Friday, 27 September 2019

अॅलिलोपॅथीविषयक सार्वत्रिक जागृती आवश्यक: डॉ. राबिया होउयाला

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित ग्यान व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात बोलताना ट्युनिशियाच्या डॉ. राबिया होउयाला.


विद्यापीठात ग्यान व्याख्यानमालेस प्रारंभ
कोल्हापूर, दि. २७ सप्टेंबर: कृत्रिम रसायनांच्या अतिवापरामुळे होत असलेल्या वातावरणातील प्रदूषणास मानवच जबाबदार आहे. या परिस्थितीमध्ये विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांमध्ये अॅलिलोपॅथीविषयक सार्वत्रिक जागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ट्युनिशिया येथील सौजे विद्यापीठाच्या प्राध्यापक व ट्युनिशियन असोसिएशन फॉर सस्टेनेबल अॅग्रीकल्चर या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती डॉ. राबिया  होउयाला यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागात केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अॅकॅडेमिक नेटवर्क (GIAN) या प्रकल्पांतर्गत डॉ. होउयाला यांच्या वनस्पतींच्या परस्परातील संबंधाचा शाश्वत शेतीमध्ये वापर या विषयावरील व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन आज नीलांबरी सभागृहात झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते.
भाषणाच्या सुरुवातीलाच डॉ. राबिया होउयाला यांनी हिंदीमधून उपस्थितांना अभिवादन केले. त्या म्हणाल्या, अॅलिलोपॅथीमध्ये पर्यावरणीय बदलांमुळे एका वनस्पतीकडून दुसऱ्या वनस्पतीवर किंवा एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवावर होणाऱ्या जैवरासायनिक अभिक्रियांचा, परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अॅलिलोपॅथी. आजच्या काळात सातत्याने असे बदल होत आहेत आणि मानवी हस्तक्षेपामुळे ते अधिक गतिमान पद्धतीने होत आहेत. यामध्ये सकारात्मक परिणामांपेक्षा दुष्परिणामांचे प्रमाण अधिक दिसते आहे. ते रोखण्यासाठी या शास्त्राच्या अभ्यासाची मोठी गरज आहे. त्या दृष्टीने अशा व्याख्यानमालांचे आयोजन खूप महत्त्वाचे आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, ग्यानसारखे उपक्रम हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठीय समुदायांमध्ये विचारांची देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने अतिशय कळीची भूमिका बजावत आहेत. त्यातून ज्ञानवर्धनाबरोबरच अनेक नवनव्या गोष्टी स्थानिक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना माहिती होतात. त्यांचे उपयोजन करण्यासाठी तज्ज्ञांसमवेत चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन मिळविता येते. विद्यार्थी आणि संशोधक  यांच्यात अशा संकल्पनांची देवाणघेवाण होणे अत्यंत आवश्यक आहे.
या अभ्यासक्रमासाठी ४५ जणांनी नोंदणी केलेली आहे. यावेळी वनस्पतीशास्त्र  अधिविभागप्रमुख डॉ. वर्षा जाधव, प्रा. एस. आर. यादव,  प्रा. जी. बी. दीक्षित, प्रा. पी. डी. चव्हाण, प्रा. बी . कारदगे आदी उपस्थित होते. सुरवातीला डॉ. डी. के. गायकवाड यांनी स्वागत केले. प्रा. एस. एस. कांबळे यांनी परिचय करून दिला. प्रा. एन. बी. गायकवाड यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment