद संग्राम पाटील यांचे वडील शिवाजी रामचंद्र पाटील यांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

शिवाजी विद्यापीठातर्फे शहीद लष्करी, निमलष्करी जवान आणि शहीद पोलीस यांच्या अपत्यांना सर्व शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्या कुटुंबातील पाल्याने शिवाजी विद्यापीठ अधिविभाग अथवा संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास त्याचा संपूर्ण शैक्षणिक खर्च शिवाजी विद्यापीठाच्या वतीने करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी पाटील कुटुंबियास आश्वस्त केले.

भारतीय भक्ती परंपरा वैविध्यपूर्व आणि सर्वसमावेशक: निहारिका गुप्ता

 

निहारिका गुप्ता
कोल्हापूर, दि. २७ नोव्हेंबर: भारतीय भक्ती परंपरा वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाची आहे. या भक्ती परंपरांचा प्रभाव मानवी जीवन समूहावर कायम राहिला आहे. या भक्ती परंपरेचे अनेक विशेष दुर्लक्षित राहिले आहेत. संशोधनाच्या भूमिकेतून पाहिले गेल्यास या भक्ती परंपरेतील अनेक नवे पैलू आपल्या हाती लागतील, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील निहारिका गुप्ता यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग नवी दिल्लीतील सहपीडिया यांच्या वतीने आयोजित 'मराठी भक्ती चळवळ संशोधन दस्तऐवजीकरण' या विषयावरील तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.

मराठी भक्ती चळवळीचे आविष्कार आणि संशोधनाची गरज यासंबंधी गुप्ता यांनी भूमिका मांडली. भक्ती आणि फी संप्रदायः परंपरा, वैविध्यता, आविष्कारातील वैविध्य या विषयासंदर्भात निहारिका गुप्ता यांनी अनेक जुने संदर्भ देत मांडणी केली. सगुण-निर्गुण भक्ती परंपरा आणि संप्रदायपरत्वे त्याचे बदलते स्वरुप याचा आढावा घेतला. तमीळ, संस्कृत भाषेतील भक्तीसाहित्याचे वेगळेपण त्यांनी कथन केले. दक्षिण राज्यातील भक्ती परंपरा, शैव, वैष्णव, लिंगायत भक्ती संप्रदायाचा असणारा परस्परसंबंध यासंबंधी विवेचन केले. मौखिक परंपरा, भाषिक वैविध्य, भक्ती परंपरेचे जपले गेले वेगळेपण, त्याचा जनजीवनावर पडलेला प्रभाव आणि काळानुरूप या परंपरेतील स्थित्यंतरे यांचा आढावा त्यांनी घेतला.

प्रा. कार्तिक
दुसऱ्या सत्रात प्रा. कार्तिक यांनी भक्ती परंपरा संशोधन सद्य:स्थिती या संबंधी विचार व्यक्त केले. यामध्ये उत्तरेकडील संप्रदाय, मुस्लीम भक्तिसंप्रदाय आणि त्यांची साहित्य परंपरा याविषयी मौलिक विवेचन केले. नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, दादू दयाल पंथ या संप्रदायाची वेगवेगळ्या राज्यात असणारी भक्ती परंपरा, तिची वाटचाल ,उत्सव परंपरा यासंबंधी अनेक संदर्भ त्यांनी दिले. दंतकथा आणि मिथकातून निर्माण झालेली भक्तीपरंपरा आणि तिचे साहित्यावर पडलेले प्रतिबिंब याचा त्यांनी उलगडा केला. चित्र आणि शिल्पातून अनेक संप्रदायाचे ऐतिहासिक अवशेष आजही टिकून आहेत. ज्याकडे संशोधन नजरेने पाहणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. डॉ. उत्तमकुमार यांनीही चर्चेत सहभाग घेतला. या ऑनलाईन कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी संतसाहित्यात रुची असणारी अनेक मंडळी सहभागी झाली. सदर कार्यशाळा २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

या ऑनलाईन कार्यशाळेचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले. स्वागत व पाहुण्यांचा परिचय डॉ. नंदकुमार मोरे यांनी करून दिला.