कोल्हापूर, दि. १७ मार्च: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या
नेतृत्वविकासामध्ये महात्मा गांधी यांच्या विचारांच्या भूमीचा मोठा वाटा आहे, असे
प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनामार्फत लोकनेते
बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात डॉ. गवस यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश पवार होते.
डॉ. गवस यांनी आपल्या
व्याख्यानात यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील
यांची वैचारिक परंपरा आणि
त्यामागील प्रेरणादायी इतिहास
सांगितला. ते म्हणाले, जनमानसामध्ये या लोकनेत्यांविषयी प्रचंड अढळ श्रद्धा होती. पाटणसारख्या डोंगरी भागातून
कोल्हापूरला येऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भूमीतून म्हणजेच अगदी तळागाळातून वर आलेले नेतृत्व म्हणजे लोकनेते बाळासाहेब
देसाई होय. रस्ते, सिंचन, शिक्षण इत्यादी
सुविधा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले. महाराष्ट्राचे
एक नवीन बदलते सर्वंकष स्वरुप निर्माण करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. महात्मा गांधीजींची
नैतिकता आणि चारित्र्य, लोकांसाठी जगणे यातून बाळासाहेब देसाई यांचे नेतृत्व विकसित झाले. त्यांच्या नेतृत्वाला
गांधीजींच्या विचारांची भूमी आणि खेड्यातील अनुभवांची जोड आहे. आपले मंत्रीपद हे सर्वसामान्य लोकांचे आहे, याची जाणीव बाळगून
त्यांनी कार्य केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. प्रकाश पवार म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई
हे नीतीमान आणि चारित्र्यवान असे महाराष्ट्राला लाभलेले नेतृत्व
होते. त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या मंत्रीपदाचा उपयोग
केला.
यावेळी इतिहास अधिविभाग प्रमुख तथा अध्यासनाचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांनी प्रास्ताविकात सन २०१६ पासून अध्यासनाच्या कार्याचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला. डॉ. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment