Saturday, 21 September 2019

शिवाजी विद्यापीठाला ‘आयएसओ’ मानांकन

देशातील चौथे, तर राज्यातील पहिले अकृषी राज्य विद्यापीठ


शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणपत्र प्रदान करताना ट्यू सूद कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी. सोबत (डावीकडून) डॉ. आर.के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अजित थिटे, अनिल साळवी.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणपत्र प्रदान करताना ट्यू सूद कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी. सोबत (डावीकडून)  डॉ. डी.के. गायकवाड, परीक्षा संचालक गजानन पळसे, डॉ. आर.के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अजित थिटे, अनिल साळवी, सुजीत पाटील, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. नमिता खोत.

शिवाजी विद्यापीठाला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याची पत्रकार परिषदेत घोषणा करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) परीक्षा संचालक गजानन पळसे, डॉ. आर.के. कामत, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील आदी.


कोल्हापूर, दि. २१ सप्टेंबर: जागतिक स्तरावर उत्कृष्टतेचा मापदंड निश्चित करणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन (आय.एस.ओ.) या संस्थेकडून येथील शिवाजी विद्यापीठाला सर्वंकष शैक्षणिक गुणवत्तेसाठी आयएसओ- ९००१:२०१५ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ हे देशातील चौथे आणि राज्यातील पहिले अकृषी राज्य विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. आयएसओ प्रमाणपत्रामुळे शिवाजी विद्यापीठाने चालविलेल्या गुणवत्तापूर्ण वाटचालीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह ट्यू सूद साऊथ एशिया प्रा.लि. कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक सुनील जोशी, सहाय्यक व्यवस्थापक (व्यवसाय वृद्धी) अनिल साळवी आणि कोल्हापूर विभागाचे शाखाधिकारी सुजीत पाटील उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक प्रशासन, अभ्यासक्रमांची रचना व निर्मिती, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, संशोधन प्रकल्प, शैक्षणिक उपयोजन व नवतंत्रज्ञानाचा वापर, मूल्यांकन व मूल्यमापन, संबंधित घटकांशी सहसंबंध, परीक्षाविषयक कार्यपद्धती व सुधारणा, निकालाची प्रक्रिया तसेच पदवी प्रदान प्रक्रिया आदी विविध बाबींची सर्वंकष पाहणी करून आयएसओविषयक पाहणी करणाऱ्या संस्थेने शिवाजी विद्यापीठाला आयएसओ ९००१:२०१५ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी राज्यातील विद्यापीठांमध्ये असलेल्या विविध अधिविभाग, विभागांनी स्वतंत्रपणे असे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. पण, संपूर्ण विद्यापीठ म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करणारे शिवाजी विद्यापीठ राज्यातील पहिलेच ठरले आहे, ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. लवकरच येऊ घातलेल्या नॅक पाहणीच्या अनुषंगाने या प्रमाणपत्राचे महत्त्व मोठे आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने (आयक्यूएसी) अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचेही त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने दर्जावृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यापासूनच ही प्रक्रिया सुरू झाली, ती आजतागायत अव्याहतपणाने सुरू आहे. ही प्रक्रिया निरंतर असून ती तशीच सुरू राहण्यासाठी आयएसओसारख्या बाह्य यंत्रणेची तिच्यावर नजर असणे महत्त्वाचे आहे. आता या मानांकनामुळे एक टप्पा आपण गाठला आहे. इथून पुढे हा दर्जा उंचावत नेण्याची जबाबदारी सर्वच संबंधित घटकांवर आहे. त्या जाणीवेतून या पुढील काळात काम होत राहणे आवश्यक आहे. विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन संलग्नित महाविद्यालये सुद्धा आयएसओला सामोरे जाण्यासाठी सज्ज होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विद्यापीठाच्या आयक्यूएसीचे संचालक डॉ. आर.के. कामत म्हणाले, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन ही संस्था जगभरातील विविध वस्तू, सेवा आणि संस्था यांच्याशी निगडित गुणवत्तेचे, दर्जाचे मूल्यांकन करणारी आघाडीची आणि अत्यंत विश्वासार्ह संस्था आहे. परिमाणकारकता, कार्यक्षमता आणि कमीत कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त उत्पादकता अशा विविध निकषांवर गुणवत्तेचे निर्धारण या संस्थेकडून करण्यात येते. जगात आणि देशात आयएसओ सर्टिफिकेशन करून देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. तथापि, गुणवत्तेसाठी अत्यंत आग्रही असणाऱ्या जर्मनीच्या ट्यू सूद (TUV SUD) या कंपनीकडून तपासणी करवून घेण्यास शिवाजी विद्यापीठाने प्राधान्य दिले, हे यातले महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. सध्याचे प्रमाणपत्र हे ९ सप्टेंबर २०१९ ते ८ सप्टेंबर २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीसाठीचे आहे. मात्र, ही प्रक्रिया एवढ्यावरच थांबणारी नसून या कंपनीकडून वर्षातून दोनदा विद्यापीठाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने सुमारे ३७ तज्ज्ञ अंतर्गत तपासनीसांची (इंटर्नल ऑडिटर) फळी निर्माण केली आहे. अन्य कोणत्याही विद्यापीठात इतकी सशक्त टीम असत नाही, हे सुद्धा शिवाजी विद्यापीठाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
या पत्रकार परिषदेत स्वागत व प्रास्ताविक कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, राष्ट्रीय येवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, अजित थिटे आदी उपस्थित होते.

2 comments: