Dr. Devanand Shinde |
कोल्हापूर, दि. १३ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पूरबाधित विद्यार्थ्यांना या शैक्षणिक
वर्षात प्रथम सत्र परीक्षा शुल्कमाफी, बाधित महाविद्यालयांना अर्थसाह्य आदींसह
काही महत्त्वाचे निर्णय घेऊन विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने दिलासा देण्याचा
प्रयत्न केला आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे दिली.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या
व्यवस्थापन परिषदेने पूरबाधित विद्यार्थी आणि महाविद्यालये यांना दिलासा देणारे
निर्णय घेतले आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पूरबाधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक
वर्ष २०१९-२०च्या प्रथम सत्राचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे. त्याचप्रमाणे पुरामुळे ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे खराब अथवा
गहाळ झाली आहेत त्यांना पुनश्च मागणी केल्यास दुबार पदवी प्रमाणपत्रे आणि
विद्यापीठाशी निगडित इतर शैक्षणिक कागदपत्रे विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा
निर्णयही घेतला आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुमारे बारा महाविद्यालयांचे
पुरामुळे मोठे नुकसान झाले. या महाविद्यालयांना मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून
मदत मिळण्यासाठीचे प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात यावेत, तसेच
त्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तके खरेदी करण्यासाठी विद्यापीठाकडून अर्थसाह्य
देण्यासही व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी
सांगितले.
दरम्यान, विद्यापीठाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट २०१९
मधील एक दिवसाचे वेतनही मा. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आल्याची माहितीही
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिली.
No comments:
Post a Comment