Wednesday, 15 March 2023

महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा (दिवस तिसरा):

मुंबई, पुणे, परभणी, जळगाव संघांचे विजय

 

कोल्हापूर, दि. 15 मार्च:  येथील शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये आज तिसऱ्या दिवशी मुंबई, पुणे, परभणी आणि जळगाव या विद्यापीठांनी विजय प्राप्त केले.

आज सकाळच्या सत्रातील पहिला सामना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात झाला. मुंबईने हा सामना तब्बल १३२ धावांनी जिंकला.

सोलापूरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली. फलंदाजी करताना मुंबई विद्यापीठाने 20 षटकात 1 बाद 200 धावा केल्या. मुंबईकडून अनिल घडसी यांनी 97, विपु खंडारी यांनी 66 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना सोलापूरचा संघ 12.1 षटकात सर्व बाद 68 धावाच करू शकला. मुंबईच्या प्रमोद म्हात्रे यांनी 9 धावात 3, तर संजय भालेराव यांनी 4 धावात 2 गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला. मुंबईचे अनिल घडसी सामनावीर ठरले.

सकाळचा दुसरा सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्यात झाला. हा सामना पुण्याने ११ धावांनी जिंकला.

नांदेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना पुणे विद्यापीठाने 20 षटकात 2 बाद 157 धावा केल्या. मनिष गायकवाड यांनी 63, नितीन प्रसाद यांनी 53 तर विनोद नरके यांनी नाबाद 25 धावा केल्या. नांदेडच्या प्रसाद मुपडे गोविंद सोनटाके यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नांदेडचा संघ 19 षटकात सर्व बाद 146 धावापर्यंतच पोहोचू शकला. पुण्याच्या बसवंत गजवळ यांनी 4 तर विनोद नरके यांनी 2 बळी घेतले. मनिष गायकवाड सामनावीर ठरले.

दुपारच्या सत्रात नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि जळगावचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात सामना झाला. जळगावने हा सामना चार गडी राखून जिंकला.

नाशिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी 20 षटकात 1 बाद 139 धावा केल्या. त्यांच्याकडून नंदकिशोर ठाकरे यांनी 23, राजेंद्र शहाणे यांनी 15, संदीप चौरी यांनी 14 धावा केल्या. जळगांवच्या जितेंद्र पाटील यांनी 32 धावा 3 गडी बाद केले.  १३९ धावांचे हे आव्हान जळगांव संघाने 17.1 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. जितेंद्र पाटीलनी 57, रविंद्र गिरनारे यांनी 26 धावा केल्या. जितेंद्र पाटील सामनावीर ठरले.

दुपारचा दुसरा सामना नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि परभणीचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यात झाला. परभणीने हा सामना ७ गडी राखून जिंकला.

नाशिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि 19.5 षटकात सर्व बाद 98 धावा केल्या. परभणीच्या मारूती शहाळे यांनी 3 तर मनोज कराळे यांनी 2 गडी बाद केले. परभणी संघाने हे आव्हान अवघ्या 12.1 षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. त्यांच्याकडून धीरज पाथ्रीकर यांनी नाबाद ५२ तर मनोज कराळे यांनी 18 धावा केल्या. धीरज पाथ्रीकर सामनावीर ठरले.

 

No comments:

Post a Comment