शिवाजी विद्यापीठात डॉ. आप्पासाहेब तानसेन वरुटे व्याख्यानमालेत बोलताना डॉ. आर.आर. भोंडे. |
कोल्हापूर, दि. १५ मार्च: मधुमेही रुग्णांसाठी
स्टेम सेल्स या वरदान असल्याचे प्रतिपादन पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी.वाय. पाटील
मेडिकल कॉलेजच्या संशोधन विभागाचे संचालक डॉ. आर.आर. भोंडे यांनी काल येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागात डॉ. आप्पासाहेब तानसेन वरूटे स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत ‘इस्लेट्स
इंजिनिअरिंग’
या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.
डॉ.आर.आर. भोंडे यांनी आपल्य़ा व्याख्यानात स्टेम सेल्सपासून इस्लेट्सची निर्मिती या विषयावर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, एकविसाव्या शतकात मधुमेहाची व्याप्ती सर्वत्र वाढली आहे. त्या अनुषंगाने उपचार, संशोधन ही काळाची गरज आहे. निरोगी लोकांच्या स्वादुपिंडामधील लॅंगरहॅन इस्लेट्समधील बिटा पेशी इन्सुलिन हे हॉर्मोन तयार करतात. इन्सुलिनमुळे रक्तातील साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावण्याची प्रक्रिया होत असते. मधुमेही व्यक्तींमध्ये ही प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. संशोधनाअंती असे आढळून आले आहे की, आपल्या शरिरातील चरबी साठवणाऱ्या - ॲडिपोज टिशू- स्टेम सेल्सपासून इस्लेट्सची निर्मिती करता येते. याव्यतिरिक्त बोन मॅरो,
प्लासेंटा, अंबायलिकल कॉर्ड, एम्निऑटिक मेम्ब्रेन यांच्यापासून देखील इस्लेट्स ची निर्मिती करता येते. या इस्लेट्सचे मधुमेही उंदरांमधील प्रत्यारोपण यशस्वी झाले असून त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित झाल्याचेही आढळले आहे. या संशोधनामुळे मधुमेह उपचार संशोधनाला नवी दिशा मिळाली आहे.
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. पाटील
यांनी प्राणिशास्त्र विषयातील संशोधनासाठी लागणारी वेगवेगळी उपकरणे, त्यांचा पदार्थविज्ञानाशी असलेला संदर्भ याविषयी माहिती दिली. या विषयातील संशोधनासाठी विदयार्थ्यांना प्रेरित केले.
समन्वयक डॉ. एस. एम. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अधिविभागप्रमुख डॉ. आशिष देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. एम. पी. भिलावे यांनी आभार मानले. सुलक्षणा साडेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. एस. आर. यंकंची, डॉ. एन. ए. कांबळे, डॉ. ए. डी. गोफणे, डॉ. वाय. के. माने, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment