विद्यापीठात अखिल महाराष्ट्र आंतरविद्यापीठ कर्मचारी टी-२० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
शिवाजी विद्यापीठात सोमवारी अखिल महाराष्ट्र आंतरविद्यापीठ कर्मचारी टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलताना माजी रणजीपटू अतुल गायकवाड. |
शिवाजी विद्यापीठात सोमवारी अखिल महाराष्ट्र आंतरविद्यापीठ कर्मचारी टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के |
शिवाजी विद्यापीठात सोमवारी अखिल महाराष्ट्र आंतरविद्यापीठ कर्मचारी टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के यांनीही काही चेंडू फटकावण्याचा आनंद घेतला. |
शिवाजी विद्यापीठात सोमवारी अखिल महाराष्ट्र आंतरविद्यापीठ कर्मचारी टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सहभागी संघांतील उपस्थित क्रिकेटपटू. |
कोल्हापूर, दि. १३ मार्च: शिवाजी विद्यापीठामुळेच आम्ही
क्रिकेटमध्ये आणि पुढे आयुष्यातही चांगली कारकीर्द घडवू शकलो. विद्यापीठाचे आम्हा
खेळाडूंच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे, असे कृतज्ञतापूर्ण उद्गार पुण्याच्या सीमाशुल्क व केंद्रीय जीएसटी
विभागाचे अधीक्षक तथा माजी रणजीपटू अतुल गायकवाड यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे अखिल महाराष्ट्र आंतरविद्यापीठ
कर्मचारी टी-२० कुलगुरू चषक लेदरबॉल स्पर्धेचे उद्घाटन आज सकाळी श्री. गायकवाड
यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव
डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश
गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, शिवाजी विद्यापीठ
सेवक संघाचे अध्यक्ष मिलींद भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.
श्री. गायकवाड म्हणाले, शिवाजी विद्यापीठात आम्ही विद्यार्थीदशेत सरावासाठी
सतत मैदानावरच असायचो. त्यावेळी येथील कर्मचारी बंधूंनी आम्हाला खूप सहकार्य केले.
इथे केलेल्या अथक सरावामुळेच पुढे रणजी खेळताना कर्नाटकच्या संघाकडून खेळणाऱ्या
जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद या गोलंदाजांची कधी भीतीच वाटली नाही. या पार्श्वभूमीवर
कर्मचारी बंधूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहताना
कृतज्ञतेची भावना आहे. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ट्रॅक बनविले
आहे. त्याच धर्तीवर क्रिकेट मैदानही विकसित करावे, अशी सूचना त्यांनी केली. कर्मचारी
हे खूप तणावाखाली काम करीत असतात. खेळ ही तणावमुक्त करणारी क्रिया आहे. त्यामुळे
खेळाडू असणाऱ्या सर्वांनीच शरीर साथ देते आहे, तोपर्यंत खेळत राहिले पाहिजे, असा
मोलाचा सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, या स्पर्धेमध्ये पारंपरिक
विद्यापीठांच्या बरोबरीनेच आरोग्यविज्ञान, अभियांत्रिकी, पशुविज्ञान व मुक्त
विद्यापीठेही सहभागी झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या
विद्यापीठांचे प्रतिनिधित्व येथे दिसते, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे. कोविडच्या
कालखंडानंतर प्रथमच विद्यापीठ कर्मचाऱ्यांसाठीची ही स्पर्धा भरविताना विशेष आनंद
होत आहे. त्या माध्यमातून कर्मचारी बांधवांची होणारी तणावमुक्ती महत्त्वाची आहे.
त्या दृष्टीनेही या स्पर्धांचे महत्त्व आहे.
सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. उपस्थित
संघांनी संचलन करीत ध्वजासह मान्यवरांना सलामी दिली. अतुल गायकवाड यांच्या हस्ते
ट्रॉफींचे अनावरण करण्यात आले. शिवाजी विद्यापीठ संघाचे कर्णधार रमेश ढोणुक्षे
यांनी उपस्थित संघांना शपथ दिली. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते
मैदानाचे पूजन करण्यात आले. श्री. गायकवाड यांच्या हस्ते पहिल्या सामन्याची नाणेफेक
करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. शरद बनसोडे यांनी केले तर
अभिजीत लिंग्रस यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले.
सदर स्पर्धेत सहभागी झालेली विद्यापीठे पुढीलप्रमाणे-
१. मुंबई विद्यापीठ, मुंबई, २. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, ३.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (अ व ब), ४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र
विद्यापीठ, लोणेरे, ५. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, ६. पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, ७. महाराष्ट्र पशु व मत्स्य
विद्यापीठ, नागपूर, ८. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, ९.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, १०. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान
विद्यापीठ, नाशिक, ११. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.
No comments:
Post a Comment