संयुक्त संशोधन प्रकल्प,
स्टुडंट-फॅकल्टी एक्स्चेंज उपक्रम राबविणार
कोल्हापूर, दि. २२
नोव्हेंबर: येथील शिवाजी विद्यापीठ आणि इस्राईल येथील एरियल विद्यापीठ यांच्यात शिवाजी
विद्यापीठाच्या ५४व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला (दि. १७) नवी दिल्ली येथील ताज पॅलेस हॉटेलमध्ये एक
महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. ही माहिती विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय
समन्वय कक्षाचे संचालक प्रा.डॉ. ए.व्ही. घुले यांनी दिली.
इस्राईलचे
राष्ट्रध्यक्ष रुविन रिवलिन, भारताचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश
जावडेकर आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे चेअरमन डॉ. वेद प्रकाश यांच्या प्रमुख
उपस्थितीत या सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद
शिंदे आणि एरियल विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा कुलगुरू प्रा. येहुदा डेनॉन यांनी स्वाक्षरी
केल्या.
एरियल विद्यापीठाशी
झालेल्या या सामंजस्य कराराअंतर्गत संशोधन व विकास या गोष्टींवर भर देण्यात आला
असून स्टुडंट एक्स्चेंज, फॅकल्टी एक्स्चेंज, संयुक्त संशोधन प्रकल्प, संयुक्त
परिषदा, परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन, परस्परांस उपयुक्त अशी माहिती व ज्ञानाचे
आदानप्रदान आदी बाबींचा समावेश आहे.
या प्रसंगी
इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष श्री. रिवलिन म्हणाले, या सामंजस्य करारामुळे भारत आणि
इस्राईल या दोन्ही देशांतील शैक्षणिक, संशोधकीय व सांस्कृतिक बंध दृढ होण्यास
निश्चितपणे मदत होणार आहे. या दोन्ही राष्ट्रांनी विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्य
करण्याची घेतलेली भूमिका दोहोंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आपण एकत्रित
आल्याने अधिक गुणवत्तापूर्ण आणि अधिक सशक्त भागीदारी उभी राहिली आहे. त्यातून दोन्ही
राष्ट्रांना लाभच होणार आहे.
केंद्रीय मंत्री
प्रकाश जावडेकर यांनी हा सामंजस्य करार ही केवळ एक सुरवात असून अद्याप परस्पर
सहकार्याचा बराच पल्ला आपणास गाठावयाचा असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे इस्राईलला
आपण जेव्हा जेव्हा जातो, तेव्हा तेथील संशोधन, नवसंशोधन आणि गुणवत्तापूर्ण उद्योजकीय
विकास पाहून नेहमीच भारावून जायला होत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त
केली.
या प्रसंगी डॉ.
देवानंद शिंदे यांनी एरियल विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठाशी केलेल्या सामंजस्य
कराराचे स्वागत केले तसेच धन्यवाद दिले. संशोधनाच्या क्षेत्रात या भागीदारीमुळे
भरीव कामगिरी करता येणे शक्य होईल. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ सर्वोतोपरी प्रयत्न
करेल, याची ग्वाही त्यांनी दिली. या प्रसंगी इस्राईलमधील तेल अवीव विद्यापीठासह
हायफा व बार-ईलान आदी विद्यापीठांच्या प्रेसिडेंटनीही शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य करार करण्यास
आपण उत्सुक असल्याचे सांगितले.
यावेळी इस्राईलच्या
शिक्षण मंत्रालयाच्या बजेट व प्लॅनिंग समितीचे अध्यक्ष यासा झिल्बरशॅट्झ यांच्यासह
इस्राईलमधील विविध विद्यापीठांचे प्रेसिडेंट आणि भारतातील निवडक विद्यापीठांचे
कुलगुरू उपस्थित होते.
No comments:
Post a Comment