शिवाजी विद्यापीठाचा ५४वा वर्धापनदिन उत्साहात;
विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानाची रेश्मा माने ब्रँड ॲम्बॅसॅडर
कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी |
महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक: डॉ. शरद सदाशिवराव हुंसवाडकर (राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर) |
बॅ.पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. अरुण अण्णासाहेब पाटील (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर) |
विद्यापीठातील गुणवंत सेवक: श्रीमती संपत्ती गणेश पाटील (अधीक्षक) |
रणजीत मारुती शिंदे (सहाय्यक अधीक्षक) |
पांडुरंग गोविंद शिरगावे (हवालदार) |
गुणवंत सेवक: पांडुरंग दत्तात्रय चौगले (वरिष्ठ लघुलेखक, न्यू कॉलेज, कोल्हापूर) |
बाळकृष्ण इंगवले (ग्रंथालय परिचर, शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर) |
कोल्हापूर, दि. १८
नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाने
महाराष्ट्राच्या मुकुटात अनेक मानाचे तुरे रोवले आहेत, असे गौरवोद्गार मुंबईच्या
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५४वा वर्धापन दिन समारंभ आज अत्यंत उत्साहाच्या
वातावरणात साजरा झाला. या समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या
राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
कार्यक्रमास राष्ट्रकुल स्पर्धेत
सुवर्णपदक पटकावणारी कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा माने प्रमुख उपस्थित होती.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी वर्धापन दिन समारंभाचे औचित्य साधून शिवाजी
विद्यापीठाच्या ‘बेटी बचाओ’
अभियानासाठी ब्रँड ॲम्बॅसॅडर म्हणून
रेश्मा माने हिच्या नावाची घोषणा केली.
यावेळी कुलगुरू डॉ. वंजारी म्हणाल्या, अमर्याद
एक्सलन्सचा आग्रह धरुन उच्चशिक्षणाचे क्षेत्र अनेक पैलूंनी सालंकृत करणाऱ्या कुलगुरू
डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यापासून ते डॉ. देवानंद शिंदे यांच्यापर्यंत द्रष्टे
नेतृत्व शिवाजी विद्यापीठास सातत्याने लाभले. याच्या परिणामी विद्यापीठाने संशोधनासह
विविध क्षेत्रांत बहुआयामी कामगिरी बजावली आहे. त्यामुळे आज राज्यातच नव्हे, तर
देशपातळीवर विविध मानांकने या विद्यापीठास प्राप्त झाली आहेत. सामाजिक जाणीवांतून
निर्माण होणारी बांधिलकी, कर्तव्याची जाण आणि सारासार विवेक ही त्रिसूत्री पदवीइतकीच
महत्त्वाची असून ज्या व्यक्तीमध्ये या तीन गोष्टी आहेत, तो एक उत्तम व यशस्वी
माणूस बनतो, असे त्या म्हणाल्या.
कुलगुरू डॉ. वंजारी
पुढे म्हणाल्या, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी विद्यापीठांकडून
अपेक्षित असणारी चतुःसूत्री सांगितलेली आहे. यामध्ये मानवता, सहिष्णुता,
सत्यान्वेषण आणि कारणमीमांसा या चार मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये प्रस्थापना
करण्यासाठी विद्यापीठांनी कार्य करणे नेहरुंना अभिप्रेत होते. त्या दृष्टीने उच्चशिक्षणाची
ही राष्ट्रीय उद्दिष्ट्येच आहेत. ती आजही कालबाह्य झालेली नसून त्यांची गरज
नववर्तमानात अधिकच अधोरेखित झालेली आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या एका कवितेत
म्हटल्याप्रमाणे निर्भय, स्वाभिमानी आणि ज्ञानाचा मुक्त प्रसार करणाऱ्या
व्यवस्थेचीही आज गरज निर्माण झाली आहे. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी
आपल्या व्हीजन-२०२०च्या माध्यमातून या देशातल्या युवकांना ज्ञान, संपत्ती आणि अगदी
अंतरीच्या दुःखाच्याही देण्यातला आनंद शिकविला आहे. आपले मन आणि काळीज वापरून या
देशाच्या हिताचा वापर करण्याचे त्यांनी केलेले सूचन अत्यंत महत्त्वाचे आहे.
राजेंद्र सिंह यांच्या जलक्रांतीचे उदाहरण देताना कोणताही बदल घडविण्यासाठी सजगतेचे
महत्त्व पटवून दिले.
भाषणाच्या सुरवातीला
कुलगुरू डॉ. वंजारी यांनी महाराष्ट्राला लाभलेले एक कल्पक कुलगुरू अशा शब्दांत विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले.
बेटी बचाओ अभियानासाठी कुस्तीपटू रेश्मा माने ब्रँड अम्बॅसॅडर: कुलगुरू डॉ. शिंदे
रेश्मा माने हिचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी |
अध्यक्षीय भाषणात शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठामार्फत बेटी बचाओ
अभियान अत्यंत जोमाने राबविण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणारे
हेएकमेव विद्यापीठ असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या ‘बेटी बचाओ’ अभियानासाठी कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचा झेंडा विदेशातही
झळकावणारी कुस्तीपटू रेश्मा माने हिची ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून नियुक्ती करण्यात
येत असल्याची घोषणा त्यांनी या प्रसंगी केली. आणि रेश्मा हिला व्यासपीठावर बोलावून
सन्मानित केले. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या जल्लोषात कुलगुरूंच्या या
घोषणेचे स्वागत केले.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी
आपल्या भाषणात गत वर्षभरात विद्यापीठाने विविध क्षेत्रांत मिळविलेल्या लौकिकाचा
तसेच वर्षभरातील घडामोडींचा आढावा घेतला. ते म्हणाले, मी येथे रुजू होण्यापूर्वीच या विद्यापीठाने ३.१६ इतक्या
सर्वाधिक सीजीपीए गुणांकनासह ‘नॅक’ची ‘अ’ श्रेणी प्राप्त करून राज्यातील अग्रमानांकित विद्यापीठ बनण्याचा बहुमान पटकाविलेला होता. त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये
विद्यापीठाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले आहेत. भारत सरकारच्या
मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे गतवर्षी प्रथमच देशातील विद्यापीठांची क्रमवारी
ठरविण्यासाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ)
हा उपक्रम हाती घेण्यात आला. या क्रमवारीत देशातील सुमारे ५५० विद्यापीठांत शिवाजी
विद्यापीठाने २८वा तर राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. काही दिवसांपूर्वीच ‘यू.एस. न्यूज ॲन्ड वर्ल्ड रिपोर्ट’ या अमेरिकेतील
प्रतिष्ठित संस्थेने भारतातील ‘बेस्ट ग्लोबल युनिव्हर्सिटीज’ची यादी जाहीर केली. यामध्ये शिवाजी विद्यापीठ २१व्या स्थानी झळकले आहे. ‘करन्ट सायन्स’ या अग्रमानांकित जर्नलने स्कोपस
आकडेवारीच्या आधारावर केलेल्या सर्वेक्षणात संशोधनाच्या बाबतीत शिवाजी
विद्यापीठाचा देशात १९ वा क्रमांक लागतो. देशातील अकृषी विद्यापीठांमध्ये ६वा, तर
महाराष्ट्रात प्रथम क्रमांक लागतो. मटेरियल सायन्सच्या संशोधनात देशातील अकृषी
विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ हे देशात प्रथम क्रमांकावर असून या यादीत स्थान
मिळविणारे राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. जगातील अग्रगण्य ‘नेचर’ संशोधन पत्रिकेच्या सर्वेक्षणानुसार, ऑनलाइन संदर्भांचा व्यापक वापर
करणाऱ्या विद्यापीठांच्या यादीत शिवाजी विद्यापीठ देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
म्हणजे, आमचे विद्यार्थी आता ग्रामीणतेचा शिक्का पुसून ग्लोबल होण्याकडे वाटचाल
करीत आहेत, हेच यातून अधोरेखित होते, असेही ते म्हणाले.
या समारंभात शिवाजी
विद्यापीठाच्या ५३व्या वर्धापनदिन समारंभाचे प्रमुख पाहुणे मुंबई विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी खास शिवाजी विद्यापीठामधील वातावरण पाहून भारावून
जाऊन तयार केलेल्या पोवाड्याच्या ऑडिओ सीडीचे सादरीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र तसेच
एम.ए. मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या 'माध्यमविद्या' व 'मीडिया स्पेक्ट्रम' या प्रायोगिक अनितकालिकांचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी विद्यापीठातील,
महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा
विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच,
प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग
यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर या वर्षी 'नॅक'चे 'अ+' व 'अ' मानांकन मिळविणाऱ्या शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील १३
संलग्नित महाविद्यालयांचा सत्कार करण्यात आला.
विविध पारितोषिक
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे: विद्यापीठातील गुणवंत
शिक्षक: प्रा.डॉ. ज्योती
जाधव (जीव-रसायनशास्त्र अधिविभाग), महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक: डॉ. शरद सदाशिवराव
हुंसवाडकर (राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर), बॅ.पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. अरुण अण्णासाहेब
पाटील (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर), विद्यापीठातील गुणवंत सेवक: श्रीमती संपत्ती गणेश पाटील
(अधीक्षक), रणजीत मारुती शिंदे (सहाय्यक अधीक्षक), पांडुरंग गोविंद शिरगावे (हवालदार),
महाविद्यालयीन गुणवंत सेवक: पांडुरंग दत्तात्रय चौगले (वरिष्ठ लघुलेखक, न्यू कॉलेज,
कोल्हापूर), बाळकृष्ण इंगवले (ग्रंथालय परिचर, शहाजी छत्रपती महाविद्यालय,
कोल्हापूर).
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांना वॉक्हार्ट फाऊंडेशनचा प्रभावी कुलगुरू पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल
त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे
यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत अधिविभागाच्या
विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व पसायदान सादर केले. आलोक जत्राटकर व नंदिनी पाटील
यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले.
तत्पूर्वी, विद्यापीठ
प्रांगणात प्रमुख पाहुण्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांच्या हस्ते शिवपुतळ्यास
पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या
हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या झांजपथकाने अत्यंत
लयबद्ध व प्रभावी सादरीकरण केले. सांगली जिल्हा एन.एस.एस. समन्वयक प्रा. सदाशिव
मोरे यांनी पथकाचे नियोजन केले.
बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर.
मोरे, नूतन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी
वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव,
राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख पी.टी.
गायकवाड यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी,
विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. संजय देशमुख
यांच्या पोवाडा भेटीने भारावले उपस्थित
शिवाजी विद्यापीठाच्या गतवर्षीच्या
५३व्या वर्धापनदिनाचे प्रमुख अतिथी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे
त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचा परिसर, विद्यापीठाचा जाज्ज्वल्य इतिहास आणि लौकिक
पाहून, ऐकून भारावून गेले होते. याची मोहिनीच जणू त्यांच्या मनावर पडली. त्यातून
आपल्या शिवाजी विद्यापीठ भेटीला चिरंतनतेचे आयाम प्रदान करताना त्यांनी शिवाजी
विद्यापीठाचा पोवाडाच तयार केला. हा पोवाडा मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातील
शिक्षक, विद्यार्थ्यांकरवी संगीतबद्ध करवून घेऊन यंदाच्या ५४व्या वर्धापन दिन
समारंभासाठी आवर्जून आठवणीने पाठवून दिला. या पोवाड्याची सीडी ऐकताना
उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. पोवाडा संपल्यानंतर सर्वांनी टाळ्यांच्या
गजरात डॉ. देशमुख यांना मनापासून धन्यवाद दिले.
गजानन चव्हाण यांचे पोस्टर
प्रदर्शन
शिवाजी विद्यापीठाचे
प्रशासकीय सेवक गजानन चव्हाण यांनी शिवाजी विद्यापीठातील विविध घडामोडींविषयी,
सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांविषयीचे पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमस्थळी भरविले
होते. त्यांच्या या उपक्रमाचे दोन्ही कुलगुरूंसह उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.
महिला सन्मान दिन
शिवाजी विद्यापीठाच्या बेटी
बचाओ अभियानासाठी ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून रेश्मा माने हिची निवड जाहीर केल्यानंतर
आजच्या समारंभाच्या प्रमुख अतिथींसह पुरस्कार विजेत्यांमधील महिलांची संख्या पाहता
विद्यापीठाचा आजचा वर्धापनदिन हा ‘महिला
सन्मान दिन’ म्हणूनच साजरा होत असल्याची भावना
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment