Thursday, 19 September 2019

कर्नाटकातील साहित्य चळवळीवर आंबेडकरांचा मोठा प्रभाव: डॉ. चंद्रकांत वाघमारे

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. चंद्रकांत वाघमारे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. अनिल सपकाळ व डॉ. रणधीर शिंदे.



कोल्हापूर, दि. १९ सप्टेंबर: कर्नाटकातील समग्र साहित्य चळवळीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे, असे प्रतिपादन बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाचे मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव परिषद शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफताना मराठी व कन्नड साहित्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन होते.

Dr. Chandrakant Waghmare
डॉ. वाघमारे म्हणाले, या देशातील एकही राज्य असे नाही की जेथील बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव पडला नाही. कन्नड साहित्य आणि साहित्यिक सुद्धा त्याला अपवाद नाहीत. कुवेंपू यांच्यापासून शिवराम कारंथ, गिरीश कर्नाड, गोपाळकृष्ण अडिग आदी साहित्यिकांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक जाणीवा, समताधिष्ठित समाजरचनेचा आग्रह आदी विचारांचा प्रभाव पडला. या विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यकृतींमधून पाहावयास मिळते.
डॉ. वाघमारे पुढे म्हणाले, दलित बंडाय चळवळीमध्ये फूट पडून दलित आणि बंडाय असे दोन स्वतंत्र प्रवाह असले तरी त्यांच्यावरील बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव कायम आहे. दलित साहित्य चळवळीवर हा प्रभाव अधिक प्रकर्षाने जाणवतो, तर बंडाय साहित्य चळवळीवर त्या बरोबरीने बसवण्णा, मार्क्सवाद, लोहियावाद, पेरियार आदी विचारांचाही पगडा जाणवतो. तरीही अंतिमतः शोषणाविरुद्ध, शोषक व्यवस्थेविरुद्ध आवाज बुलंद करणे त्याचप्रमाणे सनातनी विचारांना विरोध करून समताधिष्ठित समाजरचनेचा आग्रह धरणे, हेच दोन्ही साहित्यिक चळवळींचे ध्येय आहे.
यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, साहित्यिकांमध्ये, विचारवंतांमध्ये मतभेद असले तरी त्यांच्यात कायमस्वरुपी फूट पडणे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने घातक ठरते. त्यामुळे परंपरागत सनातन व्यवस्थेविरुद्ध पुरोगामी साहित्यिक विचारवंत यांनी व्यापक समाजहिताची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने एकत्र येण्याची मोठी गरज आज निर्माण झाली आहे.
यावेळी मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment