Monday 28 June 2021

पत्रकारितेतून गुन्हेगारीचे उदात्तीकरण नको: पोलीस उपायुक्त मितेश घट्टे

शिवाजी विद्यापीठात आयोजित ऑनलाईन व्याख्यानास मोठा प्रतिसाद

मितेश घट्टे
कोल्हापूर, दि. २८ जून: पत्रकारितेला मोठी परंपरा आणि ऐतिहासिक वारसा आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून कोणत्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण होऊ नये, असे आवाहन पुण्याचे पोलिस उपायुक्‍त मितेश घट्टे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने आयोजित गुन्हेगारी बातम्या आणि पत्रकारांची जबाबदारीया विषयावर ते बोलत होते. या ऑनलाईन व्याख्यानाला कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पत्रकारांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपायुक्त घट्टे म्हणाले, पत्रकारांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. काळानुरूप गुन्ह्यांच्या स्वरूपात बदल होत आहे. या बदलाची नोंद पत्रकारांनी घ्यावी. निष्पक्ष, तटस्थ आणि जबाबदार पत्रकारिता समाजाला पुढे घेऊन जाते. पत्रकारांना माहिती मिळविण्यासाठी अनेक स्रोतांकडून माहिती घ्यावी लागते. परंतु ही माहिती वस्तुनिष्ठ आहे का, याचा विचारही पत्रकारांनी करायला हवा. पोलिस यंत्रणा पत्रकारांना अधिकृत माहिती देतात. या माहितीवर पत्रकारांनी विश्‍वास ठेवावा.

ते म्हणाले, सूत्रांची माहिती किंवा ऐकीव माहिती दिल्याने अनेकवेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. माहितीची खात्री होणार नसेल, तर अशी माहिती टाळणे योग्य ठरेल. घाईने माहिती देणे अंगलट येऊ शकते. कोणत्याही घटनेचा विविध अंगाने परामर्श घेणेही तितकेच गरजेचे आहे. अलिकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून विकृती जन्माला येऊ पाहत आहे. आर्थिक फसवणुकीसह अनेक प्रकारची व्हाईट कॉलर गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. अशा वेळी पत्रकारांबरोबरच पोलिस प्रशासनाचीही जबाबदारी वाढली आहे. पोलिस आणि पत्रकार यांनी एकत्र येऊन अशा अपप्रवृत्तींचा मुकाबला करणे आवश्यक आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात गुन्हेविषयक पत्रकारिता करत असताना संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेकडे पाहावे, असे आवाहन घट्टे यांनी केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रस्तावना केली. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.


Saturday 26 June 2021

शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

फुले, शाहू, आंबेडकरांच्या मार्गानेच राष्ट्रीय एकात्मता जोपासणे शक्य: डॉ. जयसिंगराव पवार

 

शिवाजी विद्यापीठातर्फे शाहू जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात 'राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता' या विषयावर बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार


शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत डॉ. जयसिंगराव पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा संचालक जी.आर. पळसे, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. अवनिश पाटील डॉ. आर.व्ही. गुरव आदी.

शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू संशोधन केंद्रात शाहू जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत डॉ. जयसिंगराव पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा संचालक जी.आर. पळसे, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. अवनिश पाटील डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. देविकाराणी पाटील आदी.


राजर्षी शाहू महाराज यांच्या दसरा चौकातील पुतळ्यास अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत डॉ. अशोक चौसाळकर, शाहीर आझाद नायकवडी आदी.


कोल्हापूर, दि. २६ जून: राष्ट्राची एकता, अखंडता, बंधुता जोपासण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांनी आखून दिलेल्या मार्गावरुनच चालावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानामध्ये ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिव-वार्ता या युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.


डॉ. जयसिंगराव पवार

डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये जे राजकीय, सामाजिक योगदान दिले, त्या कार्याची व्याप्ती पाहता, ते खऱ्या अर्थाने राष्ट्रबांधणीचे, राष्ट्र उभारणीचे कार्य होते, हे जाणवल्याखेरीज राहात नाही. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बांधणीला घटनेच्या साच्यात सुस्वरुप आकार देण्याचे कार्य केले. आज त्या कार्याला आव्हान देण्याचे घातक प्रयत्न होत आहेत. आपले राष्ट्र हे कोण्या एका धर्माचे नसून सर्व धर्मियांचे आहे, अशी समभावाची भावना जोपासली जाणे, वृद्धिंगत होणे ही फार महत्त्वाची बाब आहे. राष्ट्र टिकवायचे असेल तर आपण सर्व धर्मांचे आहोत, ही भावना दृढमूल होणे आवश्यक आहे. भावना भडकावणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर राहावयाचे असेल, तर स्वतः शहाणे होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय आहे. महात्मा फुले यांच्यापासून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत बहुजन समाजाच्या हरेक नेतृत्वाने समाजाचा सामूहिक शहाणपणा कसा वाढेल, याकडे लक्ष केंद्रित केलेले होते. या सामूहिक शहाणपणाच्या व्याप्तीवरच देशाचे शहाणपण, देशाचा सर्वधर्मसमभाव या गोष्टी अवलंबून असतात.

डॉ. पवार पुढे म्हणाले, लोकशाहीवादी आणि मानवी मूल्यांवरच राष्ट्र ही संकल्पना आधारित आहे. राजकीय स्वातंत्र्य हे त्यातले एक मूल्य आहे. ती एक आवश्यकता आहे, मात्र केवळ तेच म्हणजे राष्ट्र समजणे गैर आहे. स्वातंत्र्यप्राप्तीला पाऊणशे वर्षे झाली तरी अद्यापही आपल्यातला भेदभाव, अज्ञान, परस्परांमधला कटुताभाव दूर होऊ शकलेला नाही. परस्परद्वेषाच्या पायावर कोणतेही राष्ट्र उभारू शकत नाही. आपल्यातले भेद जितक्या लवकर दूर होतील, तितके एक राष्ट्र म्हणून आपण मजबूत होऊ. हा राष्ट्र मजबुतीचा विषय आपल्या राष्ट्रपुरूषांच्या कार्यक्रमपत्रिकेवरचा सर्वाधिक महत्त्वाचा विषय होता, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्या दृष्टीने आपण एक राष्ट्र होण्याकडे वाटचाल करणे ही आजची खरी गरज आहे.


कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, समाजातल्या सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार हा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा पाया होता. प्रत्येक घटकासाठी त्यांनी दूरगामी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे आपल्याला दिसते. केवळ शिक्षणाच्या बाबतीत जरी विचार केला तरी सुद्धा शंभर वर्षांपूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करणाऱ्या आणि त्याचा लाभ समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपडणाऱ्या या लोकराजाच्या द्रष्टेपणाचे आश्चर्य आणि कौतुक वाटल्याखेरीज राहात नाही. आपल्या धोरणांचे लाभ केवळ आपल्या संस्थानापुरतेच मर्यादित न राखता संस्थानाबाहेरील शिक्षण संस्था, वसतिगृहे यांना भरीव स्वरुपाचा निधी मदत स्वरुपात महाराज पाठवित असत. शाहू महाराजांचा परीसस्पर्श झाला नाही, असे कोणतेही क्षेत्र नाही. कला, संगीत, शेती, सहकार, जलसिंचन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे राष्ट्रनिर्मितीचेच कार्य आहे.

या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्याचप्रमाणे राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक डॉ. जयसिंगराव पवार, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एन.बी. गायकवाड, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. अवनिश पाटील, डॉ. देविकाराणी पाटील, सचिन घोरपडे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी, सकाळी आठ वाजता कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळास भेट देऊन राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्याचप्रमाणे दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासही त्यांनी अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, शाहीर आझाद नायकवडी आदी उपस्थित होते.

  

Monday 21 June 2021

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

ऑनलाईन प्रात्यक्षिकांत ११०० नागरिकांचा सहभाग

 

शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन योग प्रात्यक्षिकांत सहभागी झालेले कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन योग प्रात्यक्षिकांत सहभागी झालेले प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील

शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन योग प्रात्यक्षिकांत सहभागी झालेले कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर





आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ऑनलाईन योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभागींना योग प्रात्यक्षिके दाखविताना योग प्रशिक्षक सूरज पाटील आणि त्यांनी सादर केलेले विविध योग प्रकार




कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठातर्फे आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या योग प्रात्यक्षिकांना साधकांचा उत्साही प्रतिसाद लाभला. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह सुमारे ११०० जणांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली आणि योग सराव केला.

शिवाजी विद्यापीठातर्फे दि. २१ जून २०१५पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन विद्यापीठ परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शेकडो नागरिकांचा या योग प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. त्याचप्रमाणे सन २०१५पासून आजतागायत योग सराव व प्रशिक्षणाचा कार्यक्रम विद्यापीठाने दैनंदिन स्वरुपात विनामूल्य पद्धतीने चालविला आहे. त्याचा नागरिक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर सदरची योग प्रात्यक्षिके ऑनलाईन स्वरुपात आयोजित केली जातात.

यंदाही कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज सकाळी ७ वाजता योग प्रशिक्षक सूरज पाटील यांनी विद्यापीठाच्या शिव-वार्ता युट्यूब वाहिनीवरुन योग साधकांना एक तास योग प्रात्यक्षिके दाखविली व अतिशय सोप्या पद्धतीने त्यांचे महत्त्व समजावून सांगितले. या ऑनलाईन प्रात्यक्षिकांचा लाभ सुमारे ११०० योग साधकांनी घेतला.

या ऑनलाईन प्रात्यक्षिकांमध्ये शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, विविध अधिकार मंडळांचे सदस्य यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, संस्थाचालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. या सर्व सहभागींचे कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी अभिनंदन केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

दरम्यान, विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ऑनलाईन स्वरुपात योग मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले. यामध्ये ४९ जण सहभागी झाले. योग प्रशिक्षक श्वेतलीना पाटील यांनी आनंददायी जीवनासाठी योग या विषयावर मार्गदर्शन केले; तसेच वेगवेगळ्या योग प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करून माहिती दिली. डॉ.  ए.एम. गुरव यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. अतुल एतावडेकर यांनी आभार मानले.

Saturday 19 June 2021

शिवाजी विद्यापीठात मियावाकी जंगल निर्मितीस प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात गर्द वनराईच्या लागवडप्रसंगी वृक्षारोपण करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

शिवाजी विद्यापीठात गर्द वनराईच्या लागवडप्रसंगी वृक्षारोपण करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील.

वृक्षलागवड करताना विद्यापीठाच्या उद्यान विभागाचे कर्मचारी.


शिवाजी विद्यापीठात मियावाकी जंगल लागवडीस प्रारंभ (व्हिडिओ) 


कोल्हापूर, दि. १९ जून: जलसंवर्धनाच्या कामाबरोबरच आता शिवाजी विद्यापीठाने गर्द वनराईची निर्मिती हाती घेऊन जैवविविधता विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठ परिसरात आज मियावाकी जंगल (दाट वनराई) निर्मितीच्या अभिनव उपक्रमास कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

शिवाजी विद्यापीठ परिसरातील जैवविविधता विकासासाठीचे हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मतही कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केले.

मियावाकी जंगल ही दाट वृक्षारोपणाची मूळ जपानी संकल्पना असून त्याअंतर्गत विविध प्रकारच्या प्रजातींची गर्द, दाट वनराई होईल, अशा प्रकारे लागवड करण्यात येते. यामुळे सदर परिसरात वनस्पतींच्या वैविध्यतेबरोबरच जैववैविध्यतेचाही मोठ्या प्रमाणात विकास होतो. विविध प्रकारचे पशु-पक्षी या वनराईच्या आश्रयास राहावयास येतात.

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या शेजारील परिसरामध्ये आज मियावाकी जंगल लागवडीस कुलगुरूंच्या हस्ते जांभूळ रोप लावून प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते बहावा आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते कांचन रोपे लावण्यात आली. त्यानंतर या साधारण साडेसात गुंठ्यांच्या परिसरात बहावा, कांचन, जांभूळ, चिंच, विलायती चिंच, फणस, जास्वंद, अडुळसा, रातराणी, तगर, चाफा, धावडा आणि बांबू अशा तेरा प्रजातींच्या एकूण ९५८ रोपांची लागवड करण्यात आली.

ही सर्व रोपे शिवाजी विद्यापीठाच्या रोपवाटिकेत तयार करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारे विद्यापीठाच्या परिसरात दहा विविध ठिकाणी मियावाकी जंगलांची निर्मिती करण्याचा मानस आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी या प्रसंगी दिली. 

Friday 18 June 2021

राष्ट्रीय सेवा योजनेचे कोरोना काळातील

कार्य अभिमानास्पद: अजयकुमार बन्सल

 

 

अजयकुमार बन्सल


कोल्हापूर, दि. १८ जून: राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयीन पातळीवर कार्यरत असलेल्या संघटनेचे सामाजिक कार्य गौरवास्पद स्वरुपाचे आहे. शिवाजी विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजना  सध्या या परंपरेला अनुसरूनच कोरोनविरुद्धच्या लढाईत अत्यंत सक्रियपणे योगदान देत आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी काल सायंकाळी येथे केले. शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे आयोजित माझं गाव, कोरोनामुक्त गाव अभियानाअंतर्गत वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने माझं गाव, कोरोनामुक्त गाव हे अभियान  सातारा जिल्ह्यात १४० गावांत सुरू  आहे. या अनुषंगाने कोरोना योद्धा समिती, ग्रामस्थ स्वयंसेवक- स्वयंसेविका यांना मार्गदर्शनपर उपक्रम आयोजित केले जात आहे. याअंतर्गत सदर वेबिनारचे आयोजन केले होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील अध्यक्षस्थानी होते.

अजयकुमार बन्सल म्हणाले की, सातारा जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्त होण्याकडे असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे आपण गाफील राहता कामा नये. आपल्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे या कोरोनाच्या युद्धात एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांची भूमिका मोलाची आहे. शिवाजी विद्यापीठाने त्यासाठी घेतलेला पुढाकार व प्रोत्साहन मौलिक आहे.

यावेळी त्यांनी पोलीस दलाच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहितीही कोविड योद्ध्यांना सांगितली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, कोरोना महामारीने देशाच्या सीमेच्या मर्यादा पार केल्या आहेत. आज असा एकही देश नाही की ज्या देशात कोरोनाने रौद्र रूप धारण केले नाही. भारतात दुसऱ्या लाटेत कोरोनाने खूप हानी पोहोचवली आहे. अशा स्थितीत जनजागृती, समुपदेशनातून मानसिक आधार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन याची गरज ओळखून शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून गावपातळीवरील कार्याची जबाबदारी घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने विद्यापीठाचे स्वयंसेवक काम करीत आहेत, याचा अभिमान वाटतो.

कोरोना काळात पोलीस दलाने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून श्री. बन्सल यांना त्यांनी धन्यवादही दिले. यावेळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेव योजनेचे समन्वयक अभय जायभाये यांनी प्रास्ताविक केले तर शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले. आनंद घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास  महाविद्यालयातील  कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ ऑनलाइन उपस्थित होते.

Wednesday 16 June 2021

क्रीडापटूंनी नियमितपणे योगसरावावर भर द्यावा: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 




कोल्हापूर, दि. १६ जून: शारीरिक व मानसिक संतुलन व स्वास्थ्य राखण्यासाठी क्रीडापटूंनी नियमितपणे योग सरावावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाचा क्रीडा आधिविभाग व कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र. संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉ. पी. टी. गायकवाड,  डॉ. ए. एम. गुरव, समन्वयक, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, डॉ. बी. एन. उलपे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ सदस्य उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील संपूर्ण व्यवहार प्रभावित झाले आहेत. क्रीडा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मैदानावरील नियमित सराव आणि व्यायाम यांना क्रीडापटू मुकले आहेत. त्यामुळे क्रीडापटूंमध्ये अस्वस्थता आहे. आपल्याला या वातावरणाला धीराने सामोरे जाऊन आपली कारकीर्द घडवायची, तर त्यासाठी नियमित योग सराव करण्यास पर्याय नाही. क्रीडा संचालक आणि क्रीडापटू यांनी त्या पद्धतीने आपल्या सरावाची आखणी करावी. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन ऑनलाईन उपलब्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

उद्घाटन सत्रानंतरच्या पहिल्या सत्रात डॉ. देवाशिष बागची यांनी “व्यावसायिक संधी व क्रीडा व्यवस्थापन” या विषयावर विस्तृत विवेचन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. व्यंकट वांगवाड यांनी “कार्यक्षमता व जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी क्रीडा क्षेत्राची भूमिका” या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच वेबिनार मधील सहभागींच्या शंकांचे निरसन केले. तिसऱ्या सत्रात योगा पंडित श्वेतलीना पाटील यांनी “योग व क्रीडा” आणि चौथ्या सत्रात श्री. अरविंद फाळके यांनी “एक्युप्रेशर व खेळाडूंचे आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन केले. वेबिनार यशस्वी होण्यासाठी डॉ. दिपक डांगे-पाटील, डॉ. एम. ए. कदम-पाटील, डॉ. एम. आर. पाटील, सुचय खोपडे, महेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.





Tuesday 8 June 2021

‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२१’

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह ४७ संशोधकांचा समावेश

 

                            डॉ. डी.टी. शिर्के (कुलगुरू)              डॉ. पी.एस. पाटील (प्र-कुलगुरू)


कोल्हापूर, दि. ७ जून: जागतिक पातळीवर वैज्ञानिक जगतात नव्यानेच जाहीर करण्यात आलेल्या ए.डी. सायंटिफिक इंडेक्सतर्फे जाहीर करण्यात आलेल्या वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२१मध्ये नॅक अ++’ मानांकित शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह एकूण ४७ वैज्ञानिक, संशोधकांचा समावेश झालेला आहे.

अमेरिकेच्या मिशीगन विद्यापीठातील प्रा. मूरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर-डॉजर सायंटिफीक इंडेक्स तथा ए.डी. सायंटिफिक इंडेक्सविश्लेषित केलेला आहे. त्यासाठी त्यांनी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा गेल्या पाच वर्षांतील एच-इंडेक्स, आय-टेन इंडेक्स हे निर्देशांक तसेच सायटेशन स्कोअर (उद्धरणे) इत्यादी बाबींचे पृथक्करण केले आहे. जगातल्या १८१ देशांतील १०,६५५ विद्यापीठांतील ५,६५,५५३ संशोधकांचा डाटा त्यांनी संकलित केला. कृषी व वने, कला व स्थापत्य, वाणिज्य व व्यवस्थापन, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, कायदे अभ्यास, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान, नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे यांसह अन्य २५६ उपशाखांमधील संशोधकांचा समावेशही या मानांकनामध्ये करण्यात आला आहे. त्यातून वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२१ जाहीर करण्यात आले आहे.

अत्यंत व्यापक स्तरावर घेण्यात आलेल्या या क्रमवारीमध्ये ++’ मानांकित शिवाजी विद्यापीठाच्या ४७ संशोधकांचा समावेश होणे ही महत्त्वाची बाब आहे. या संशोधकांत स्थान प्राप्त करणारे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के हे संख्याशास्त्र विषयातील एकमेव संशोधक ठरले असून प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांना मटेरियल सायन्स व नॅनोविज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनासाठी क्रमवारीत आघाडीचे स्थान प्राप्त झाले आहे. सदर क्रमवारीत रसायनशास्त्राचे ११, पदार्थविज्ञान व मटेरियल सायन्सचे ९, वनस्पतीशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायनशास्त्र, नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचे प्रत्येकी ३, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, धातूविज्ञान, अन्नविज्ञान या विषयांचे प्रत्येकी २ आणि गणित, फार्मसी व संगणकशास्त्राचे प्रत्येकी १ असे एकूण ४७ आजी-माजी संशोधक समाविष्ट आहेत. संलग्नित महाविद्यालयांतील डॉ. जॉन डिसूझा (फार्मसी), डॉ. टी.जे. शिंदे आणि डॉ. ए.बी. गडकरी (पदार्थविज्ञान) या संशोधकांचाही या यादीत समावेश आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले की, शिवाजी विद्यापीठामध्ये विविध विषयांत सुरू असलेल्या अखंडित संशोधनाचे हे फलित आहे. यापूर्वीही स्टॅनफोर्ड विद्यापीठाने स्कोपस डाटाच्या आधारे जगातल्या आघाडीच्या २ टक्के संशोधकांची यादी जाहीर केलेली होती, त्यामध्येही शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचा समावेश होता. त्या संशोधन कार्याला ए.डी. सायंटिफिक इंडेक्समुळे पुष्टी लाभली आहे. या यादीत समाविष्ट असलेल्या संशोधकांचे कार्य तर अभिनंदनीय आहेच, पण विद्यापीठातील संशोधनकार्य निरंतर चालविणारा प्रत्येक संशोधक, शिक्षक, विद्यार्थी सुद्धा अभिनंदनास पात्र आहे. हा वारसा आणि जागतिक संशोधन क्रमवारीतील हे स्थान वृद्धिंगत होण्याच्या दिशेने विद्यापीठातील समस्त संशोधक कार्यरत राहतील, असा मला विश्वास आहे.

 

ए.डी. सायंटिफिक इंडेक्स क्रमवारीत स्थान लाभलेले शिवाजी विद्यापीठातील संशोधक पुढीलप्रमाणे-

संख्याशास्त्र-

१.      डॉ. डी.टी. शिर्के

पदार्थविज्ञान, मटेरियल सायन्स व धातूविज्ञान-

१.      डॉ. पी.एस. पाटील

२.      डॉ. के. वाय. राजपुरे

३.      डॉ. सी.एच. भोसले

४.      डॉ. आण्णासाहेब मोहोळकर

५.      डॉ. एन. आय. तरवाळ

६.      डॉ. राजेंद्र सोनकवडे

७.      डॉ. टी.जे. शिंदे (के.आर.पी. महाविद्यालय, इस्लामपूर)

८.      डॉ. मानसिंग टाकळे

९.      डॉ. ए.बी. गडकरी (गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर)

१०.  डॉ. विजया पुरी (धातूविज्ञान)

११.  डॉ. सोनल चोंदे (धातूविज्ञान व मटेरियल सायन्स)

 

रसायनशास्त्र-

        डॉ. के.एम. गरडकर

        डॉ. एस.एस. कोळेकर

        डॉ. ए.व्ही. घुले

        डॉ. एस.डी. डेळेकर

        डॉ. जी.बी. कोळेकर

        डॉ. डी.एम. पोरे

        डॉ. राजश्री साळुंखे

        डॉ. एम.बी. देशमुख

        डॉ. डी.एच. दगडे

१०    डॉ. गजानन राशीनकर

११    डॉ. अनंत दोड्डमणी

वनस्पतीशास्त्र-

१.      डॉ. एन. बी. गायकवाड

२.      डॉ. (श्रीमती) एन.एस. चव्हाण

३.      डॉ. डी.के. गायकवाड

 

जैवतंत्रज्ञान व बायोरिमेडिएशन-

१.      डॉ. एस.पी. गोविंदवार

२.      डॉ. ज्योती जाधव

३.      डॉ. नीरज राणे- जैवतंत्रज्ञान अधिविभागातील संशोधक विद्यार्थी (सध्या पुणे विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल संशोधक)

प्राणीशास्त्र-

१.      डॉ. एम.व्ही. शांताकुमार

२.      डॉ. टी.व्ही. साठे

जैवरसायनशास्त्र-

१.      डॉ. के.डी. सोनवणे

२.      डॉ. पंकज पवार

३.      डॉ. (श्रीमती) पी.बी. दंडगे

इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स -

१.      डॉ. पी.एन. वासंबेकर (इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स)

२.      डॉ. टी.डी. डोंगळे (नॅनो-इलेक्ट्रॉनिक्स)

३.      डॉ. आर.आर. मुधोळकर (इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी)

नॅनोसायन्स व तंत्रज्ञान-

१.      डॉ. एस.बी. सादळे

२.      डॉ. एन.आर. प्रसाद

३.      डॉ. किरण कुमार शर्मा

पर्यावरणशास्त्र-

१.      डॉ. पी.डी. राऊत (पर्यावरणशास्त्र)

२.      डॉ. विजय कोरे (पर्यावरण अभियांत्रिकी)

अन्नविज्ञान व अभियांत्रिकी-

१.      डॉ. ए.के. साहू

२.      डॉ. राहुल रणवीर

संगणकशास्त्र-

१.      डॉ. एस.आर. सावंत

गणितशास्त्र-

१.      डॉ. के.डी. कुचे

फार्मसी-

१.      डॉ. जॉन डिसुझा (तात्यासाहेब कोरे फार्मसी महाविद्यालय, वारणानगर)