Saturday 26 November 2016

गरजांवर आधारित अभ्यासक्रमांची निर्मिती केल्यास

दूरशिक्षणाचे भवितव्य उज्ज्वल: डॉ. बी.एम. हिर्डेकर




शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय दूरशिक्षणविषयक परिसंवाद उत्साहात


कोल्हापूर, दि. 26 नोव्हेंबर: गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड न करता विद्यार्थ्यांच्या, शिक्षणेच्छुक नागरिकांच्या गरजांवर आधारित अभ्यासक्रमांची निर्मिती केल्यास दूरशिक्षणाचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण केंद्र व शिवाजी युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशन (सुनोवा) यांच्या संयुक्त विद्यमाने दूरशिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय सुधारणा या विषयावरील एकदिवसीय परिसंवादाचे बीजभाषण करताना ते बोलत होते. दूरशिक्षण केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. व्ही.डी. नांदवडेकर होते.
डॉ. हिर्डेकर म्हणाले, माहिती व संवाद तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या क्रांतीकारक बदलांमुळे आता पारंपरिक शिक्षण व दूरशिक्षण यांमधील सीमारेषा पुसट होत चालली आहे. किंबहुना, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भौगोलिक मर्यादा आपण केव्हाच ओलांडल्या असल्याने दूरशिक्षण ही संज्ञा अधिकच सापेक्ष बनली आहे. या सापेक्षतेचा लाभ घेऊन आपले जागतिक शैक्षणिक संबंध व साहचर्य अधिक वृद्धिंगत करण्याची मानसिकता आपण विकसित करायला हवी. विकसित राष्ट्रांमधील शिक्षण संस्थांनी दूरशिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धन मिळविले. पण, आता हार्वर्ड, एमआयटी तसेच येलसारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचा दृष्टीकोन बदलला असून ऑनलाइन दूरशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे शेकडो अभ्यासक्रम त्यांनी जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुले केले आहेत. तेथील पारंपरिक शिक्षणाचे ऑनलाइन शिक्षणक्रमात रुपांतर करण्यात त्यांनी मोठे यश मिळविले आहे. जगभरातील विद्यार्थी त्यांचा लाभ घेत आहेत.
मोबाईल अप्लीकेशन निर्माण करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाच्या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याची नितांत गरज असल्याचे सांगून डॉ. हिर्डेकर म्हणाले, आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आहे. त्याला त्याच्या आवडीचे विषय, स्टडी मटेरिअल अप्लीकेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आणि ते वापरण्याची सवय विकसित केली की आपोआपच दूरशिक्षणाचे लाभार्थी वाढतील. दूरशिक्षण क्षेत्रातील सुधारणा या सद्यस्थितीत बहुतांशी तंत्रज्ञानाशी निगडित असून त्यासाठी आय.सी.टी.च्या सक्षम पायाभूत सुविधा, टेक्नो-सॅव्ही स्टाफ, ऑनलाइन अभ्यासक्रम आणि ऑनलाइन इव्हॅल्युएशन, मासिव्ह ऑनलाइन ओपन अभ्यासक्रमांशी (मुक) दूरशिक्षणाची सांगड, खुल्या शिक्षण स्रोतांची उपलब्धता व वापर आदी बाबी आपल्याला कराव्याच लागणार आहेत. डाटा व्यवस्थापन आणि विश्लेषण यांवरच या सुधारणा अधिकतर अवलंबून आहेत. त्यामुळे डाटा व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे. पारंपरिक विद्यापीठांशी दूरशिक्षण केंद्रे संलग्न असली तरी त्यांना एडमिशन प्रक्रिया, अभ्यासक्रम निर्मिती अशा काही बाबतीत तरी स्वायत्तता देण्याची गरज असल्याचेही डॉ. हिर्डेकर यांनी सांगितले.
भारताला शिक्षणाचा उज्ज्वल वारसा असून ज्यावेळी अन्य देश भाकरीसाठी झगडत होते, त्या काळी जगातील सर्वोत्तम विद्यापीठे भारतात होती, याची आठवणही डॉ. हिर्डेकर यांनी या प्रसंगी करून दिली.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. व्ही.डी. नांदवडेकर म्हणाले, ज्यांच्यापर्यंत अद्यापही शिक्षण पोहोचलेले नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे दूरशिक्षणाचे उद्दिष्ट आजही बदललेले नाही. वंचितांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दूरशिक्षणासारखे प्रभावी साधन नाही. त्याला आता तंत्रज्ञानाची जोड देऊन दूरशिक्षण, पारंपरिक शिक्षण, वेब एज्युकेशन अशा शिक्षणाच्या सर्व उपलब्ध माध्यमांचा वापर करून ब्लेंडेड लर्निंगच्या सहाय्याने देशाच्या शिक्षण क्षेत्रातील सकल प्रवेश दर (जी.ई.आर.) वाढविण्यात निश्चितपणे यश प्राप्त करता येईल. त्यासाठी प्रशासकीय व तंत्रज्ञानात्मक सुधारणांबरोबरच दूरशिक्षण संस्था, केंद्रांनी आपल्या सक्षम बाजू (युनिक सेलिंग प्रपोझिशन्स) शोधून त्यांच्या प्रभावी सादरीकरणावर अधिक भर द्यायला हवा. यासंदर्भात जागृती करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सुनोवाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. सोनजे यांनी परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. दूरशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. एम.ए. अनुसे यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी आभार मानले.
या परिसंवादास रिसोर्स पर्सन म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, डॉ. ए.एम. गुरव यांच्यासह महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफिसर्स फोरमचे सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे, दूरशिक्षण केंद्राच्या माजी संचालक डॉ. सीमा येवले, डॉ. अरुण भोसले यांच्यासह महाराष्ट्रातील विविध अकृषी विद्यापीठांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday 25 November 2016

देशाला दीर्घकाळ स्थिरता, स्वातंत्र्य प्रदान करण्याचे सामर्थ्य संविधानात: डॉ. अशोक चौसाळकर






कोल्हापूर, दि. २५ नोव्हेंबर: देशाला दीर्घकाळ स्थिरता व स्वातंत्र्य प्रदान करण्याचे सामर्थ्य संविधानामध्येच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले. भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय संविधानाची प्रस्तुतता या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि राज्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परीक्षा नियंत्रक महेश काकडे होते.
डॉ. चौसाळकर म्हणाले, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लवचिकता हे भारतीय संविधानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून त्यामुळे घटनेत काळानुरुप बदल करणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले होते. तसेच, संविधानाचा विकास करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आपल्या संविधानात आजतागायत ११२ दुरुस्त्या, सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारतीय संविधान कोणा देवाला नव्हे, तर या देशातील नागरिकांनी ते स्वतःप्रत अर्पण केले, यामधून भारतीय जनतेचे सार्वभौमत्व अधोरेखित करण्यात संविधान यशस्वी झाले. संविधानाच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा उद्घोष करण्यात आला आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी या देशातील प्रत्येक नागरिकाची प्रतिबद्धता त्यातून प्रतीत होते. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळातील सुमारे दीडशे वर्षांच्या कालखंडात झालेल्या समाजसुधारणा चळवळीची मूल्ये राज्यघटनेत सामावून घेण्यात घटनाकारांना यश आले. अशा अनेक समाजसुधारणांच्या विचारांचा परिपाक संविधानात आढळतो. प्रास्ताविकेमध्ये तर संपूर्ण संविधानाचे तत्त्वज्ञान ग्रथित झाले आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय संविधानाने देशात मोठ्या प्रमाणात सायलेंट रिव्हॉल्यूशन (मूक क्रांती) घडवून आणल्याचे सांगून डॉ. चौसाळकर पुढे म्हणाले, या क्रांतीचे अर्धे चक्र पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आणि डॉ. आंबेडकर या संविधानाच्या फाऊंडिंग फादर्सनी आधीच फिरवून ठेवले आहे. उरलेले अर्धे चक्र फिरविण्याची जबाबदारी मात्र आता आपल्यावर आहे. या बळावरच गेल्या ६६ वर्षांच्या वाटचालीत संविधानाने आपली प्रस्तुतता सिद्ध केली आहे. या काळात काश्मीर, चीन आणि पाकिस्तानशी आपली युद्धे झाली. या संकट काळातही संविधानाने देशाचे ऐक्य, स्थिरता आणि स्वातंत्र्य टिकविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्योत्तर काळात देशाने केलेली प्रगती ही संविधानाच्या सहाय्याने साधलेली प्रगती आहे, या गोष्टीचे भान सदैव बाळगले पाहिजे. स्वातंत्र्य टिकविण्यासाठी देशाची एकता अबाधित राखणे, विभूतीपूजा टाळणे आणि सत्तेबरोबरच शहाणपणा प्राप्त करणे, असे मार्ग बाबासाहेबांनी घटना परिषदेतील भाषणात सांगितले होते. सांविधानिक नैतिकता आणि जनतेचा सारासार विवेक या गोष्टींचा आग्रह त्यासाठी बाबासाहेबांनी धरला होता. संविधानाचा विकास हा त्यायोगेच होणार आहे. देशाला पुढे नेण्यासाठी आपल्याला संविधानातील मार्गदर्शक तत्त्वेच मदत करणार आहेत. संविधानाच्या सहाय्याने देशात घडून आलेल्या सामाजिक क्रांतीची बीजे आणि लोकशाही खोलवर रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय करून देशात सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याची जबाबदारी नव्या पिढीने पेलण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन डॉ. चौसाळकर यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात परीक्षा नियंत्रक महेश काकडे म्हणाले, संविधानाने बाळगलेल्या उद्दिष्टांबरहुकूम आपण वाटचाल केली का, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्याचे आव्हान व्यवस्थेने पेलले का, हा आजच्या काळातला खरा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. संविधानाचा अभ्यास बुद्धिजीवींकडून म्हणावा तसा होत नाही, याची खंत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक आपल्या सांविधानिक हक्क व कर्तव्यांबाबत सजग होत नाही, तोपर्यंत सांविधानिक नैतिकता प्रस्थापित होऊ शकणार नाही. संविधानाच्या ध्येय व उद्दिष्टांच्या सहाय्यानेच देशाची सर्वांगीण प्रगती साधणे शक्य होणार आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. भगवान माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रविंद्र भणगे यांनी परिचय करून दिला. अविनाश वर्धन यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जगन कराडे, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. विनय कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday 22 November 2016

इस्राईलच्या एरियल विद्यापीठासमवेत

शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार


संयुक्त संशोधन प्रकल्प, स्टुडंट-फॅकल्टी एक्स्चेंज उपक्रम राबविणार

नवी दिल्ली येथे शिवाजी विद्यापीठाचा इस्राईल येथील एरियल विद्यापीठाशी इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष रुविन रिवलिन यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यावेळी करारावर स्वाक्षरी करताना एरियल विद्यापीठाचे कुलगुरू तथा प्रेसिडेंट प्रा. येहुदा डेनॉन व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे.


नवी दिल्ली येथे इस्राईलच्या एरियल विद्यापीठाशी सामंजस्य करारानंतर त्या विद्यापीठाचे कुलगुरू तथा प्रेसिडेंट प्रा. येहुदा डेनॉन व इस्राएली शिष्टमंडळासमवेत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे व प्रा. डॉ. ए.व्ही. घुले.


कोल्हापूर, दि. २२ नोव्हेंबर: येथील शिवाजी विद्यापीठ आणि इस्राईल येथील एरियल विद्यापीठ यांच्यात शिवाजी विद्यापीठाच्या ५४व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला (दि. १७) नवी दिल्ली येथील ताज पॅलेस हॉटेलमध्ये एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. ही माहिती विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय समन्वय कक्षाचे संचालक प्रा.डॉ. ए.व्ही. घुले यांनी दिली.
इस्राईलचे राष्ट्रध्यक्ष रुविन रिवलिन, भारताचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे चेअरमन डॉ. वेद प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे आणि एरियल विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा कुलगुरू प्रा. येहुदा डेनॉन यांनी स्वाक्षरी केल्या.
एरियल विद्यापीठाशी झालेल्या या सामंजस्य कराराअंतर्गत संशोधन व विकास या गोष्टींवर भर देण्यात आला असून स्टुडंट एक्स्चेंज, फॅकल्टी एक्स्चेंज, संयुक्त संशोधन प्रकल्प, संयुक्त परिषदा, परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन, परस्परांस उपयुक्त अशी माहिती व ज्ञानाचे आदानप्रदान आदी बाबींचा समावेश आहे.
या प्रसंगी इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष श्री. रिवलिन म्हणाले, या सामंजस्य करारामुळे भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांतील शैक्षणिक, संशोधकीय व सांस्कृतिक बंध दृढ होण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. या दोन्ही राष्ट्रांनी विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्य करण्याची घेतलेली भूमिका दोहोंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आपण एकत्रित आल्याने अधिक गुणवत्तापूर्ण आणि अधिक सशक्त भागीदारी उभी राहिली आहे. त्यातून दोन्ही राष्ट्रांना लाभच होणार आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा सामंजस्य करार ही केवळ एक सुरवात असून अद्याप परस्पर सहकार्याचा बराच पल्ला आपणास गाठावयाचा असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे इस्राईलला आपण जेव्हा जेव्हा जातो, तेव्हा तेथील संशोधन, नवसंशोधन आणि गुणवत्तापूर्ण उद्योजकीय विकास पाहून नेहमीच भारावून जायला होत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी डॉ. देवानंद शिंदे यांनी एरियल विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठाशी केलेल्या सामंजस्य कराराचे स्वागत केले तसेच धन्यवाद दिले. संशोधनाच्या क्षेत्रात या भागीदारीमुळे भरीव कामगिरी करता येणे शक्य होईल. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ सर्वोतोपरी प्रयत्न करेल, याची ग्वाही त्यांनी दिली. या प्रसंगी इस्राईलमधील तेल अवीव विद्यापीठासह हायफा व बार-ईलान आदी विद्यापीठांच्या प्रेसिडेंटनीही शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य करार करण्यास आपण उत्सुक असल्याचे सांगितले.
यावेळी इस्राईलच्या शिक्षण मंत्रालयाच्या बजेट व प्लॅनिंग समितीचे अध्यक्ष यासा झिल्बरशॅट्झ यांच्यासह इस्राईलमधील विविध विद्यापीठांचे प्रेसिडेंट आणि भारतातील निवडक विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

Friday 18 November 2016

महाराष्ट्राच्या मुकुटात शिवाजी विद्यापीठाकडून अनेक मानाचे तुरे

कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचे गौरवोद्गार



शिवाजी विद्यापीठाचा ५४वा वर्धापनदिन उत्साहात;
विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानाची रेश्मा माने ब्रँड ॲम्बॅसॅडर



कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी

 
विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: प्रा.डॉ. ज्योती जाधव (जीव-रसायनशास्त्र अधिविभाग)

महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक: डॉ. शरद सदाशिवराव हुंसवाडकर (राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर)

बॅ.पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. अरुण अण्णासाहेब पाटील (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर)

विद्यापीठातील गुणवंत सेवक: श्रीमती संपत्ती गणेश पाटील (अधीक्षक)

रणजीत मारुती शिंदे (सहाय्यक अधीक्षक)

पांडुरंग गोविंद शिरगावे (हवालदार)

गुणवंत सेवक: पांडुरंग दत्तात्रय चौगले (वरिष्ठ लघुलेखक, न्यू कॉलेज, कोल्हापूर)

बाळकृष्ण इंगवले (ग्रंथालय परिचर, शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर)


कोल्हापूर, दि. १८ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्राच्या मुकुटात अनेक मानाचे तुरे रोवले आहेत, असे गौरवोद्गार मुंबईच्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५४वा वर्धापन दिन समारंभ आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. या समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. 
कार्यक्रमास राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा माने प्रमुख उपस्थित होती. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी वर्धापन दिन समारंभाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानासाठी ब्रँड ॲम्बॅसॅडर म्हणून रेश्मा माने हिच्या नावाची घोषणा केली.
यावेळी कुलगुरू डॉ. वंजारी म्हणाल्या, अमर्याद एक्सलन्सचा आग्रह धरुन उच्चशिक्षणाचे क्षेत्र अनेक पैलूंनी सालंकृत करणाऱ्या कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यापासून ते डॉ. देवानंद शिंदे यांच्यापर्यंत द्रष्टे नेतृत्व शिवाजी विद्यापीठास सातत्याने लाभले. याच्या परिणामी विद्यापीठाने संशोधनासह विविध क्षेत्रांत बहुआयामी कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आज राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर विविध मानांकने या विद्यापीठास प्राप्त झाली आहेत. सामाजिक जाणीवांतून निर्माण होणारी बांधिलकी, कर्तव्याची जाण आणि सारासार विवेक ही त्रिसूत्री पदवीइतकीच महत्त्वाची असून ज्या व्यक्तीमध्ये या तीन गोष्टी आहेत, तो एक उत्तम व यशस्वी माणूस बनतो, असे त्या म्हणाल्या.
कुलगुरू डॉ. वंजारी पुढे म्हणाल्या, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी विद्यापीठांकडून अपेक्षित असणारी चतुःसूत्री सांगितलेली आहे. यामध्ये मानवता, सहिष्णुता, सत्यान्वेषण आणि कारणमीमांसा या चार मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये प्रस्थापना करण्यासाठी विद्यापीठांनी कार्य करणे नेहरुंना अभिप्रेत होते. त्या दृष्टीने उच्चशिक्षणाची ही राष्ट्रीय उद्दिष्ट्येच आहेत. ती आजही कालबाह्य झालेली नसून त्यांची गरज नववर्तमानात अधिकच अधोरेखित झालेली आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे निर्भय, स्वाभिमानी आणि ज्ञानाचा मुक्त प्रसार करणाऱ्या व्यवस्थेचीही आज गरज निर्माण झाली आहे. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या व्हीजन-२०२०च्या माध्यमातून या देशातल्या युवकांना ज्ञान, संपत्ती आणि अगदी अंतरीच्या दुःखाच्याही देण्यातला आनंद शिकविला आहे. आपले मन आणि काळीज वापरून या देशाच्या हिताचा वापर करण्याचे त्यांनी केलेले सूचन अत्यंत महत्त्वाचे आहे. राजेंद्र सिंह यांच्या जलक्रांतीचे उदाहरण देताना कोणताही बदल घडविण्यासाठी सजगतेचे महत्त्व पटवून दिले.
भाषणाच्या सुरवातीला कुलगुरू डॉ. वंजारी यांनी महाराष्ट्राला लाभलेले एक कल्पक कुलगुरू अशा शब्दांत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले.

बेटी बचाओ अभियानासाठी कुस्तीपटू रेश्मा माने ब्रँड अम्बॅसॅडर: कुलगुरू डॉ. शिंदे
रेश्मा माने हिचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी
अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठामार्फत बेटी बचाओ अभियान अत्यंत जोमाने राबविण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणारे हेएकमेव विद्यापीठ असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानासाठी कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचा झेंडा विदेशातही झळकावणारी कुस्तीपटू रेश्मा माने हिची ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी या प्रसंगी केली. आणि रेश्मा हिला व्यासपीठावर बोलावून सन्मानित केले. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या जल्लोषात कुलगुरूंच्या या घोषणेचे स्वागत केले.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी आपल्या भाषणात गत वर्षभरात विद्यापीठाने विविध क्षेत्रांत मिळविलेल्या लौकिकाचा तसेच वर्षभरातील घडामोडींचा आढावा घेतला. ते म्हणाले, मी येथे रुजू होण्यापूर्वीच या विद्यापीठाने ३.१६ इतक्या सर्वाधिक सीजीपीए गुणांकनासह नॅकची श्रेणी प्राप्त करून राज्यातील अग्रमानांकित विद्यापीठ बनण्याचा बहुमान पटकाविलेला होता. त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये विद्यापीठाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले आहेत. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे गतवर्षी प्रथमच देशातील विद्यापीठांची क्रमवारी ठरविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) हा उपक्रम हाती घेण्यात आला. या क्रमवारीत देशातील सुमारे ५५० विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठाने २८वा तर राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. काही दिवसांपूर्वीच यू.एस. न्यूज ॲन्ड वर्ल्ड रिपोर्ट या अमेरिकेतील प्रतिष्ठित संस्थेने भारतातील बेस्ट ग्लोबल युनिव्हर्सिटीजची यादी जाहीर केली. यामध्ये शिवाजी विद्यापीठ २१व्या स्थानी झळकले आहे. करन्ट सायन्स या अग्रमानांकित जर्नलने स्कोपस आकडेवारीच्या आधारावर केलेल्या सर्वेक्षणात संशोधनाच्या बाबतीत शिवाजी विद्यापीठाचा देशात १९ वा क्रमांक लागतो. देशातील अकृषी विद्यापीठांमध्ये ६वा, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक लागतो. मटेरियल सायन्सच्या संशोधनात देशातील अकृषी विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ हे देशात प्रथम क्रमांकावर असून या यादीत स्थान मिळविणारे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. जगातील अग्रगण्य नेचर संशोधन पत्रिकेच्या सर्वेक्षणानुसार, ऑनलाइन संदर्भांचा व्यापक वापर करणाऱ्या विद्यापीठांच्या यादीत शिवाजी विद्यापीठ देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे, आमचे विद्यार्थी आता ग्रामीणतेचा शिक्का पुसून ग्लोबल होण्याकडे वाटचाल करीत आहेत, हेच यातून अधोरेखित होते, असेही ते म्हणाले.
या समारंभात शिवाजी विद्यापीठाच्या ५३व्या वर्धापनदिन समारंभाचे प्रमुख पाहुणे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी खास शिवाजी विद्यापीठामधील वातावरण पाहून भारावून जाऊन तयार केलेल्या पोवाड्याच्या ऑडिओ सीडीचे सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र तसेच एम.ए. मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या 'माध्यमविद्या' 'मीडिया स्पेक्ट्रम' या प्रायोगिक अनितकालिकांचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर या वर्षी 'नॅक'चे '+''' मानांकन मिळविणाऱ्या शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील १३ संलग्नित महाविद्यालयांचा सत्कार करण्यात आला.
विविध पारितोषिक विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे: विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: प्रा.डॉ. ज्योती जाधव (जीव-रसायनशास्त्र अधिविभाग), महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक: डॉ. शरद सदाशिवराव हुंसवाडकर (राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर), बॅ.पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. अरुण अण्णासाहेब पाटील (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर), विद्यापीठातील गुणवंत सेवक: श्रीमती संपत्ती गणेश पाटील (अधीक्षक), रणजीत मारुती शिंदे (सहाय्यक अधीक्षक), पांडुरंग गोविंद शिरगावे (हवालदार), महाविद्यालयीन गुणवंत सेवक: पांडुरंग दत्तात्रय चौगले (वरिष्ठ लघुलेखक, न्यू कॉलेज, कोल्हापूर), बाळकृष्ण इंगवले (ग्रंथालय परिचर, शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर).
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना वॉक्हार्ट फाऊंडेशनचा प्रभावी कुलगुरू पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व पसायदान सादर केले. आलोक जत्राटकर व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले.
तत्पूर्वी, विद्यापीठ प्रांगणात प्रमुख पाहुण्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या झांजपथकाने अत्यंत लयबद्ध व प्रभावी सादरीकरण केले. सांगली जिल्हा एन.एस.एस. समन्वयक प्रा. सदाशिव मोरे यांनी पथकाचे नियोजन केले.
बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, नूतन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख पी.टी. गायकवाड यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या पोवाडा भेटीने भारावले उपस्थित
शिवाजी विद्यापीठाच्या गतवर्षीच्या ५३व्या वर्धापनदिनाचे प्रमुख अतिथी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचा परिसर, विद्यापीठाचा जाज्ज्वल्य इतिहास आणि लौकिक पाहून, ऐकून भारावून गेले होते. याची मोहिनीच जणू त्यांच्या मनावर पडली. त्यातून आपल्या शिवाजी विद्यापीठ भेटीला चिरंतनतेचे आयाम प्रदान करताना त्यांनी शिवाजी विद्यापीठाचा पोवाडाच तयार केला. हा पोवाडा मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातील शिक्षक, विद्यार्थ्यांकरवी संगीतबद्ध करवून घेऊन यंदाच्या ५४व्या वर्धापन दिन समारंभासाठी आवर्जून आठवणीने पाठवून दिला. या पोवाड्याची सीडी ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पोवाडा संपल्यानंतर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात डॉ. देशमुख यांना मनापासून धन्यवाद दिले.

गजानन चव्हाण यांचे पोस्टर प्रदर्शन
शिवाजी विद्यापीठाचे प्रशासकीय सेवक गजानन चव्हाण यांनी शिवाजी विद्यापीठातील विविध घडामोडींविषयी, सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांविषयीचे पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमस्थळी भरविले होते. त्यांच्या या उपक्रमाचे दोन्ही कुलगुरूंसह उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

महिला सन्मान दिन
शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानासाठी ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून रेश्मा माने हिची निवड जाहीर केल्यानंतर आजच्या समारंभाच्या प्रमुख अतिथींसह पुरस्कार विजेत्यांमधील महिलांची संख्या पाहता विद्यापीठाचा आजचा वर्धापनदिन हा महिला सन्मान दिन म्हणूनच साजरा होत असल्याची भावना कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.