कोल्हापूर, दि. २७ मार्च: विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून समाजाची उन्नती
साधण्याचा विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के
यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी
विकास विभागामार्फत राजमाता जिजाऊसाहेब बहूउद्देशीय सभागृहामध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
अंतर्गत ''शिवस्पंदन 2022-23'' या मध्यवर्ती सांस्कृतिक
उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून
कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के बोलत होते.
कुलगुरू डॉ.शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांच्या
कला-गुणांना प्रोत्साहन देण्याकरिता विद्यापीठाचे एक स्वतंत्र नियतकालिक तयार करण्याच्या
दृष्टीने विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील कलाविष्कार आणि
सुप्त गुण सामोरे येतील. विद्यापीठाच्या हिरक महोत्सवाच्या अनुषंगाने प्रथमच नाविण्यपूर्ण
उपक्रम हाती घेतलेले आहे. शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यक्तीमत्व विकासाकडे विद्यार्थ्यांनी
लक्ष केंद्रीत केले पाहिजे.
प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील
म्हणाले, सांस्कृतिक उपक्रमांमधून
विद्यार्थी देश पातळीवर विद्यापीठाचे नांवलौकिक करीत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण
विकास होण्यासाठी सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांच्या
कला-गुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवस्पंदन उपक्रमाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून
विद्यार्थ्यांना संधीचे नवे द्वार उघडण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या 40 अधिविभागांमधील विद्यार्थ्यांकरिता
शिवस्पंदन सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नकला, मुकनाटय, लघुनाटीका, सुगम गायन, समूह गीत, एकल वाद्यवादन, एकल नृत्य आणि समुह
नृत्य यांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात सात गटांमध्ये सहभागी 500 विद्यार्थ्यांमधून
प्रथम, द्वितीय आणि तृतीय
आलेले 200 विद्यार्थी सादरीकरण
करतील. त्यामधून अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.
विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी
संचालक डॉ.प्रकाश गायकवाड यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी केले. सूत्रसंचलन
समन्वयक डॉ.मिना पोतदार यांनी केले. तर शिवस्पंदन 2022-23 चे अध्यक्ष डॉ.नितीन कांबळे यांनी आभार मानले.
याप्रसंगी क्रीडा अधिविभागप्रमुख
डॉ.शरद बनसोडे, आजीवन अध्ययन व विस्तार
विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.तानाजी चौगुले यांच्यासह
विविध अधिविभागांचे प्रमुख, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment