(प्रतीकात्मक छायाचित्र) |
कोल्हापूर, दि. १३ मार्च: शिवाजी विद्यापीठामार्फत महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज पहिल्या दिवशी मुंबई, नागपूर, नांदेड आणि जळगाव विद्यापीठाच्या संघांनी विजयी सलामी दिली.
सकाळच्या सत्रात मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यात झालेला सामना मुंबईने सात गडी राखून जिंकला.
नागपूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या संघाने २० षटकात ७ बाद १३१ धावा केल्या. या संघाकडून अजय गावंडे यांनी ३६, संदीप रेंधे यांनी नाबाद ३० तर काकासाहेब खोसे यांनी नाबाद २५ धावा केल्या. मुंबई विद्यापीठ संघाकडून विपुल खंडारे यांनी ३ बळी
घेतले तर संजय पवार, श्रीकांत मोडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. मुंबई विद्यापीठ संघाने फलंदाजी करताना प्रत्युत्तरादाखल १६.४ षटकांत ३ बाद १३३ धावा केल्या. अनिल घाडशी यांनी 33, मनोहर माने यांनी नाबाद ३२ तर अताहून खान यांनी १९ धावा केल्या. नागपूरच्या अजित माळी यांनी २ गडी बाद केले. सामन्यात १४ धावा काढून ३ बळी मिळविणाऱ्या मुंबईच्या विपुल खंडारे यांना सामनावीर घोषित करण्यात आले.
सकाळच्या सत्रातील दुसरा सामना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड विरूध्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्यात झाला. हा सामना नांदेडने जिंकला.
या सामन्यात नांदेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लोणेरे संघाने १३.५ षटकात सर्व बाद ९७ धावा केल्या. या संघाकडून रोहीत गमरे यांनी ४८, ओंकार बोंधीलकर यांनी १२ आणि जीतू अंधेरे यांनी ११ धावा
केल्या. नांदेडच्या जयराम हंबर्डे यांनी ४ गडी बाद केले. नांदेड विद्यापीठ संघाने प्रत्युत्तरादाखल १३.२ षटकात ६ बाद ९८ धावा केल्या. त्यात पी.एम. मुपडे यांनी ३६ तर अजमेर बिदला यांनी ११ धावा केल्या. लोणेरेच्या रोहीत गमरे यांनी २ व जितू अंधेरे यांनी १ गडी बाद केला. ४ बळी घेणारे नांदेडचे जयराम हंबर्डे सामनावीर ठरले.
दुपारच्या सत्रातील पहिला सामना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विरूध्द सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात झाला. हा सामना पुणे विद्यापीठाने ९ गडी राखून जिंकला.
पुणे विद्यापीठाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. नाशिकच्या संघाने १८.१ षटकात १० बाद ७५ धावा केल्या. नाशिक संघाकडून किरण राऊत यांनी २७, विजय शार्दुल यांनी ११ व दिलीप भंडारे यांनी ८ धावा केल्या. पुण्याच्या मनिष गायकवाड व दिपक गज्वल यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. त्यानंतर पुणे संघाने फलंदाजी करताना ७.३ षटकात अवघा एक गडी गमावून ७७ धावा केल्या. विनोद नरके यांनी २९ तर मनिष गायकवाड यांनी ३५ धावा केल्या. सामन्यात ३५ धावा करून गोलंदाजीतही ३ बळी
मिळविण्याची अष्टपैलू कामगिरी करणारे मनिष गायकवाड सामनावीर ठरले.
दिवसातील अंतिम सामना यजमान शिवाजी विद्यापीठ आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यात झाला. हा सामना जळगावने ६ धावांनी
जिंकला.
जळगाव संघाने नाणेफेक
जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकांत ४ बाद १८३ धावा केल्या. जितेंद्र
पाटील यांनी ६४, अभिमन्यू पवार यांनी ४६ तर चंदन मोरे यांनी २४ धावा केल्या. शिवाजी
विद्यापीठाच्या सिध्दार्थ लोखंडे याने चार षटकांत २१ धावांच्या मोबदल्यात २ बळी
घेतले. प्रत्युत्तरादाखल शिवाजी विद्यापीठ संघ २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १७७
धावांपर्यंत मजल मारू शकला. विनायक शिंदे याने ४६ धावा केल्या. जळगावच्या विठ्ठल डांगर
यांनी दोन बळी घेतले. जळगावचे जितेंद्र पाटील सामनावीर ठरले.
No comments:
Post a Comment