Saturday, 11 March 2023

ऊर्जा संवर्धनाच्या मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरुप यावे: ‘सौरमानव’ चेतनसिंग सोळंकी

 भारतभ्रमण मोहिमेअंतर्गत शिवाजी विद्यापीठास भेट; विशेष व्याख्यान

प्रा. चेतन सिंग सोळंकी यांच्या एनर्जी स्वराज्य बससमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह (डावीकडून) डॉ. भोसले, डॉ. महादेव देशमुख, डॉ. एस.एन. सपली, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रा. सोळंकी आणि डॉ. भास्कर. 

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना प्रा. चेतन सिंग सोळंकी. मंचावर (डावीकडून) डॉ. महादेव देशमुख, कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. विलास शिंदे, डॉ. एस.एन. सपली.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना प्रा. चेतनसिंग सोळंकी.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के


कोल्हापूर, दि. ११ मार्च: ऊर्जा संवर्धनविषयक मोहिमेला जनआंदोलनाचे स्वरुप आल्यासच ते यशस्वी होण्याची अधिक खात्री आहे, असे प्रतिपादन सौरमानव तथा सोलर गांधी म्हणून प्रसिद्ध असलेले एनर्जी स्वराज्य फौंडेशनचे संस्थापक प्रा. चेतन सिंग सोळंकी यांनी आज येथे केले.

प्रा. सोळंकी हे आयआयटी मुंबई येथे सौरविज्ञान विषयाचे प्राध्यापक असून सौर ऊर्जेच्या प्रचार व प्रसारासाठी भारतभ्रमण यात्रेसाठी बाहेर पडले आहेत. सन २०२० ते २०३० पर्यंत ते ही मोहीम राबविणार असून तोपर्यंत कोणत्याही कारणाने घरी न परतण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली आहे. संपूर्णतया सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सुसज्ज बसमधून त्यांनी ही मोहीम चालविली आहे. आज त्यांच्या मोहिमेचा ८३४ वा दिवस आहे. या मोहिमेदरम्यान त्यांनी आज शिवाजी विद्यापीठास भेट दिली. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाने जी-२० युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमांतर्गत त्यांचे ‘हवामान बदल’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

प्रा. सोळंकी म्हणाले, ऊर्जा संवर्धनविषयक कार्यक्रम राबविणे ही काही केवळ सरकारची जबाबदारी आहे, असे समजण्याचे कारण नाही. प्रत्येक मानव हा ऊर्जेच्या वापराला आणि ऱ्हासाला तितकाच कारणीभूत आहे. त्यामुळे तिच्या संवर्धनाची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. असा प्रत्येक जागरूक नागरिक एकत्र येऊन सौरऊर्जेसाठी आग्रही बनेल, तेव्हा त्या मोहिमेचे जनआंदोलनात रुपांतर होईल. ही इच्छाशक्ती निर्माण होणे, हीच आजची खरी गरज आहे.

ते म्हणाले, आधुनिकीकरणाच्या नावाखाली कोळसा, तेल आणि तेलवायू यांचा आपण इतका वारेमाप वापर चालविला आहे की आज आपण वापरत असलेल्या ऊर्जेपैकी ८५ टक्के ऊर्जा या खनिज इंधनांपासूनच निर्माण केली जाते. यामुळे वातावरणातील कार्बनचे उत्सर्जन दुपटीने वाढले आहे. यामुळे हरितगृह-वायू परिणाम होऊन तापमान वातावरणाच्या कक्षेत पकडून ठेवले जाते. या ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम एक-दोन नव्हे, तर तब्बल तीनशे वर्षे म्हणजे सुमारे दहा पिढ्यांना भोगावे लागतील. सन १८८० ते १९२० या कालावधीच्या तुलनेत आज पृथ्वीचे तापमान १.१९ अंश सेल्सिअसने वाढलेले आहे. अवघ्या सहा वर्षे १३३ दिवसांच्या कालावधीत ते १.५ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार आहे. त्यापुढे ते दोन टक्क्यांपर्यंत जर गेले, तर मात्र त्याचे भयावह दुष्परिणाम संभवतात. त्यानंतर आपण काहीही केले तरी आपले जीवन पूर्ववत करू शकणार नाही. त्या दृष्टीने हे २ अंश सेल्सिअस तापमान म्हणजे मानवजातीच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठीची लक्ष्मणरेखा आहे. आपण याच गतीने प्रदूषण करीत राहिलो तर सन २१००पर्यंत पृथ्वीचे तापमान २.८ ते ६ अंश सेल्सिअसनी वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला.

या हवामान बदलावरील उपायांची चर्चा करताना प्रा. सोळंकी म्हणाले, मनुष्यजीवनाच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने आपण पुन्हा शंभर टक्के सौरऊर्जेकडे वळले पाहिजे. अन्न, पाणी आणि आपण घेत असलेला प्रत्येक श्वास ही सौर ऊर्जेची देणगी आहे. मानवजातीचे अस्तित्व कायम राखावयाचे असल्यास दोन नियमांचे पालन करावे. एक तर आपल्या गरजा मर्यादित करा आणि दुसरे म्हणजे स्थानिक स्तरावर आपल्याला आवश्यक ते उत्पादन घ्या. त्याचप्रमाणे आपल्या ऊर्जावापराच्या सवयींचाही पुनर्विचार करून ऊर्जेची बचत व संवर्धन यासाठी ऊर्जेचा वापर शक्य तितका नाकारणे, कमीत कमी करणे आणि तिचे स्थानिक पातळीवर उत्पादन करणे या तिहेरी मार्गाचा वापर करण्याचा मंत्र त्यांनी दिला.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले असून पुढील कालखंडात सौरऊर्जेच्या सहाय्याने विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने प्रयत्नशील असल्याची माहिती दिली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, आपण प्रत्येक श्वासागणिक निसर्गावर, नैसर्गिक साधनस्रोतांवर कसे अत्याचार करीत आहोत, शोषण करीत आहोत, याची जाणीव प्रा. सोळंकी यांनी करून दिली. ऊर्जासंवर्धनासाठी त्यांनी सुचविलेल्या उपाययोजना केवळ आपल्यापर्यंत सीमित न राखता गावा-गावापर्यंत, शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत तो घेऊन जाण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञान अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी ती जबाबदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस.एन. सपली यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. गिरीष कुलकर्णी, डॉ. पी.सी. भास्कर, डॉ. एम.एस. भोसले यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment