कोल्हापूर, दि. २५
नोव्हेंबर: देशाला दीर्घकाळ
स्थिरता व स्वातंत्र्य प्रदान करण्याचे सामर्थ्य संविधानामध्येच आहे, असे
प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले. भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला ‘भारतीय संविधानाची प्रस्तुतता’ या विषयावर शिवाजी
विद्यापीठात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संशोधन व विकास केंद्र आणि राज्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे
आयोजन करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी परीक्षा नियंत्रक महेश काकडे होते.
डॉ. चौसाळकर म्हणाले, घटनाकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लवचिकता हे भारतीय संविधानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य
असून त्यामुळे घटनेत काळानुरुप बदल करणे शक्य असल्याचे प्रतिपादन केले होते. तसेच,
संविधानाचा विकास करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आपल्या संविधानात आजतागायत
११२ दुरुस्त्या, सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारतीय संविधान कोणा देवाला नव्हे, तर या देशातील नागरिकांनी ते
स्वतःप्रत अर्पण केले, यामधून भारतीय जनतेचे सार्वभौमत्व अधोरेखित करण्यात संविधान
यशस्वी झाले. संविधानाच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा
उद्घोष करण्यात आला आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी या देशातील प्रत्येक नागरिकाची
प्रतिबद्धता त्यातून प्रतीत होते. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळातील सुमारे दीडशे
वर्षांच्या कालखंडात झालेल्या समाजसुधारणा चळवळीची मूल्ये राज्यघटनेत सामावून
घेण्यात घटनाकारांना यश आले. अशा अनेक समाजसुधारणांच्या विचारांचा परिपाक संविधानात
आढळतो. प्रास्ताविकेमध्ये तर संपूर्ण संविधानाचे तत्त्वज्ञान ग्रथित झाले आहे,
असेही ते म्हणाले.
भारतीय संविधानाने देशात मोठ्या
प्रमाणात ‘सायलेंट
रिव्हॉल्यूशन’ (मूक क्रांती) घडवून आणल्याचे सांगून डॉ.
चौसाळकर पुढे म्हणाले, या क्रांतीचे अर्धे चक्र पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ.
राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आणि डॉ. आंबेडकर या
संविधानाच्या ‘फाऊंडिंग फादर्स’नी आधीच
फिरवून ठेवले आहे. उरलेले अर्धे चक्र फिरविण्याची जबाबदारी मात्र आता आपल्यावर
आहे. या बळावरच गेल्या ६६ वर्षांच्या वाटचालीत संविधानाने आपली प्रस्तुतता सिद्ध
केली आहे. या काळात काश्मीर, चीन आणि पाकिस्तानशी आपली युद्धे झाली. या संकट काळातही
संविधानाने देशाचे ऐक्य, स्थिरता आणि स्वातंत्र्य टिकविण्यात महत्त्वाची भूमिका
बजावली. स्वातंत्र्योत्तर काळात देशाने केलेली प्रगती ही संविधानाच्या सहाय्याने
साधलेली प्रगती आहे, या गोष्टीचे भान सदैव बाळगले पाहिजे. स्वातंत्र्य
टिकविण्यासाठी देशाची एकता अबाधित राखणे, विभूतीपूजा टाळणे आणि सत्तेबरोबरच
शहाणपणा प्राप्त करणे, असे मार्ग बाबासाहेबांनी घटना परिषदेतील भाषणात सांगितले
होते. सांविधानिक नैतिकता आणि जनतेचा सारासार विवेक या गोष्टींचा आग्रह त्यासाठी
बाबासाहेबांनी धरला होता. संविधानाचा विकास हा त्यायोगेच होणार आहे. देशाला पुढे
नेण्यासाठी आपल्याला संविधानातील मार्गदर्शक तत्त्वेच मदत करणार आहेत.
संविधानाच्या सहाय्याने देशात घडून आलेल्या सामाजिक क्रांतीची बीजे आणि लोकशाही
खोलवर रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय करून देशात सामाजिक लोकशाही
प्रस्थापित करण्याची जबाबदारी नव्या पिढीने पेलण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन
डॉ. चौसाळकर यांनी केले.
अध्यक्षीय
भाषणात परीक्षा नियंत्रक महेश काकडे म्हणाले, संविधानाने बाळगलेल्या
उद्दिष्टांबरहुकूम आपण वाटचाल केली का, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे.
बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्याचे आव्हान व्यवस्थेने पेलले का, हा
आजच्या काळातला खरा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. संविधानाचा अभ्यास
बुद्धिजीवींकडून म्हणावा तसा होत नाही, याची खंत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक
नागरिक आपल्या सांविधानिक हक्क व कर्तव्यांबाबत सजग होत नाही, तोपर्यंत सांविधानिक
नैतिकता प्रस्थापित होऊ शकणार नाही. संविधानाच्या ध्येय व उद्दिष्टांच्या
सहाय्यानेच देशाची सर्वांगीण प्रगती साधणे शक्य होणार आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या
सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. भगवान माने
यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रविंद्र भणगे यांनी परिचय करून दिला. अविनाश
वर्धन यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जगन कराडे, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. पी.एन.
वासंबेकर, डॉ. विनय कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment