Thursday, 23 March 2023

आदिवासी समाजामुळेच जंगलाचे जतन व संरक्षण: संपत देसाई

 ‘जंगल आणि आदिवासी समाज’ या विषयावर विद्यापीठात परिसंवाद

शिवाजी विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलताना संपत देसाई. मंचावर डॉ. नितीन माळी, उदय गायकवाड, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. प्रकाश राऊत आणि डॉ. आसावरी जाधव.

 

कोल्हापूर, दि. २३ मार्च: आदिवासी समाजच जंगलांचे जतन व संरक्षण करीत असून नागर समाजामुळे त्याचे नुकसान होत आहे, असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्रच्या आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘जंगल आणि आदिवासी समाज’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉं. प्रकाश राऊत, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड आणि संपत देसाई प्रमुख वक्ते सहभागी झाले. अध्यक्षस्थानी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन होते.

संपत देसाई म्हणाले, आदिवासी समाजात स्त्रीभ्रूण हत्या घडत नाही. आदिवासी समाजबांधव आत्महत्या करीत नाहीत त्याचबरोबर त्यांच्यामध्ये मनोरुग्णता देखील आढळून येत नाही त्यामुळे हा समाज खऱ्या अर्थाने आधुनिक आहे. विकासाचे मोजमाप करताना प्रथम सर्व आदिवासी समाजाचे जगणे समजून घेणे आवश्यक आहे. या समाजाने प्रचंड निरीक्षण शक्तीच्या व पारंपरिक ज्ञानाच्या आधारे आपले जगणे समाधानाचे बनविले आहे. गरजेपेक्षा जास्त वृक्षाची तोड वा प्राण्याची शिकार आदिवासी समाज करीत नाही. मात्र नागर समाजाच्या वाढत्या अपेक्षा व विकासाचे बदलते आयाम यामुळे जंगलाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी होवून सामुहिक वनहक्काचे  दावे मंजूर होणे आवश्यक आहे.

डॉ. प्रकाश राऊत म्हणाले, माणसाला आनंदी राहण्यासाठी स्वच्छ पर्यावरणाची आवश्यकता असते. त्यामुळे पर्यावरणाची जपणूक झाली पाहिजे. जंगल हा पर्यावरणाचा गाभा असून प्रचंड प्रमाणात होणारी जंगलतोड पर्यावरणाचा समतोल बिघडविणारी आहे. वृक्षतोडीमुळे अन्नसाखळी व अन्नजाळी विस्कळीत होईल परिणामी पर्यावरण समतोल बिघडेल. वनांमुळे जलचक्राचे नियमन व भूपृष्ठाचे संरक्षण होते. जमिनीचे धूप कमी करण्यासाठी, प्रदूषण रोखण्यासाठी आणि पाणीधारण क्षमता वाढविण्यासाठी जंगले उपयुक्त आहेत. वाढते बांधकाम आणि उद्योग, वनवणवे, खाणकाम इत्यादी जंगलास निर्माण झालेले धोके आहेत. 

ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्ते उदय गायकवाड म्हणाले, आदिवासी हे नगर संस्कृतीपासून दूर असलेले मूळ रहिवासी असून आर्य आणि द्रविड संस्कृतीच्याही अगोदर या देशात त्यांचे वास्तव्य आहे. देशाच्या विविध भागात हा समाज जंगलामध्ये आढळून येतो. त्यांच्यामध्ये अनेक जात समुदाय आढळून येतात. त्यांच्या रहण्याच्या पद्धती, चालीरीती, पोशाख, शिकारीचे नियम वेगवेगळे आहेत. त्यांच्याकडे हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्याचे ज्ञान आहे. या समाजाने जगलाचे व पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे हा जंगलाचा शत्रू नाही तर जंगलाचा राजा आहे.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, विद्यापीठातील संशोधन समाजापर्यंत पोहचले पाहिजे. विकासाचे प्रत्येक पाऊल हे निसर्गाच्या विरुद्ध असते. चिरंतन विकास घडवून आणायचा असेल तर  आदिवासींच्या पारंपारिक ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे व तेच विकासाची पहिली पायरी असायला पाहिजे.

पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी परिसंवादाचे समालोचन केले.  परिसंवादातील मुक्तसंवादाचे संचलन डॉ. अमोल मिणचेकर यांनी केले. या मुक्तसंवादात विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या शंकांचे तज्ज्ञांनी समाधान केले. स्वागत व प्रास्ताविक अविनाश भाले यांनी केले, तर डॉ. नितीन माळी यांनी आभार मानले. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये झालेल्या या परिसंवादात पर्यावरणशास्त्र व यशवंतराव चव्हाण स्कूल फॉर रुरल डेव्हलपमेंट मधील प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले.  

No comments:

Post a Comment