Friday 31 March 2023

सामाजिक हिताच्या प्रश्नांवर सरकारला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शिक्षकांची: प्रा. सुखदेव थोरात

शिवाजी विद्यापीठाचा पहिला डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार प्रदान समारंभ

शिवाजी विद्यापीठाचा पहिला डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. सुखदेव थोरात यांना शुक्रवारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. राहुल म्होपरे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. विद्या कट्टी.

शिवाजी विद्यापीठाचा पहिला डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. सुखदेव थोरात.

शिवाजी विद्यापीठाचा पहिला डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. सुखदेव थोरात.



कोल्हापूर, दि. ३१ मार्च: आपल्या संपादित ज्ञानाच्या आधारे सरकारला व्यापक सामाजिक हिताच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करणे शिक्षकांची जबाबदारी आहे, ती त्यांनी निर्भयपणे निभावली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन प्रा. सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित करण्यात आलेला पहिला प्रा.डॉ. जे.एफ. पाटील स्मृती पुरस्कार-२०२३ प्रा. थोरात यांना आज सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

प्रा. थोरात यांनी आपल्या भाषणात डॉ. जे.एफ. पाटील यांचेच उदाहरण देत शिक्षकांवरील जबाबदारीचे अधोरेखन केले. ते म्हणाले, डॉ. पाटील यांच्या जीवनकार्यापासून एक धडा शिक्षकांनी अवश्य घ्यायला हवा, तो म्हणजे ज्ञानसंपादनाचा आणि ते समाजाला वाटण्याचा. शिक्षक ज्ञानाच्या क्षेत्रात असल्यामुळे त्याला इतरांपेक्षा लवकर ज्ञान मिळते. ते ज्ञान समाजाच्या हितासाठी देत राहण्याचा धडा डॉ. पाटील यांनी दिला आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत व्यक्तीस्वातंत्र्यावर, लेखनावर, अभिव्यक्तीवर मर्यादा येत असतात; परंतु अशा काळातही शिक्षकांनी आपली समाजशिक्षकाची भूमिका सोडता कामा नये. विविध सामाजिक-आर्थिक विषयांच्या अनुषंगाने सरकारला मार्गदर्शन करीत राहिले पाहिजे. नवे शैक्षणिक धोरण, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण आदी शैक्षणिक बाबींच्या संदर्भातही अशा मार्गदर्शनाची जबाबदारी त्यांनी निभावली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. जे.एफ. पाटील यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग अत्यंत गांभीर्यपूर्वक व प्रामाणिकपणे समाजहितासाठी वापरले. त्यांनी अर्थसंकल्पापलिकडेही विविध सामाजिक-आर्थिक विषयांवर चिंतनपर समतोल मांडणी केली, प्रबोधन केले. काही व्यक्ती आयुष्यभर लोकांच्या जीवनात सतपरिवर्तन आणण्यासाठी मोठा झगडा मांडतात, त्या जनमानसात चिरंतन राहतात. त्यांच्यामाघारी त्यांचा हा वारसा समाजाला प्रेरित करीत राहतो. डॉ. पाटील यांचा वारसा हा असा चिरंतन राहील, असे गौरवोद्गार प्रा. थोरात यांनी यावेळी काढले.

कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, शिवाजी विद्यापीठामध्ये सेवा बजावलेल्या शिक्षकाच्या नावे देण्यात येणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. डॉ. जे.एफ. पाटील यांनी समाजाशी निगडित विविध प्रश्नांवर धाडसी आणि चिंतनपूर्ण मांडणी केली. त्यामुळे समाजाशी जोडला गेलेला एक अर्थतज्ज्ञ असे त्यांचे वर्णन करावे लागेल. त्यांनी केवळ अर्थशास्त्रीय विषयांच्या बाबतीतच मांडणी केली नाही, तर समाजावर प्रभाव टाकणाऱ्या त्यापलिकडीलही अनेक विषयांवर चिकित्सक प्रकाश टाकला.

यावेळी अर्थशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. विद्या कट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी प्रा. थोरात यांचा परिचय करून दिला. अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. राहुल म्होपरे यांनी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली व मानपत्राचे वाचन केले. शीतल माने यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

यावेळी डॉ. जे.एफ. पाटील यांच्या पत्नी कमल पाटील त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित होत्या. माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्यासह अर्थशास्त्राचे आजी-माजी शिक्षक, परिषदेचे सदस्य, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाचा रा.कृ. कणबरकर पुरस्कार-२०२३

डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर

 

प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, मा. कुलपती, भारती अभिमत विद्यापीठ, पुणे


कोल्हापूर, दि. ३१ मार्च: शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव श्रीपतराव कदम यांना जाहीर करण्यात येत आहे. सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते येत्या १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता पुरस्कार प्रदान समारंभ होईल, अशी घोषणा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. रुपये १ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या प्राचार्य रा.कृ. कणबरकर राष्ट्रीय पुरस्काराच्या शोध समितीने सन २०२३च्या पुरस्कारासाठी भारती अभिमत विद्यापीठाचे विद्यमान कुलपती प्रा.डॉ. शिवाजीराव श्रीपतराव कदम यांची एकमताने निवड केली. डॉ. कदम यांनी एक प्रभावी शिक्षणतज्ज्ञ, कुशल शैक्षणिक प्रशासक, एक उत्साही संशोधक आणि तळमळीचा समाजसेवक म्हणून दिलेले योगदान लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

सन २०१६ पासून हा पुरस्कार भारतरत्न प्रा. सी.एन.आर. राव (२०१६), रयत शिक्षण संस्था, सातारा (२०१७), डॉ. जब्बार पटेल (२०१८), प्रा. एन.डी. पाटील (२०१९) आणि डॉ. डी.वाय. पाटील (२०२२) यांना प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, शोध समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.ए. खोत उपस्थित होते.

प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्काराविषयी...

महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक, दक्षिण भारत जैन सभेची कर्मवार भाऊराव पाटील, कोल्हापूर भूषण, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगे महाराज, शाहू प्रतिष्ठान आदी विविध पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. 'देणाऱ्याने देत रहावे, घेणाऱ्याने घेतच राहावे, घेता घेता देणाऱ्याचे हातचे घ्यावेत' या उक्ती सार्थ ठरवणारा दीड लाखांचा 'प्राचार्य रा. कृ. पुरस्कार' त्यांच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षी देण्याइतकी रक्कम त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे ठेव ठेवली आहे. या पुरस्कारासाठी भाषा, साहित्य, शास्त्रे, सामाजिक व नैसर्गिक, कला, क्रीडा, समाजसेवा तसेच सामाजिक हिताचे लक्षणीय संसदीय काम करणारी व्यक्ती / संस्था यांच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन पुरस्कार प्रदान करण्याबाबत निर्णय घेतला जातो. पुरस्कारप्राप्त व्यक्तिस शाल, श्रीफळ, ,५१,०००/- रू. चा धनादेश, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कुशल शैक्षणिक प्रशासक डॉ. शिवाजीराव कदम (अल्पपरिचय)

भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्रा.डॉ. शिवाजीराव श्रीपतराव कदम यांनी या विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, नंतर कुलगुरूपद भुषवित आता कुलपतीपदावर विराजमान होवून ते समर्थपणे कार्यभार सांभाळत आहेत.

डॉ. शिवाजीराव कदम यांचा प्रवास अतिशय देदिप्यमान असून या वाटचालीमध्ये त्यांना स्वत:ला आदर्श व ध्येयनिष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कुशल शैक्षणिक प्रशासक, उत्साही संशोधक आणि निस्वार्थी समाजसेवक म्हणून सिद्ध केले आहे. रसायनशास्त्र विषयातून डॉक्टरेट मिळविल्यानंतर डॉ. कदम यांनी दीर्घकाळ अध्यापन व संशोधन क्षेत्रात व्यतीत केला आहे. डॉ. कदम यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये १७५ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून १४ वर्षे, विद्वत् परिषदेवर १२ वर्षे, अधिसभा सदस्य म्हणून १६ वर्षे असे भरीव योगदान दिले आहे. तसेच औषध निर्माणशास्त्र या विद्याशाखेचे पहिले अधिष्ठाता म्हणून त्यांनी १५ वर्षे काम केले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग (दोन वेळा) व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (तीन वेळा) या भारत सरकारच्या दोन सर्वोच्च संस्थांचे सदस्य म्हणून त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते. तसेच नॅकचे सदस्य म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले आहे. तसेच, रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या शिक्षणसंस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून देत ते असलेले शैक्षणिक योगदान प्रशंसनीय आहे. डॉ. शिवाजीराव कदम यांना विविध सन्मान आणि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर यांच्याविषयी

प्राचार्य रामचंद्र कृष्णाजी कणबरकर (१९२१-२०१४) यांचे बालपण मॅक्झिम गॉर्कीच्या रशियातील कष्टमय विदारक अनुभवांची आठवण देते. वेदनामय अयशस्वी दत्तक प्रकरण आणि वयाच्या १४ व्या वर्षी हरवलेले पित्रृछत्र यामुळे बेळगावसारख्या शहरात वास्तव्याला असूनही सातवीच्या परीक्षेला बसता आले नाही. अनंत अडचणींना तोंड देत हा राम १९४० मध्ये मॅट्रिकची परीक्षा पहिल्या वर्गात पास झाला. 'राकृ हे संक्षिप्त नाव लाभलेल्या या तरूणाच्या आयुष्यातील वाटा आणि वळणे थक्क करणारी आहेत. कष्टाळू वृत्ती, पारदर्शी मन आणि निःस्वार्थी स्वभाव यामुळे 'राकृ' या शब्दाला हळूहळू वेगळे वलय प्राप्त होत गेले. १९४७ साली नव्यानेच सातारला कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या छ. शिवाजी कॉलेजला इंग्रजीच्या प्राध्यापकाची गरज होती. बेळगावातील लिंगराज कॉलेजमध्ये पूर्वीच मिळालेली स्वगृहीची नोकरी सोडून ते सातारला गेले. उमद्या वयात कर्मवीर भाऊराव पाटलांचा सहवास व संस्कार ही त्यांना मिळालेली मोठी शिदारी होती. कोल्हापूरच्या गोखले कॉलेजात प्राध्यापक झाल्यानंतर त्यांना विवेकानंद शिक्षण संस्थेत, संस्थापक सभासद बापूजी साळूंखे यांनी उस्मानाबाद येथील त्यांच्या संस्थेच्या पहिल्या कॉलेजचे प्राचार्य केले. १९५९ ते १९७५ पर्यंत, वयाच्या पन्नाशीपर्यंत त्या संस्थेत त्यांनी कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजदेखील पहिले प्राचार्य म्हणून मोठ्या उंचीवर नेले. न्यु कॉलेजच्या अडचणीच्या वेळी त्यांनी प्राचार्य कणबरकरांना पहिले प्राचार्य व्हायला लावले. या अनुभवी प्राचार्यांनी मोठ्या कौशल्याने न्यू कॉलेजची उभारणी दुप्पट वेगाने केली. महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षकाचा शासकीय पुरस्कार मिळाला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूपदही त्यांनी भूषविले.


Wednesday 29 March 2023

विद्यार्थ्यांनी ‘लाईफ लाँग लर्नर’ राहावे: प्रा. संजय धांडे

 शिवाजी विद्यापीठाच्या ५९ वा वर्धापन दिनास नव-स्नातकांची उत्साही उपस्थिती


शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस.

शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा. संजय धांडे 

शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा. संजय धांडे

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के शिवाजी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर करीत असताना राज्यपाल रमेश बैस लक्षपूर्वक ऐकत होते.

शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभात महेश बंडगर यास राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्रदान करताना प्रा. संजय धांडे. मंचावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास शिंदे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि परीक्षा संचालक डॉ. अजितसिंह जाधव. 

शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभात सोहम जगताप यास कुलपतींचे सुवर्णपदक प्रदान करताना प्रा. संजय धांडे. मंचावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास शिंदे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि परीक्षा संचालक डॉ. अजितसिंह जाधव. 

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठाची ५९ वी दीक्षान्त मिरवणूक काढण्यात आली.


शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभानिमित्त पदवीसमवेत छायाचित्रे काढून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वर्तुळ उ्द्यानामध्ये झालेली विद्यार्थिनींची गर्दी.

शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभानिमित्त पदवीसमवेत छायाचित्रे काढून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वर्तुळ उद्यानामध्ये जमलेल्या विद्यार्थिनींचा उत्साह असा ओसंडून वाहात होता.

शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभानिमित्त पदवीसमवेत छायाचित्रे काढून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वर्तुळ उद्यानामध्ये जमलेल्या विद्यार्थिनींचा उत्साह असा ओसंडून वाहात होता.

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा भवन क्र. २ च्या प्रांगणात पदवी घेण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींची परीक्षा विभागाच्या स्टॉलवर मोठी गर्दी झाली.

(शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभाची लघु-चित्रफीत)




कोल्हापूर, दि. २९ मार्च: विद्यार्थ्यांनी लाईफ लाँग लर्नर अर्थात आयुष्यभर शिकण्याच्या प्रक्रियेत व्यस्त राहावे आणि काळानुरुप आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन आय.आय.टी. कानपूरचे माजी संचालक प्रा. संजय धांडे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस होते. ते समारंभात ऑनलाईन सहभागी झाले. मंचावर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेचे सदस्य विराजमान होते.

विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ दोन वर्षांनी ऑफलाईन स्वरुपात झाला. त्यामुळे उपस्थितांचा आणि स्नातकांचा उत्साह अतिशय ओसंडून वाहात होता.

प्रा. धांडे यांनी आपल्या दीक्षान्त मार्गदर्शनात निरंतर शिक्षण, मूल्ये आणि कौशल्ये या बाबींवर भर दिला. स्नातकांना विद्यापीठाची पदवी घेऊन आता जीवनाच्या लाईफ लाँग लर्निंग या थ्री-एल विद्यापीठात प्रविष्ट होत असल्याची जाणीव करून देताना प्रा. धांडे म्हणाले, जीवनाच्या या विद्यापीठात कोणती परीक्षा नाही की गुण नाहीत, प्रमाणपत्र नाही की लेक्चर्स आणि प्रॅक्टिकलही नाहीत. मात्र, या विद्यापीठातील सर्व विद्यार्थी अनुभवातून शिकत आहेत. आजचे जग हे फार गतीने बदलते आहे. कोविडनंतर तर या बदलांचा वेग अधिकच वाढला आहे. या बदलत्या परिस्थितीत, काही कौशल्ये कालबाह्य होत आहेत. तर काही नवी कौशल्ये उदयास येत आहेत. या कौशल्यांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे आज एखाद्याने स्वतःहून नवीन कौशल्य आत्मसात करणे, हेच खरे शिक्षण आहे, जे आजच्या जगात अतिशय आवश्यक बनले आहे.

मानवी मूल्ये आणि नैतिकतेचा पाया हा जीवनाचा मूलभूत घटक असल्याचे सांगून प्रा. धांडे म्हणाले, अनुभव हा महान शिक्षक आहे. तुम्ही आता या लाइफ लाँग लर्निंग युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असाल आणि तुमचा शिक्षक म्हणून अनुभव घ्याल. या विद्यापीठात पदवी नाही. तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी राहाल. ही एक प्रक्रिया आहे जी तुमचे जीवन सतत समृद्ध करते. जग आज खूप गुंतागुंतीचे बनले आहे. विचलित करणाऱ्या बाबी भोवताली अधिक आहेत. अनेक मोहमयी पण धोकादायक मार्ग तुमच्या आजूबाजूला नेहमी खुणावत असतात. वैयक्तिक सचोटी आणि आर्थिक प्रामाणिकपणा याच त्या महत्त्वाच्या बाबी आहेत, ज्या या जगात आत्मसात करणे आवश्यक आहे.

डिजीटल एकलव्यांची गरज

एकलव्याच्या कथेचे उदाहरण देताना प्रा. धंडे पुढे म्हणाले, धनुर्विद्येची सर्व कौशल्ये एकलव्याने स्वतः शिकून घेतली आणि आत्मसात केली. त्याने आपल्या हाताच्या अंगठ्याचाही गुरुदक्षिणेपोटी त्याग केला आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा पायांनी धनुर्विद्येचे कौशल्य आत्मसात केले. आजच्या युगात अशा एक नव्हे, तर अनेक एकलव्यांची देशाला गरज आहे. अशा व्यक्तीला तुम्ही डिजीटल एकलव्यम्हणू शकता.

एकलव्याप्रमाणे बनण्यासाठी आवश्यक पैलूंचा ऊहापोहही प्रा. धांडे यांनी केला. ते म्हणाले, आपल्या अंतरात्म्यात थोडी भूक असायला हवी. शिक्षण हे पुल (PULL) मॉडेल आहे, पुश (PUSH) मॉडेल नव्हे. दुर्दैवाने, पालक, मित्र आणि इतरेजनांच्या दबावामुळे अनेक विद्यार्थ्यांची अशी भावना असते की, त्यांना असे काहीतरी शिकण्यास भाग पाडले जाते, जे त्यांना मुळीच शिकायचे नाही. प्रत्येक तरुणामध्ये काही ना काही भूक नक्कीच असते. समाजाने ती भूक शमविण्यासाठी साह्यभूत व्हायला हवे. आर्थिक यश प्रत्येक क्षेत्रात असतेच. तथापि, तरुणांनी नेहमी त्यांना ज्या गोष्टीचा अभ्यास आणि पाठपुरावा करायचा आहे, त्याचे अनुसरण केले पाहिजे. कौशल्य शिकण्याची आणि आत्मसात करण्याची भूक स्वाभाविकपणे कुतूहल वृद्धिंगत करते. त्यामुळे कुतूहल ही एक आवश्यक गोष्ट आहे. युवा पिढीला जग आणि त्याच्या वाटचालीचे विविध मार्ग याबद्दल कुतूहल असलेच पाहिजे. कुतूहलाच्या या पैलूला समाजाने खतपाणी घालून तो वृद्धिंगत केला पाहिजे. त्याची जोपासना केली पाहिजे. कुतूहलाच्या भावनेतूनच पुढे निरीक्षणाच्या कौशल्यांचा जन्म होतो. उत्कट निरीक्षणे ही यासाठी अजून एक आवश्यक गोष्ट आहे. हे खूप महत्वाचे आहे कारण सध्याच्या व्यवस्थेतील अनेक त्रुटी आणि चांगल्या गोष्टी या चांगल्या निरीक्षणातूनच समजून घेता येऊ शकतात. निरीक्षणांती तुमच्या मनात काही प्रश्न निश्चित उद्भवतील. जेव्हा तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची उत्तरे मिळतात, तेव्हाच वस्तुतः तुमचे खरे शिक्षण सुरू होते. प्रश्नोत्तर संवाद हाच शिक्षणाचा पाया असून त्यात सातत्या राहिले तरच त्यांचे कौशल्यात रुपांतर होते.

सध्याच्या काळात तरुणाईमध्ये विचलित होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून ते म्हणाले, तरुण-तरुणी इतके अनियंत्रित झाले आहेत की, कोणतीही शिस्त पाळत नाहीत. जेव्हा तारुण्य संपते तेव्हा आपल्या हातून वेळ निसटून गेल्याची वेदनादायक जाणीव होते. तेव्हा पराभूत आणि दुर्लक्षितपणाची भावना दाटून येते. जर तुम्हाला अशी परिस्थिती टाळायची असेल तर कृपया जीवनशैलीत काही शिस्त पाळणे आवश्यक आहे. कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आणि काही क्षेत्रात प्रवीण होण्यासाठी प्रचंड सराव आवश्यक आहे.

मार्केटचा रेटा जिकडे, त्या शाखेकडे जाण्याची विद्यार्थ्यांची प्रवृत्ती कमी होण्याची गरज अधोरेखित करताना प्रा. धांडे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा कौशल्य आणि मूल्ये या दोन पैलूंवर मोठा भर आहे. लाइफ लाँग लर्निंग युनिव्हर्सिटीचे ते आधार आहेत. या मूल्यांची बीजे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान रुजविण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे. त्याचप्रमाणे बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम अवलंबित असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिवडीचे स्वातंत्र्य विद्यापीठांनी द्यायला हवे. अगदी खालच्या स्तरावरील शिक्षणानेही व्यापक, मूल्याधारित शिक्षणाचा पाया प्रदान केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचे व्यावसायिक आयुष्य ४० ते ४५ वर्षांचे असते. या प्रदीर्घ कालावधीत तंत्रज्ञान बदलते आणि उच्च शिक्षणात घेतलेले चार वर्षांचे शिक्षण तिथे थिटे पडते. म्हणून, बहु-विद्याशाखीय अभ्यासाची सवय लावून घेत निरंतर शिकत राहणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल रमेश बैस यांचे अंबाबाई, शिव-शाहूंना अभिवादन

अध्यक्षीय मनोगतामध्ये राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी सुरवातीलाच आई अंबाबाईच्या पावन भूमीला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करीत भाषणास प्रारंभ केला. सदर समारंभास प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची इच्छा होती, पण अपरिहार्य कारणास्तव ऑनलाईन यावे लागल्याची खंत व्यक्त केली. कुलपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आपण उपस्थित राहात असलेला सार्वजनिक अकृषी विद्यापीठाचा हा पहिलाच दीक्षान्त समारंभ असल्याचे सांगून श्री. बैस म्हणाले, करवीर नगरी ही भारतातील लोकांसाठी दक्षिण काशी आहे. माता अंबाबाईचे हे पवित्र मंदिर भाविकांचे पवित्र निवासस्थान आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे हे राज्य पुरोगामी आणि कल्याणकारी कार्यांसाठी देशभर प्रसिद्ध आहे. या वर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त विद्यापीठाने विविध उपक्रम आयोजित केल्याबद्दल समाधान वाटले. विद्यापीठाने राजर्षी शाहूंचे स्मारक संग्रहालय उभारण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. हे संग्रहालय सर्वांसाठी खुले असावे, जेणेकरून लोकांना राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्याची माहिती होऊन प्रेरणा घेता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ज्ञान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती, तिची भरभराट करा: राज्यपाल

ज्ञान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती असल्याचे सांगून कुलपती श्री. बैस म्हणाले, ज्ञानाची चोरी होऊ शकत नाही, राजा ते जप्त करू शकत नाही, भावांत त्याची वाटणी होऊ शकत नाही आणि ते सोबत घेऊन जाणे, फारसे जड नाही. ते जितके जास्त खर्च करावे तितकेच ते वाढत जाते आणि त्याची भरभराट होते. ज्ञान हा असा पाया आहे, ज्यावर प्रत्येक व्यक्तीचे चारित्र्य बांधले जाते. शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी राहावे.

आपल्याला अशा शिक्षणाची गरज आहे, ज्यातून चारित्र्य घडते, मानसिक विकास होतो, बुद्धीचा विकास होतो आणि माणूस स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, या स्वामी विवेकानंदांच्या विधानाचा दाखला देत राज्यपाल श्री. बैस म्हणाले, शिक्षण हे परिवर्तनाचे उत्प्रेरक असून युवक हा सामाजिक बदलाचा सर्वात शक्तिशाली घटक आहे. सुशिक्षित तरुणांना योग्य दिशा दिल्यास ते इतिहासाच्या वाटचालीत क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतात.

हीरकमहोत्सवी शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीचा गौरवपूर्ण आढावा कुलपती श्री. बैस यांनी आपल्या भाषणात घेतला. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाला युजीसीच्या कॅटेगरी-१ श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. ISO 9001:2015 प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले. तसेच,एनआयआरएफ व क्यूएस रँकिंगमधील आपले स्थानही वृद्धिंगत केले आहे, ही महत्त्वाची बाब आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक कुटुंबांमध्ये पहिले पदवीधर घडवून विद्यापीठाने राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासात मोठे योगदान दिले आहे. सध्याच्या युगात तंत्रज्ञान, विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सांख्यिकी विज्ञान, अवकाश, रचना अशा अनेक विषयांचे महत्त्व वाढले आहे. हे पाहता शिवाजी विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मटेरियल सायन्स, ग्रीन केमिस्ट्री, व्हीएलएसआय टेक्नॉलॉजी, प्रोसेस कंट्रोल, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डेटा मायनिंग, डेटा अॅनालिसिस, एनर्जी टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स, कृषी आधारित अर्थशास्त्र, प्रदूषण नियंत्रण, न्युट्रास्युटिकल फूड्स, जिओ-इन्फॉर्मेटिक्स, ई-कॉमर्स सारख्या विषयांचा समावेश केला आहे, तो प्रशंसनीय आहे. सेंटर फॉर नॅनो फिजिक्स, सेंटर फॉर व्हीएलएसआय डिझाईनसारखे सेंटर ऑफ एक्सलन्स या विद्यापीठाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देऊ शकतात. तसेच, फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर फॉर सायबर सिक्युरिटी अँड डेटा सायन्स, सेंटर फॉर इनोव्हेशन अँड इनक्युबेशन, सेंटर फॉर क्लायमेट चेंज स्टडीज, राजर्षी शाहू लोककला केंद्र ही कालसुसंगत केंद्रे आहेत.

विद्यापीठात उद्योग-व्यवसायातील स्टार्ट-अप तेजीत आहेत. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र ऊस लागवड आणि त्यावर आधारित उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. गूळविषयक संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठाने दाखवलेली दक्षता वाखाणण्याजोगी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. पदवी प्रदान कार्यक्रमामध्ये एकूण ६४ स्नातकांमध्ये अवघे १५ विद्यार्थी व बाकीच्या विद्यार्थिनी असल्याची बाब प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थिनींच्या उच्चशिक्षणाला प्रोत्साहन देऊन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठ करीत असलेले काम कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपालांनी काढले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उत्तम प्रकारे अंमलबजावणी करून शिवाजी विद्यापीठ इतर सर्व विद्यापीठांसमोर आदर्श निर्माण करेल, याची खात्री कुलपती श्री. बैस यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे विद्यापीठाने पुढील २५ वर्षांच्या वाटचालीचा आराखडा तयार करावा, संशोधनाला चालना देत राहून सर्वच क्षेत्रांत पेटंट मिळविण्याचा प्रयत्न करावा, क्रीडा विकासाचा कार्यक्रम तयार करावा आणि आपला दर्जा सातत्याने वृद्धिंगत करीत राहण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. यामध्ये त्यांनी गेल्या वर्षभरातील विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधकीय प्रगतीसह वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा व राबविलेल्या विद्यार्थीभिमुख उपक्रमांचा आढावा घेतला. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आपल्या नॅशनल अॅकॅडेमिक डिपॉझिटरी (NAD) कक्षाच्या माध्यमातून सन २००२ ते २०२१ या १९ वर्षाच्या कालावधीतील (३८ वा ते ५७ वा दीक्षांत समारंभ) पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ७,४०,८५० इतकी प्रमाणपत्रे डीजिलॉकरमध्ये अपलोड केली आहेत. तसेच, अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटसाठी सदर पोर्टलवर विद्यापीठाच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ९८ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिवाजी विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस या शैक्षणिक वर्षापासून प्रारंभ केला आहे. या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसह विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे सकारात्मक लाभ पोहोचविण्याच्या कामी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत सर्वच घटकांनी विद्यापीठास सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महेश माणिक बंडगर यास सन २०२१-२२साठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक आणि सोहम तुकाराम जगताप यास कुलपती सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे अन्य ६२ स्नातकांना मंचावर पदवी प्रदान करण्यात आल्या. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील आणि सुस्मिता खुटाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले.

तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनापासून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली दीक्षान्त मिरवणुकीस ठीक पावणेबारा वाजता प्रारंभ झाला. प्रथेप्रमाणे संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या शिक्षक व विद्यार्थिनींनी गायिलेल्या पसायदानाच्या सुरावटींच्या साथीने ही मिरवणूक राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात प्रविष्ट झाली. यामध्ये व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद आणि विविध विद्याशाखांचे स्नातक सहभागी झाले. विज्ञान व तंत्रज्ञान अधिविभागाच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख आणि आंतरविद्याशाखा विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी यांनी आपापल्या विद्याशाखेच्या स्नातकांना सादर केले आणि कुलपतींना त्यांचेवर पदवी प्रदान करून अनुग्रह करण्याची विनंती केली.

१५ हजारांहून अधिक तरुणाईचा उत्साही वावर

या वर्षी दीक्षान्त समारंभ केंद्रीय पद्धतीने घेण्यात आला. यंदा ६६,४५७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येत आहेत. त्यापैकी १६,५९४ स्नातकांनी प्रत्यक्ष पदवी स्वीकृतीसाठी नोंदणी केली. पदवी वितरित करण्यासाठी परीक्षा विभागाने एकूण ४३ स्टॉलच्या माध्यमातून व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांचे पदवी घेण्यासाठी सकाळपासूनच आगमन सुरू झाले. दुपारी तर तरुणाईच्या गर्दीचा कळस झाला. सुमारे १५ हजारांवर तरुणाई पदवी घेण्यासाठी आणि आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी आतुर होती. त्यांचा उत्साह ओसंडून वाहात होता. विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवतालच्या वर्तुळ उद्यानात छायाचित्रे काढण्यासाठी तितकीच मोठी गर्दी होती.

ऑनलाईन एक हजार जणांची उपस्थिती

दीक्षान्त समारंभास सुमारे दीड हजार विद्यार्थी, स्नातक व नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे विद्यापीठाच्या शिव-वार्ता युट्यूब वाहिनीवरून थेट प्रसारणही करण्यात आले. या कार्यक्रमाचा देशविदशांतील एक हजार प्रेक्षकांनी लाभ घेतला. जनसंपर्क कक्ष आणि संगणक कक्ष यांनी त्याचे नियोजन केले.

Tuesday 28 March 2023

शिवाजी विद्यापीठाच्या लोकनृत्य, लोकवाद्यवृंद संघांची आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड

 

बेंगलोर येथील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेला शिवाजी विद्यापीठाचा संघ.

 

कोल्हापूर, दि. २८ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या लोकनृत्य आणि लोकवाद्यवृंद या दोन संघांची आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे. बेंगलोर येथे झालेल्या ३६व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात ही निवड करण्यात आली.

बेंगलोरच्या जैन युनिव्हर्सिटी येथे २४ ते २८ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत ३६ वा राष्ट्रीय युवा महोत्सव झाला. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या लोकनृत्य व लोकवाद्यवृंद या दोन संघांची ६ ते ८ एप्रिल, २०२३ या कालावधीत लव्हली प्रोफेशनल युनिर्व्हसिटी, फगवाडा (पंजाब) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवाकरीता निवड झालेली आहे. या निवडीचे पत्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागास नुकतेच प्राप्त झाले आहे. सदर आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचा एकूण २६ सदस्यांचा संघ सहभागी होणार आहे. हा संघ स्पर्धेसाठी ३ एप्रिल रोजी रवाना होणार असून १२ एप्रिलला परतणार आहे.

या युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यापीठ संघाचे प्रमुख म्हणून डॉ. टी. पी. शिंदे (मुधोजी महाविद्यालय, फलटण) आणि एस. ए. मोरे, वरिष्ठ सहाय्यक, विद्यार्थी विकास विभाग हे काम पाहणार आहेत तसेच संघासोबत डॉ. पी. टी. गायकवाड संचालक, विद्यार्थी विकास हे जाणार आहेत. सदर आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यापीठ संघास मा. कुलगुरु प्रा. डॉ.  डी. टी. शिर्के,  मा. प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी. एस. पाटील, मा. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे विशेष  मार्गदर्शन लाभले.