![]() |
| (फोटोओळ- उपरोक्त सर्व फोटोंसाठी) शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात शिक्षक म्हणून अखेरचे लेक्चर घेताना कुलगुरू तथा प्राध्यापक डॉ. दिगंबर शिर्के. |
कोल्हापूर, दि. ३० जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा संख्याशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्यांच्या शिक्षक म्हणून अखेरच्या दिवशी विद्यार्थ्यांसमोर लेक्चर देऊन अधिविभागाचा निरोप घेतला. नियत वयोमानानुसार डॉ. शिर्के आज संख्याशास्त्र अधिविभागातून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले.
आजचा काळ स्मार्ट क्लासरुम शिक्षणाचा असला
तरी सच्चा हाडाच्या शिक्षकासाठी मात्र खडू, फळा आणि डस्टर या साधनांचेच आकर्षण
असते. साधारण ४० वर्षांपूर्वी जून १९८५ मध्ये डॉ. शिर्के हे विद्यार्थी म्हणून
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात दाखल झाले. तेथपासून ते आजतागायत
त्यांची संपूर्ण कारकीर्द शिवाजी विद्यापीठातच घडली, साकार झाली. विद्यार्थीदशेत
असतानाच डॉ. शिर्के यांनी खडू, फळा आणि डस्टरधारी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले
आणि ते पूर्णही केले. शिक्षकापासून ते अधिविभाग प्रमुख पदापर्यंत आणि प्रशासनातील
कुलसचिव पदापासून ते कुलगुरू पदापर्यंत त्यांनी सर्व पदे यशस्वीरित्या भूषविली. प्रशासनात
असतानाही त्यांनी वेळोवेळी अधिविभागामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
अध्यापन केले. शिक्षक म्हणून आपल्या अखेरच्या दिवशीही आपण विद्यार्थ्यांसमोर खडू,
फळ्यावर लेक्चर घ्यावयाचे, अशी सुप्त इच्छा डॉ. शिर्के यांच्या मनी होती. ती
त्यांनी आज त्यांच्या शिक्षक पदाच्या अखेरच्या दिवशी पूर्ण केली.
सदर व्याख्यानासाठी ते नेहमीप्रमाणे अर्धा तास आधीच संख्याशास्त्र
अधिविभागात उपस्थित झाले. शिकवावयाच्या विषयाचा अभ्यास केला. आवश्यक नोट्स तयार
केल्या आणि वर्गात प्रवेश केला. त्यांनी "स्टॅटिस्टिकल सिम्युलेशन अँड इट्स अॅप्लीकेशन्स" या विषयावर अतिशय सोप्या
पद्धतीने, सुसंगत उदाहरणांसह व्याख्यान दिले.
या व्याख्यानात त्यांनी अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या ‘दि अमेरिकन
स्टॅटिस्टिशियन’ या
मान्यताप्राप्त शोधपत्रिकेमध्ये १९९१ साली प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधातील ‘आयलस कॉन्स्टंट’ (e) संदर्भातील
संख्याशास्त्रीय सिद्धांत, संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवल्या. त्या संकल्पना सोप्या, स्पष्ट आणि
विद्यार्थ्यांच्या आकलनास अनुरूप अशा शब्दांत मांडल्या.
विशेष म्हणजे, अधिविभागात स्मार्ट क्लासरुम आणि स्मार्ट बोर्ड
असतानाही त्यांनी हा विषय खडू आणि फळा अशा पारंपरिक पद्धतीने शिकविण्याचा आनंद
घेतला. विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. या विषयावर आधारित पुढील अभ्यास
आणि संशोधनाच्या दिशांचे स्वरुप याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन प्राध्यापक शिर्के यांनी आपल्या अधिविभागातील
शिक्षक म्हणून अखेरच्या व्याख्यानाचा समारोप केला. कोणताही औपचारिक निरोप नाही,
समारंभ नाही, पुष्पगुच्छांची देवाणघेवाण नाही, झाली ती केवळ विचारांची देवाणघेवाण.
कुलगुरू पदाचा बडेजाव न मिरविता एक शिक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना किती
निरलस भावनेने निवृत्तीकडे सरकता येते, याचा वस्तुपाठच जणू डॉ. दिगंबर शिर्के
यांनी या निमित्ताने घालून दिला.



सरांचं प्रत्येक लेक्चर हे खूपच ज्ञानवर्धक असतं. क्लिष्ट संकल्पना सुद्धा अत्यंत सोप्प्या पद्धतीने मांडण्याचं कौशल्य सरांच्याकडे आहे...!! असे प्राध्यापक आम्हाला लाभले हे आमच सौभाग्य आहे....!!
ReplyDeleteअमोल मारुती घाडगे
(सांख्यिकी अन्वेषक)
राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालय, पुणे
कुल'गुरू'पदाची प्रतिष्ठा लाभूनही ते मनाने ‘गुरु’ राहिले ही बाब केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सार नव्हे, तर एका संपूर्ण शिक्षकीय तत्त्वज्ञानाचे संचित आहे.
ReplyDeleteचार दशके एका संस्थेशी नातं टिकवून, त्या संस्थेला शहाणपणाची ऊब देणं ही गोष्ट सहजसोप्या व्रतासारखी नक्कीच नाही. पण सरांनी ती निस्पृहतेने, शिस्तीने आणि सातत्याने पार पाडली. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना समर्पित राहणं, प्रशासक म्हणून कार्यक्षम निर्णय घेणं, आणि एक व्यक्ती म्हणून नम्रता जपणं, या तिन्ही अंगांमध्ये त्यांनी अद्वितीय समतोल साधला.
शेवटच्या दिवशी कोणताही सोहळा न करता, केवळ एक साधं पण अभ्यासपूर्ण लेक्चर घेणं, हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्युच्च बिंदू ठरावा. ती होती सन्मानाची प्रतिष्ठा, सेवेची बांधिलकी आणि शिक्षकतेची पूर्णता.
शब्द थांबले असतील, पण त्या फळ्यावर उमटलेली प्रत्येक रेघ त्यांच्या स्मृतीरेषा होऊन विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर कोरली गेली आहे. ते केवळ निवृत्त झाले, पण ‘गुरु’ म्हणून ते अजूनही अनेकांच्या मनात बोलत राहतील, शिकवत राहतील...
मा. कुलगुरू डॉ. शिर्के सरांना कृतज्ञतेने, नम्रतेने आणि अंतःकरणपूर्वक नमस्कार व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
— डॉ. के. बी. पाटील
आदरणीय सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवेतून आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये एक सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य निर्माण केलं आहे...त्यामुळे सरांचा विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा निर्माण करतो. कोणताही विषय मांडताना तो अगदी सोप्प्या पद्धतीने सांगण्याचं सरांचं कौशल्य नेहमीच विद्यार्थ्यांना आवडतं...!!
ReplyDeleteसर आज वयोमानानुसार निवृत्त होत असले तरी त्यांनी दिलेली सेवा ही "ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमाप्रमाणे" त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांच्या रूपाने अखंडपणे सुरू राहील...!!
सरांनी संख्याशास्त्र आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाला सलाम...!!🙏🙏