Thursday 16 March 2023

महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा (दिवस चौथा):

शिवाजी विद्यापीठासह लोणेरे, परभणी, नागपूर संघांचे विजय

 



कोल्हापूर, दि. १६ मार्च: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत आज चौथ्या दिवशी यजमान शिवाजी विद्यापीठासह लोणेरे, परभणी आणि नागपूर संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले. शिवाजी विद्यापीठ-ब संघास मात्र पराभव पत्करावा लागला.

आजचा पहिला सामना शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यात झाला. हा सामना शिवाजी विद्यापीठाने ६ गडी राखून जिंकला.

नाशिक संघाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी 20 षटकात 9 बाद 123 धावा केल्या. त्यांच्याकडून नंदकिशोर ठाकरे यांनी 24 तर राजेंद्र शहाणे यांनी 26 धावा केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या विनायक शिंदे यांनी 3 तर विश्वनाथ वरुटे आणि अजय आयरेकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिवाजी विद्यापीठाने 16.4 षटकात 4 बाद 127 धावा केल्या. विक्रम कोंढावळे याने नाबाद 64 धावा केल्या, तर अनिल पाटील यांनी 22 तर विश्वनाथ वरुटे यांनी 17 धावा केल्या. विक्रम कोंढावळे सामनावीर ठरला.

दुसरा सामना नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्यात झाला. लोणेरे संघाने हा सामना ६६ धावांनी जिंकला. लोणेरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 166 धावा केल्या. त्यांच्याकडून ओंकार बोदीळकर यांनी 50 तर जितेंद्र अंधेरे यांनी 20 संतोष हसे यांनी 15 धावा केल्या. नाशिकच्या योगेश जाधव, दिलीप भंडारी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल नाशिकचा संघ 20 षटकात 10 बाद 100 धावाच करू शकला. त्यांच्या किरण राऊतने 30 धावा केल्या. लोणेरेच्या ओंकार बोदिळकर यांनी 3 तर जितेंद्र अंधेरे विनायक तवसळकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ओंकार बोदिळकर सामनावीर ठरला.

दुपारच्या सत्रात शिवाजी विद्यापीठ-ब आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्यात सामना झाला. हा सामना पभणीने तब्बल ९ गडी राखून जिंकला. शिवाजी विद्यापीठ-ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 12.3 षटकात सर्वबाद 96 धावा केल्या. परभणीच्या मारुती शेलाले यांनी 4 तर मनोज कऱ्हाळे यांनी 2 गडी बाद केले. परभणी संघाने अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात 9.5 षटकात 98 धावा केल्या. त्यात मनोज कऱ्हाळे यांच्या 47 धावांचा समावेश राहिला. सामनावीर त्यांनाच घोषित करण्यात आले.

दुपारचा दुसरा सामना महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ, नागपूर आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यात झाला. नागपूरने हा सामना ४ गडी राखून जिंकला. नागपूरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. जळगाव संघाने 20 षटकात 6 बाद 154 धावा केल्या. त्यामध्ये जितेंद्र पाटील यांच्या नाबाद 57, सुभाष पवार यांच्या 28 अभिमन्यू पवारच्या 27 धावा होत्या. नागपूरच्या अजित माळी यांनी 4 गडी बाद केले. नागपूरने हे आव्हान ६ गड्यांच्या मोबदल्यात 15.4 षटकात पार केले. अजय गावंडे यांनी नाबाद 68 सतिश यादव यांनी 25 धावा केल्या. अजित माळी सामनावीर ठरले.

No comments:

Post a Comment