विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागातर्फे औद्योगिक सुरक्षा कार्यशाळा
शिवाजी विद्यापीठात औद्योगिक सुरक्षाविषयक कार्यशाळेत बोलताना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संयुक्त संचालक सुरेश जोशी. |
कोल्हापूर, दि. ९ मार्च: औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा
अधिकारी हे औद्योगिक क्षेत्राबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेचेही रक्षक आहेत. त्या
दृष्टीने त्यांच्या योगदानाकडे आपण पाहायला हवे, असे प्रतिपादन औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य खात्याचे संयुक्त संचालक सुरेश जोशी यांनी आज
येथे केले.
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त शिवाजी
विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजित ‘औद्योगिक
सुरक्षा’विषयक कार्यशाळेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. वनस्पतीशास्त्र
अधिविभागाच्या नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
श्री. जोशी म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात होणारे अपघात टाळण्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी सुरक्षा अधिकाऱ्यांवर असते. सुरक्षाविषयक नियम, निकषांचे काटेकोर पालन करून प्रत्येक विभाग अपघातमुक्त राखण्यासाठी ते डोळ्यांत तेल घालून दक्ष असतात. छोटीशी चूक अथवा दुर्लक्ष केवळ त्या एका उद्योगाच्याच नव्हे, तर संबंधित क्षेत्रासाठी सुद्धा महाग ठरू शकते. म्हणूनच या घटकांमुळे केवळ औद्योगिक क्षेत्र सुरक्षित राहात नाही, तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था आणि समाज देखील सुरक्षित राहतो, ही बाब लक्षात घ्यायला हवी. यावेळी त्यांनी औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींचीही सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांची गरज निर्माण झालेली आहे. औद्योगिक क्षेत्राची वाटचाल सुरळीत, योग्य दिशेने होण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सांगितले .
कार्यशाळेत योगेश मुळे यांनी ‘सुरक्षा व्यवस्थापनासाठी सक्रिय दृष्टीकोन’, स्वाती जोशी यांनी ‘सुरक्षा लेखापरीक्षण’, आरोग्य अधिकारी डॉ. विनिता रानडे ‘अपघातानंतरचे प्रथमोपचार’ आणि अग्नीशमन अधिकारी दस्तगीर मुल्ला यांनी ‘अग्निशामक यंत्राचा वापर आणि अग्नीपासून बचाव’ या अनुषंगाने मार्गदर्शन केले. श्री. मुल्ला यांनी अग्नीशमन यंत्रणेच्या वापराची प्रात्यक्षिकेही दाखविली.
पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. पल्लवी भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमास औद्योगिक क्षेत्रातील ५० पेक्षा जास्त सुरक्षा अधिकाऱ्यांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment