Wednesday, 16 June 2021

क्रीडापटूंनी नियमितपणे योगसरावावर भर द्यावा: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 




कोल्हापूर, दि. १६ जून: शारीरिक व मानसिक संतुलन व स्वास्थ्य राखण्यासाठी क्रीडापटूंनी नियमितपणे योग सरावावर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाचा क्रीडा आधिविभाग व कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र. संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण डॉ. पी. टी. गायकवाड,  डॉ. ए. एम. गुरव, समन्वयक, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, डॉ. बी. एन. उलपे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ सदस्य उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील संपूर्ण व्यवहार प्रभावित झाले आहेत. क्रीडा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मैदानावरील नियमित सराव आणि व्यायाम यांना क्रीडापटू मुकले आहेत. त्यामुळे क्रीडापटूंमध्ये अस्वस्थता आहे. आपल्याला या वातावरणाला धीराने सामोरे जाऊन आपली कारकीर्द घडवायची, तर त्यासाठी नियमित योग सराव करण्यास पर्याय नाही. क्रीडा संचालक आणि क्रीडापटू यांनी त्या पद्धतीने आपल्या सरावाची आखणी करावी. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन ऑनलाईन उपलब्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

उद्घाटन सत्रानंतरच्या पहिल्या सत्रात डॉ. देवाशिष बागची यांनी “व्यावसायिक संधी व क्रीडा व्यवस्थापन” या विषयावर विस्तृत विवेचन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. व्यंकट वांगवाड यांनी “कार्यक्षमता व जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी क्रीडा क्षेत्राची भूमिका” या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच वेबिनार मधील सहभागींच्या शंकांचे निरसन केले. तिसऱ्या सत्रात योगा पंडित श्वेतलीना पाटील यांनी “योग व क्रीडा” आणि चौथ्या सत्रात श्री. अरविंद फाळके यांनी “एक्युप्रेशर व खेळाडूंचे आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन केले. वेबिनार यशस्वी होण्यासाठी डॉ. दिपक डांगे-पाटील, डॉ. एम. ए. कदम-पाटील, डॉ. एम. आर. पाटील, सुचय खोपडे, महेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.





No comments:

Post a Comment