Thursday 16 March 2023

राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषद (समारोप सत्र):

राजर्षी शाहूंच्या सामाजिक न्यायविषयक मूल्यांचे संविधानात प्रतिबिंब: डॉ. लक्ष्मीकांत देशमुख

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेच्या समारोप सत्रात बोलताना डॉ. लक्ष्मीकांत देशमुख.

कोल्हापूर, दि. १६ मार्च: राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे सामाजिक परिवर्तन आणि न्यायाचे उत्तम निदर्शक आहेत. त्यांनी रुजविलेल्या सामाजिक न्यायविषयक मूल्यांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात उमटल्याचे दिसून येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज येथे केले. 

शिवाजी विद्यापीठाचे शाहू संशोधन केंद्र आणि इतिहास अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र इमारती आयोजित दोनदिवसीय राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेच्या समारोप समारंभात 'राजर्षी शाहू आणि भारतीय संविधान' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सर्वांना सक्तीची आणि मोफत शिक्षण योजना राबविली, त्यामागे महात्मा जोतीराव फुले यांची प्रेरणा होती. शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून आपल्या संस्थानात शिक्षणप्रसारासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. विषमता निर्मूलन आणि समता प्रस्थापनेचा मार्ग शिक्षणातूनच जातो, ही जाणीव त्यामागे दिसते. विविध जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी २३ वसतीगृहांच्या निर्मितीमागेही त्यांची हीच प्रेरणा आहे. शाहू महाराजांचे कार्य आणि त्यांनी विविध समाजघटकांच्या कल्याणासाठी केलेले कायदे यांचा अभ्यास केला असता मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी आग्रही असणारा लोकराजा आपल्या नजरेसमोर उभा राहतो. आज बहुजन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे मोफत शिक्षणाची योजना पदव्युत्तर स्तरापर्यंत विस्तारण्याची आवश्यकता आहे. महाराजांनी स्त्री शिक्षणासह स्त्रियांवरील अत्याचार दूर करण्यासाठी केलेले कायदेही काळाच्या खूप पुढे होते. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांच्या नोंदीचा कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा हे त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा उदात्त मानवतावादी दृष्टीकोनच दर्शवितात.

अध्यक्षीय मनोगता डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, कल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केला. मानवी भांडवला गुंतवणूक त्यांनी केल्यामुळेच मोठमोठ्या प्रकल्पांची निर्मिती करण्यात ते यशस्वी झाली. शेतीचे अर्थकारण सक्षम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे करवीर संस्थान हे आधुनिक महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्रच म्हणावे लागेल. तळागाळातील माणसे समृद्ध करण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले.

यावेळी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यासह डॉ. अवनिश पाटील, डॉ.रणधीर शिंदे यांच्यासह संशोधक विद्यार्थी, शिक्षक आणि शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेस मुणगेकरांची पूर्णवेळ उपस्थिती

ज्येष्ठ विचारवंत खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर हे काल राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेच्या उद्घाटन समारंभास बीजभाषक म्हणून उपस्थित राहिले. मुळात त्यांच्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून आणि त्यातही प्रकृती काहीशी अस्वस्थ असतानाही ते उपस्थित राहिले. मात्र, त्यानंतर दोनही दिवस त्यांनी अगदी समारोप समारंभापर्यंत या परिषदेतील डॉ. यशवंत थोरात, डॉ. तारा भवाळकर, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. आनंद मेणसे आणि डॉ. लक्ष्मीकांत देशमुख या सर्वच व्याख्यात्यांच्या व्याख्यानास उपस्थिती दर्शविली आणि संबंधित व्याख्यानाच्या अनुषंगाने दर्जेदार चर्चाही घडवून आणली. डॉ. मुणगेकरांची पूर्णवेळ उपस्थिती प्रत्येक वक्त्यासह उपस्थितांचा उत्साह वाढविणारी ठरली.

No comments:

Post a Comment