कोल्हापूर, दि. १९ मार्च:
येथील शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी
कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर शिवाजी
विद्यापीठ, कोल्हापूर आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या विद्यापीठांनी
सरासरीच्या बळावर उपांत्य फेरीत स्थान पटकावले.
स्पर्धेत आज आठव्या दिवशीचा पहिला सामना कवयित्री बहिणाबाई
चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात झाला. जळगावने हा सामना ५ धावांनी
जिंकला. जळगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५५
धावा केल्या. त्यांच्याकडून जितेंद्र पाटील यांनी ३६ चेंडून अर्धशतक झळकावले तर
विकास बिर्डे यांनी ४२ धावा केल्या. सोलापूरच्या मुख्तार शेख यांनी २ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सोलापूर
संघाने २० षटकांत ९ बाद १५० धावांपर्यंत मजल मारली आणि सामना अवघ्या ५ धावांनी
गमावला. त्यांच्याकडून सुनील थोरात यांनी ४६, तर श्रीशैल यांनी ३२ धावा केल्या.
जळगावच्या अरुण सपकाळे आणि विठ्ठल धनगर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. जळगावचे जितेंद्र
पाटील सामनावीर ठरले.
दुपारचा सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठ, परभणी यांच्यात झाला. पुण्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी
करताना २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या. विनोद नरके यांनी ४३ तर दीपक गजरमल यांनी ३९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना परभणीचा
संघ १३.१ षटकात सर्वबाद १०९ धावाच करू शकला. पुण्याच्या सुनील मते आणि दीपक गजरमल यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. दीपक गजरमल सामनावीर
ठरले.
दरम्यान, उद्या (दि. २१) उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. सकाळी ९ वाजता मुंबई विद्यापीठ आणि स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्यात पहिला सामना होईल. दुपारच्या सत्रात
दुसरा सामना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,
पुणे यांच्यात होईल. २२ मार्च रोजी तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना सकाळच्या सत्रात तर
अंतिम लढत दुपारच्या सत्रात होईल.
No comments:
Post a Comment