शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन योग प्रात्यक्षिकांत सहभागी झालेले कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के |
शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन योग प्रात्यक्षिकांत सहभागी झालेले प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील |
शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन योग प्रात्यक्षिकांत सहभागी झालेले कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर |
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ऑनलाईन योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभागींना योग प्रात्यक्षिके दाखविताना योग प्रशिक्षक सूरज पाटील आणि त्यांनी सादर केलेले विविध योग प्रकार |
कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठातर्फे आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या योग प्रात्यक्षिकांना साधकांचा उत्साही प्रतिसाद लाभला. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह सुमारे ११०० जणांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली आणि योग सराव केला.
शिवाजी विद्यापीठातर्फे दि. २१ जून २०१५पासून
दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन विद्यापीठ परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला
जातो. शेकडो नागरिकांचा या योग प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. त्याचप्रमाणे
सन २०१५पासून आजतागायत योग सराव व प्रशिक्षणाचा कार्यक्रम विद्यापीठाने दैनंदिन
स्वरुपात विनामूल्य पद्धतीने चालविला आहे. त्याचा नागरिक मोठ्या संख्येने लाभ घेत
आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर सदरची योग
प्रात्यक्षिके ऑनलाईन स्वरुपात आयोजित केली जातात.
यंदाही कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर
विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्याचा निर्णय
घेण्यात आला. त्यानुसार आज सकाळी ७ वाजता योग प्रशिक्षक सूरज पाटील यांनी
विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ युट्यूब वाहिनीवरुन
योग साधकांना एक तास योग प्रात्यक्षिके दाखविली व अतिशय सोप्या पद्धतीने त्यांचे
महत्त्व समजावून सांगितले. या ऑनलाईन प्रात्यक्षिकांचा लाभ सुमारे ११०० योग साधकांनी
घेतला.
या ऑनलाईन प्रात्यक्षिकांमध्ये शिवाजी
विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, विविध अधिकार मंडळांचे सदस्य
यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील शिक्षक, प्रशासकीय सेवक,
विद्यार्थी, संस्थाचालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. या सर्व
सहभागींचे कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, जनसंपर्क
अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
दरम्यान, विद्यापीठाच्या कौशल्य
व उद्योजकता विकास केंद्र व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या वतीने ज्येष्ठ
नागरिक व महिलांसाठी ऑनलाईन स्वरुपात योग मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात
आले. यामध्ये ४९ जण सहभागी झाले. योग प्रशिक्षक श्वेतलीना पाटील यांनी ‘आनंददायी जीवनासाठी योग’ या
विषयावर मार्गदर्शन केले;
तसेच वेगवेगळ्या योग प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करून माहिती दिली. डॉ. ए.एम. गुरव यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
अतुल एतावडेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment