कोल्हापूर, दि. १७ जून: येथील ज्येष्ठ नागरिक प्रा. अरविंद शंकर
परांडेकर आणि त्यांच्या भगिनी श्रीमती कुंदा कृष्णकांत देशपांडे यांनी शिवाजी
विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
यांच्याकडे अनुक्रमे ५ लाख आणि २५ हजार रुपयांच्या देणगीचे धनादेश सुपूर्द केले.
प्रा. अरविंद परांडेकर हे सध्या
कोल्हापूरच्या बाबूजमाल दर्ग्याजवळील परांडेकर वाडा येथे राहतात. सावंतवाडी येथील
पंचम खेमराज महाविद्यालयात ते वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. सन २००५
मध्ये ते सेवानिवृत्त झाले आहेत. परांडेकर यांनी आपली पत्नी कै. अरुंधती अरविंद
परांडेकर यांच्या स्मरणार्थ विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतिगृहासाठी पाच लाख रुपयांच्या
देणगीचा धनादेश दिला. बंधूंच्या प्रेरणेतून त्यांच्या भगिनी श्रीमती कुंदा
कृष्णकांत देशपांडे यांनीही मातोश्री कै. विमलाबाई शंकर परांडेकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थिनी वसतिगृहासाठी २५ हजार रुपयांच्या देणगीचा
धनादेश दिला. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी प्रा. परांडेकर यांच्याकडून दोघांच्या देणगी निधीचा
कृतज्ञतापूर्वक स्वीकार केला, तसेच त्यांचा ग्रंथभेट देऊन गौरवही केला.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील,
कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. गिरीष
कुलकर्णी, उपकुलसचिव रणजीत यादव, फिरोझ नायकवडी, गिरीष सुर्वे, प्रियांका सुर्वे, राहुल शिंदे
उपस्थित होते.
लोकस्मृती
वसतिगृह संकल्पनेविषयी...
शिवाजी विद्यापीठाने लोकस्मृती विद्यार्थिनी
वसतिगृह हा सुमारे शंभर विद्यार्थिनींच्या निवास व्यवस्थेसाठीचा प्रकल्प
प्रस्तावित केला आहे. हे वसतिगृह लोकांच्या सहभागातून उभारावे आणि त्यातून
लोकांच्या स्मृती जतन केल्या जाव्यात, अशा हेतूने विद्यापीठाने या वसतिगृहाची
संकल्पना मांडली. लोकांनी आपले कुटुंब, आप्तस्वकीय यांमधील प्रिय व्यक्तीच्या नावे
ठराविक निधी विद्यापीठाकडे द्यावयाचा आणि त्या व्यक्तीच्या नावे निवासी खोल्यांची
उभारणी करावयाची, अशी ही संकल्पना आहे. दानशूर नागरिकांच्या
देणगीमधून वसतिगृहाच्या तळमजल्याचे काम पूर्णत्वाकडे असून आता वरील मजल्याचे
बांधकाम करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment