Friday 27 September 2019

तृतीयपंथीयांना सामाजिक हक्कांसाठी विद्यापीठ कटिबद्ध: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

शिवाजी विद्यापीठातर्फे तृतीयपंथीयांसाठी आयोजित कौशल्य विकास कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. व्यासपीठावर (डावीकडून) विशाल पिंजानी, मयुरी आळवेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव.


शिवाजी विद्यापीठातर्फे तृतीयपंथीयांसाठी आयोजित कौशल्य विकास कार्यशाळेत प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासमवेत सहभागी तृतीयपंथी नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनी.

कोल्हापूर, दि. २७ सप्टेंबर: समाजातील प्रत्येक घटकाला शैक्षणिक सेवा पुरवणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे. शिक्षणासह सामाजिक हक्कांपासून तृतीयपंथीय नागरिक वंचित राहणार नाहीत, यासाठी प्रयत्न करण्यास शिवाजी विद्यापीठ कटिबद्ध आहे, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे दिली.
विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातर्फे तृतीयपंथी व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या कौशल्य विकास कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव, कौशल्य विकास अधिकारी महेश चव्हाण, मैत्री फौंडेशनच्या अध्यक्ष मयुरी आळवेकर आणि विशाल पिंजानी उपस्थित होते.
डॉ. शिर्के यावेळी म्हणाले की, अशी कार्यशाळा विद्यापीठात प्रथमच होत असून तृतीयपंथी व्यक्तींमधील कौशल्य विकासासाठी सुरु झालेला हा उपक्रम या पुढील काळातही निरंतर आणि व्यापक स्वरुपात विद्यापीठ राबवेल. या लोकांना सर्वांनी समतेची आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे. ही आपली सार्वजनिक जबाबदारी आहे. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तृतीयपंथीय लोकांच्या समस्यांचे स्वरुप लक्षात येण्यासाठी विविध संशोधन प्रकल्पही हाती घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या बृहत-आराखड्यामध्ये तृतीयपंथी व्यक्तींसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठीही तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.
यावेळी मयुरी आळवेकर म्हणाल्या की, तृतीयपंथीयांचे प्रश्न विद्यापीठ प्रशासन समजावून घेत आहे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी, दिलासा देण्यासाठी विद्यापीठ पुढे आले आहे, ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क विद्यापीठाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यशाळेत दिवसभरात कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय व्याख्याते कौस्तुभ बंकापुरे, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. कृष्णा पाटील, पद्मश्री मादनाईक, डॉ. ए. एम. गुरव यांनी विविध विषयांवर कौशल्य प्रशिक्षण दिले. कार्यशाळेसाठी कोल्हापूर परिसरातील बहुसंख्य तृतीयपंथी नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment