Wednesday, 8 March 2023

महिलांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

 शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर (डावीकडून) संध्या आडसुळे, डॉ. वर्षा जाधव, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रकाश गायकवाड आणि डॉ. प्रतिभा देसाई.

शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी (डावीकडून) डॉ. वर्षा जाधव, संध्या आडसुळे, डॉ. प्रतिभा देसाई, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. प्रकाश गायकवाड.


कोल्हापूर, दि. ८ मार्च: वर्षातला प्रत्येक दिवस हा महिलांचाच असून आजचा दिवस हा त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे अंतर्गत तक्रार निवारण समिती, बेटी बचाओ अभियान आणि कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन डॉ. पाटील बोलत होते. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, भारतात महिलांमध्ये सुद्धा ग्रामीण-शहरी असे भेद आहेत. त्यांच्यासमोरील समस्यांचे स्वरुप वेगळे आहे. त्या समस्यांची परस्परांना जाणीव नाही. ही एक मोठी दरी आहे. ही दरी सांधण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. त्या दृष्टीने विद्यापीठीय तथा शैक्षणिक व्यवस्थेमध्ये कार्यरत महिलांनी सदर समस्यांवर केंद्रित असणारे संशोधन प्रकल्प हाती घ्यायला हवेत. महिलांच्या प्रश्नांची चर्चा एका दिवसापुरती नव्हे, तर वर्षभर संशोधन करून त्यावर साधकबाधक उपाययोजना सामोऱ्या आणल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी वित्तीय संस्थांनीही निधीची उपलब्धता करण्यासाठी पुढे यायला हवे. आज हवामान बदल आणि शाश्वत विकासाचे आणखी एक आव्हान आपल्यासमोर आहे. ते अधिकाधिक गंभीरच होत जाणार आहे. महिलाशक्तीने एकत्र येऊन त्यावर मात करण्याचे ठरविल्यास या समस्याही निश्चितपणे सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नम्रता जाधव (प्राणीशास्त्र अधिविभाग), प्रियांका पाटील (वनस्पतीशास्त्र अधिविभाग) आणि अश्विनी कांबळे (वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग) या विद्यार्थिनींनी अनुक्रमे मलेरियावरील लस संशोधक तु यावुयाव, वृक्षलागवडकर्त्या तुलसी गौडा व बीजमाता राहीबाई पोपेरे आणि तृतीयपंथी ज्ञानेश्वर कांबळे यांचा ओळखीसाठीचा संघर्ष या विषयांवर थोडक्यात पण लक्षवेधी सादरीकरण केले.

यानंतरच्या सत्रात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मीना शेषू आणि तनुजा शिपूरकर यांनी आधुनिक काळात महिलामुक्तीच्या अनुषंगाने सविस्तर मांडणी केली. दुपारी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध प्रबोधनपर विषयांवर पथनाट्यांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योजी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांनी स्वागत केले. अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष डॉ. वर्षा जाधव यांनी प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपकुलसचिव संध्या आडसुळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, डॉ. भारती पाटील यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, महिला शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment