कोल्हापूर, दि. १९ मार्च: येथील शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य
आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये आज सातव्या दिवशी
मुंबई, नाशिक, परभणी आणि नांदेड संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
मुंबई विद्यापीठाने आजच्या विजयासह आपले उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. शिवाजी विद्यापीठाच्या
दोन्ही संघांना आज पराभव पाहावा लागल्याने त्यांच्या दृष्टीने आजचा दिवस निराशाजनक
ठरला.
नांदेड विद्यापीठ २८ धावांनी विजयी
आज सकाळचा सामना शिवाजी विद्यापीठ-ब आणि स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्यात झाला. हा सामना नांदेडने २८ धावांनी जिंकला.
नांदेड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी २० षटकांत
९ बाद १५३ धावा केल्या. त्यांच्याकडून शैलेश कांबळे यांनी नाबाद २० तर शिवाजी हंबर्डे
यांनी नाबाद २७ धावा केल्या. अजमेर बिदला यांनी २४ धावा केल्या. 'शिवाजी विद्यापीठ 'ब' कडून दिपक कांबळे, राजेश मुपडे आणि विशांत भोसले
यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरादाख शिवाजी विद्यापीठ-ब संघ १८.२
षटकात सर्व बाद १२५ धावापर्यंतच मजल मारू शकला. त्यात अभिजीत कोठावळेच्या ३५ धावा
होत्या. नांदेडच्या राशिद शेख यांनी तब्बल ५ बळी घेतले, तर शैलेश कांबळे यांनी ३
बळी घेतले. राशिद शेख सामनावीर ठरले.
नाशिकचा ८ गडी राखून विजय
सकाळचा दुसरा सामना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात झाला. हा सामना नाशिकने
८ गडी राखून जिंकला.
सोलापूर विद्यापीठाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी २०
षटकांत १० बाद १२३ धावा केल्या. त्यांच्याकडून मुख्तार शेख यांनी ५५ धावांची
अर्धशतकी खेळी केली. नाशिकच्या योगेश राऊत यांनी ३ तर मुकुंद मुळे यांनी २ बळी
घेतले. सोलापूरचे हे आव्हान नाशिक संघाने अवघ्या २ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
त्यात राजेंद्र शहाणे यांच्या ७६ आणि योगेश राऊत यांच्या २५ धावांचा समावेश आहे.
योगेश राऊत सामनावीर ठरले.
परभणीचा लोणेरेवर ७ गड्यांनी विजय
दुपारचा पहिला सामना वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी विद्यापीठ, परभणी
आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्यात झाला. हा
सामना परभणी संघाने ७ गडी राखून जिंकला.
लोणेरे विद्यापीठाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी २०
षटकांत ८ बाद १७३ धावा केल्या. त्यांच्याकडून संदेश जाभरे यांनी ४४, नीलेश भोईरे
यांनी ३३ व विनायक तवसाळकर यांनी २४ धावा केल्या. परभणीच्या मारुती शिळाले यांनी ३
तर माणिक ढेंगे यांनी २ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना परभणी संघाने अवघे ३
गडी गमावून १५.५ षटकात १७७ धावा केल्या. त्यात माणिक ढेंगे यांच्या नाबाद ५१, मनोज
कराळे यांच्या ४२ आणि धीरज पाथ्रीकर यांच्या नाबाद ३७ धावांचा समावेश आहे. माणिक
ढेंगे सामनावीर ठरले.
मुंबईचा शिवाजी विद्यापीठावर १८ धावांनी
विजय
दुपारचा दुसरा सामना शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात
झाला. हा सामना मुंबईने १८ धावांनी जिंकला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने २० षटकांत ५ बाद
१६८ धावा केल्या. त्यात अनिल घडसी यांच्या ४९ तर संजय पवार यांच्या ४१ धावांचा
समावेश राहिला. शिवाजी विद्यापीठाकडून विश्वनाथ वरुटे आणि विनायक शिंदे यांनी
प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल शिवाजी विद्यापीठाचा संघ २० षटकांत ८ बाद
१५० धावांपर्यंत पोहोचू शकला. विश्वनाथ वरुटे याने २८, प्रसाद देसाई याने २२ धावा
केल्या. मुंबईच्या विपुल खंदारे यांनी ४ तर श्रीकांत मोंडे यांनी २ बळी घेतले.
विपुल खंदारे सामनावीर ठरले.
No comments:
Post a Comment