कोल्हापूर, दि. ३ जून: मटेरियल सायन्स
या विषयामध्ये देशातील आघाडीच्या दहा संशोधकांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे
प्र-कुलगुरू तथा जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश झाला आहे. ‘रिसर्च डॉट कॉम’ या संशोधन
मंचाने सन २०२४ ची विविध विषयांतील जागतिक आघाडीच्या संशोधकांची यादी नुकतीच जाहीर
केली. त्यामध्ये डॉ. पाटील मटेरियल सायन्समधील संशोधनात देशात नवव्या स्थानी आहेत.
मटेरियल सायन्समधील संशोधनाच्या अनुषंगाने
प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांचे विविध संशोधकीय निर्देशांक हे खूप उच्च दर्जाचे आहेत.
त्यांच्या संशोधनाचा एच-इंडेक्स ९४, आय-१० इंडेक्स ५४० तर डी-इंडेक्स ८८ इतका आहे. त्यांचे ६०० हून
अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शोधपत्रिकांतून प्रसिद्ध झाले असून
त्यांच्या संशोधनास ३३,८८० सायटेशन्स मिळाली आहेत. अर्थात तितक्या संशोधकांनी डॉ.
पाटील यांच्या शोधनिबंधांचे संदर्भ आपल्या संशोधनात दिले आहेत. रिसर्च डॉट कॉमने
सन २०२४मध्ये विषयनिहाय जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये डॉ. पाटील यांना मटेरियल सायन्समध्ये देशातील
पहिल्या १० संशोधकांमध्ये आणि जागतिक स्तरावर १५१२ वे स्थान प्राप्त झाले आहे. डॉ.
पाटील यांचे सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण संशोधन यामुळे ही कामगिरी साध्य झाली
आहे. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जागतिक आघाडीच्या दोन
टक्के संशोधकांच्या यादीतही त्यांचे स्थान खूप वरचे आहे, तर ए.डी. सायंटिफिक
निर्देशांक आकडेवारीतही त्यांचा समावेश आहे.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील शिवाजी विद्यापीठाच्या
भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक असून त्यांनी मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात
गेल्या ३५ वर्षांपासून उत्कृष्ट अध्यापन व संशोधन करीत आहेत. डॉ. पाटील यांचे संशोधन
प्रामुख्याने नॅनोमटेरियल्स (nano-materials), थिन फिल्म्स (thin films) आणि ऊर्जा साठवणुकीच्या (energy storage) क्षेत्रात आहे. ही क्षेत्रे आधुनिक
तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अत्यंत मूलभूत मानली जातात आणि त्यांचा दैनंदिन जीवनावर
मोठा प्रभाव पडतो. त्यांच्या संशोधनाचा उपयोग सौर ऊर्जा (solar energy), बॅटरीज (batteries) आणि सेन्सर्स (sensors) यांसारख्या अनेक
महत्त्वाच्या उपकरणांमध्ये होतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संशोधन यशस्वीपणे
पूर्ण केले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात
आले आहे. त्यामध्ये जर्मनीची डॅड फेलोशिप, इंग्लंडची इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सची फेलोशिप
व दक्षिण कोरियाची ब्रेन पूल यांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठाने २०१४ मध्ये गुणवंत
शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले आहे. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स इंडिया, अलाहाबाद आणि महाराष्ट्र
अकॅडमी ऑफ सायन्स यांचे ते फेलो आहेत. त्यांची चार आंतरराष्ट्रीय पुस्तके प्रकाशित
असून त्यांच्या नावावर सात पेटंटही आहेत.
‘रिसर्च डॉट कॉम’विषयी...
‘रिसर्च डॉट कॉम’ हा जागतिक स्तरावरील
अत्यंत प्रतिष्ठित संशोधन डेटा मंच आहे; जो जगभरातील महत्त्वाच्या संशोधकांची त्यांच्या क्षेत्रातील योगदानानुसार
क्रमवारी लावतो. ही क्रमवारी अत्यंत पारदर्शक आणि कठोर वैज्ञानिक निकषांवर आधारित असल्याने
तिला जागतिक मान्यता आहे. क्रमवारी ठरवताना संशोधकांच्या प्रकाशित शोधनिबंधांची संख्या, त्यांना प्राप्त
सायटेशन्स (citations) आणि एच-इंडेक्स (h-index) यांसारख्या प्रमुख वैज्ञानिक निकषांचा विचार केला जातो. ‘एच-इंडेक्स’ हे संशोधकाच्या प्रकाशित
शोधनिबंधांची संख्या आणि त्यांना मिळालेल्या सायटेशन्सची गुणवत्ता व प्रमाण दर्शवणारे
एक महत्त्वाचे परिमाण आहे. उच्च एच-इंडेक्स म्हणजे संशोधकाचे कार्य मोठ्या प्रमाणावर वाचले जाते, संदर्भित केले जाते
आणि त्याचा वैज्ञानिक समुदायावर व्यापक प्रभाव असे समीकरण असते. तर, ‘डी-इंडेक्स’ (D-index) (डिसिप्लीन
इंडेक्स) हे संशोधकाच्या एखाद्या विशिष्ट अभ्यासक्षेत्रातील संशोधन कार्य आणि त्याच्या
प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाणारे मापन आहे. म्हणजे डॉ. पाटील हे मटेरियल
सायन्समध्ये संशोधन करतात, तर त्यांच्या डी-इंडेक्ससाठी मटेरियल सायन्सशी संबंधित शोधनिबंधांचाच
विचार येथे केला जातो.
एखाद्या वैज्ञानिकाला "टॉप"
मानण्यासाठी आवश्यक असलेला किमान डी-इंडेक्स मूल्य प्रत्येक विषयानुसार (discipline) लक्षणीयरीत्या बदलू
शकते. ही मर्यादा साधारणपणे त्या क्षेत्रातील एकूण वैज्ञानिकांच्या संख्येवर आधारित
असते, जेणेकरून आघाडीच्या
एक टक्का वैज्ञानिकांचा क्रमवारीत समावेश होईल. मटेरियल सायन्समध्ये ४० चा डी-इंडेक्स
ही सामान्यतः एक मर्यादा मानली जाते.
मटेरियल
सायन्समध्ये संशोधनाच्या व्यापक संधी: डॉ. प्रमोद पाटील
मटेरियल सायन्स हे माझ्या आवडीचे संशोधनाचे
क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रात दर्जेदार संशोधनकार्य करता आले. त्या कामाचे हे
फलित आहे. मात्र, आकडेवारीपेक्षा सातत्यपूर्ण संशोधन करीत राहणे हे मला महत्त्वाचे
वाटते. मटेरियल सायन्सच्या क्षेत्रात संशोधनाच्या व्यापक संधी असून यापुढील
काळातही त्यामध्ये अधिकाधिक संशोधन करीत राहण्याचा प्रयत्न राहील. शिवाजी
विद्यापीठ या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर आघाडीवर आहे. ही आघाडी टिकविण्यासाठी
नवसंशोधकांना प्रेरित करीत राहणे आवश्यक आहे, अशी भावना या निमित्ताने प्र-कुलगुरू
डॉ. प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाची
प्रतिष्ठा वृद्धिंगत: कुलगुरू डॉ. शिर्के
प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या कामगिरीबद्दल
आनंद व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, डॉ. पाटील यांचे यश केवळ त्यांच्या
वैयक्तिक कठोर परिश्रमाचे द्योतक नाही, तर शिवाजी विद्यापीठ परिवारासाठी आणि एकूणच भारतीय विज्ञान क्षेत्रासाठी
अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या यशामुळे शिवाजी विद्यापीठाची प्रतिष्ठा राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय पातळीवर वृद्धिंगत झाली आहे. त्यांचे हे यश विद्यापीठातील युवा संशोधकांना
दर्जेदार संशोधनासाठी प्रेरित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment