Saturday 18 March 2023

राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेतील विजेत्या संघाचे विद्यापीठात उत्साही स्वागत

 

चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या संघाचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. शरद बनसोडे आदी.


कोल्हापूर, दि. १८ मार्च: चेन्नई येथे झालेल्या ८२व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठास प्रथमच सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या संघाचे आज विद्यापीठात उत्साही स्वागत करण्यात आले.

देशभरातील १७८ विद्यापीठे सहभागी असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत आघाडीचे स्थान प्राप्त करून शिवाजी विद्यापीठाचा विजेता संघ आज सकाळी चेन्नईहून थेट विद्यापीठात दाखल झाला. प्रांगणात येताच संघातील खेळाडूंनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन केले. तेथेच कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी विजेत्या संघाचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अॅथलेटिक्समध्ये सर्वसाधारण विजेतेपद मिळविण्याची कामगिरी करून आपण सर्व ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपले मैदानावरील प्रभुत्व राष्ट्रीय स्तरावर सिद्ध केले आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा देऊन त्यांचे लक्ष केवळ सराव आणि स्पर्धा यांच्यावरच केंद्रित राहावे, यासाठी विद्यापीठ आपल्या परीने प्रयत्न करीत आहेच. पण आपण खेळाडूंनीही त्यामध्ये आणखी काही सुधारणा आवश्यक असल्यास आवर्जून सुचवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामीण भागातील या खेळाडूंना, विशेषतः विद्यार्थिनींना क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्यास अनुमती देणाऱ्या त्यांच्या आईवडिलांचेही या निमित्ताने कुलगुरूंनी विशेष अभिनंदन केले. त्यांनी प्रत्येक खेळाडूचे व्यक्तीगतरित्या भेट घेऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. संघाला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

दरम्यान, चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धेत विद्यापीठ संघाने २ सुवर्णपदकांसह एकूण १३ पदके प्राप्त केली. मुलींच्या 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉनमध्ये रेश्मा केवटेने सुवर्णपदक मिळविले तर 10 हजार मीटर धावणेतही कांस्य पदक मिळविले. मुलांच्या गटात 21 किलो मीटर हाफ मॅरेथॉन आणि 10 हजार मीटर धावणे स्पर्धांत विवेक मोरेने रौप्य पदके मिळविली. सुदेश्णा शिवणकरने 100 मीटर धावणे प्रकारात सुवर्णपदक तसेच 200 मीटर धावणेत रौप्य पदक मिळविले. अनुष्का कुंभारने 400 मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक मिळविले. 800 मीटर धावणेत रोहिणी पाटीलने व 5 हजार मीटर धावणे स्पर्धेत उत्तम पाटीलने कांस्य पदके मिळविली. प्राजक्ता शिंदेने 10 हजार मीटर धावणेत रौप्य आणि 5 हजार मीटर धावणेत कांस्य पदक मिळविले. सुशांत जेधे याने 3 हजार मीटर ट्रिपलचेस धावणे स्पर्धेत आणि कुशल मोहितेने डेकॅथलॉन स्पर्धेत प्रत्येकी 1 कांस्य पदक प्राप्त केले.

विजेत्या संघाला संघ व्यवस्थापक डॉ. सविता भोसले, प्रशिक्षक डॉ. इब्राहिम मुल्ला, संघ निवड समितीचे प्रमुख रामा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment