देशविदेशांतील संख्याशास्त्रज्ञांकडून डॉ. दिगंबर शिर्के यांच्या शैक्षणिक कारकीर्दीचा गौरव
![]() |
| सत्काराला उत्तर देताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. शशीभूषण महाडिक, डॉ. आर.एन. रट्टीहळ्ळी आणि सौ. सुनिता शिर्के. |
कोल्हापूर, दि. २० जून: कोणत्याही समस्येवर तत्परतेने उपाय
सुचविणारा, समस्या सोडविण्याला प्राधान्य देणारा उत्तम संख्याशास्त्रज्ञ,
तंत्रज्ञानाभिमुख, विद्यार्थीप्रिय, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यास
प्राधान्य देणारा शिक्षक, उत्कृष्ट नेतृत्वगुणांनी संपन्न, कुलगुरू पदापर्यंत झेप
घेऊनही जमिनीशी घट्ट राहणारा प्रशासक, आपत्ती व्यवस्थापन कुशल, प्रसन्नचित्त व हसतमुख
व्यक्तीमत्त्वाचे धनी असलेला माणूस अशा अनेक विशेषणांसह स्तुतीसुमनांचा वर्षाव
करीत देशविदेशातील संख्याशास्त्रज्ञांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा ज्येष्ठ
संख्याशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर शिर्के यांच्या शैक्षणिक आणि संशोधकीय कारकीर्दीचा
गौरव केला.
कुलगुरू डॉ. शिर्के हे
येत्या ३० जून रोजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक म्हणून
नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने विद्यापीठात सुरू असलेल्या
आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेमधील कालचे (दि. १९) अखेरचे सत्र हे डॉ. शिर्के
यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आले. त्यामध्ये देशविदेशातील महत्त्वाच्या संख्याशास्त्रज्ञांनी
डॉ. शिर्के यांच्यासमवेत असणाऱ्या सहसंबंधांना उजाळा देत असतानाच त्यांच्या शैक्षणिक,
संशोधकीय व प्रशासकीय योगदानाचा गौरव केला. या गौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी
ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ आणि डॉ. शिर्के यांचे गुरू प्रा. आर.एन. रट्टीहळ्ळी होते.
डॉ. सुनिता शिर्के आणि संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक मंचावर
उपस्थित होते.
यावेळी अमेरिकेतील
मिसीसिपी स्टेट विद्यापीठाचे प्रा. प्रकाश पाटील म्हणाले, कुलगुरू असूनही कधी पदाचा
बडेजाव न मिरविणारे, अत्यंत साधेपणाने आणि विनम्रभावाने सर्वांना भेटणारे असे हे
भारतातले एक दुर्मिळ कुलगुरू आहेत. त्यांची शिकविण्याची, संवाद साधण्याची हातोटी
खूप अनोखी आणि आत्मीय आहे. खऱ्या अर्थाने आईवडिलांना अभिमान वाटावा, असा हा पुत्र
आहे.
ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ
डॉ. अनिल गोरे म्हणाले, डॉ. शिर्के यांची त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा मला
भावते. ते अत्यंत कर्तव्यतत्पर शिक्षक, संशोधक आणि प्रशासक आहेत. त्यांनी
महाराष्ट्र शासनासमवेत शैक्षणिक धोरणांसंदर्भात काम करीत असताना जी अकादमिक उंची
गाठली, तिला तोड नाही. आपल्या प्रत्येक कामात आनंद घेणारा आणि आपल्या
विद्यार्थ्यांनाही तशी सवय लावणारा हा एक महत्त्वाचा शिक्षक आहे.
अध्यक्षीय मनोगतात प्रा.
रट्टीहळ्ळी म्हणाले, डॉ. शिर्के यांच्या रुपाने विद्यापीठात पहिला आलेला
विद्यार्थी संख्याशास्त्र विभागात एम.एस्सी.साठी प्रवेश घेतो, हीच बाब त्यावेळी
आमच्यासाठी अभिमानास्पद होती. ही बाब गुणवत्तेच्या बळावरच आम्हाला पुढे सिद्ध
करावयाची होती. शिर्के हे तेव्हापासूनच अभ्यासाविषयी अतिशय जागरूक आणि गंभीर
विद्यार्थी होते. पद्धतशीर अभ्यास करण्यावर त्यांचा भर होता. विद्यार्थीदशेत
असतानाच आपल्या वर्गमित्रांना शिकविणारा असा तो शिक्षक होता. पुढे जाऊन ते एक
उत्तम शिक्षक, संशोधक बनले, यात अजिबात आश्चर्य नाही. त्यांच्यासारखा विद्यार्थी
मिळाला, याचा आम्हाला सदैव अभिमान वाटला. संख्याशास्त्र अधिविभागाला त्यांनी खूप
मोठी अकादमिक उंची प्राप्त करून दिली. विभागाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये त्यांनी
पहिल्या दिवसापासूनच योगदान दिले.
“आय वील कन्टिन्यू टू
स्माईल!”
सत्काराला उत्तर देताना
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आपल्या जडणघडणीमध्ये योगदान देणाऱ्या शालेय
जीवनापासून ते विद्यापीठीय जीवनापर्यंत सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
ते म्हणाले, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला चांगले मार्गदर्शक शिक्षक
मिळाले, म्हणून आजवरचा पल्ला गाठण्यात यश आले. जून १९८५मध्ये अर्थात बरोब्बर ४०
वर्षांपूर्वी मी विद्यापीठात विद्यार्थी म्हणून दाखल झालो, तेथपासून हा कुलगुरू
पदापर्यंतचा प्रवास याच कर्मभूमीत घडला. मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा असे सर्व काही
देणाऱ्या या मातृसंस्थेच्या ऋणातून उतराई होणे अशक्य आहे. मला घडविणाऱ्यांबरोबरच
समस्या निर्माण करणाऱ्यांप्रतीही मी कृतज्ञ आहे. कारण समस्याच नसत्या, तर मी त्या
सोडविल्या कशा असत्या? त्यामुळे या प्रवासात त्यांचे श्रेयही मोठे आहे.
हल्ली ‘पुढे काय?’ असा एक प्रश्न मला
सातत्याने विचारला जातो आणि त्याविषयी अनेक तर्कवितर्कही लढविले जातात. मात्र,
सध्या तरी माझ्यासमोर एक मोठा कोरा कॅनव्हास आहे. शेजारी विविधरंगांनी भरलेले
पॅलेटही आहे. जेव्हा कधी त्या कॅनव्हासवर चित्र उतरेल, तेव्हा मी ते आवर्जून
साऱ्यांना दाखवेन, असेही ते म्हणाले.
गौरवपर भाषणात अनेकांनी
डॉ. शिर्के यांच्या हसतमुख व्यक्तीमत्त्वाचा उल्लेख केला. तो धागा पकडून डॉ.
शिर्के उद्गारले, “आय वील कन्टिन्यू टू स्माईल!”
यावेळी डॉ. शिवाजी
पाटील, डॉ. शिवाजी डिसले, डी.जी. गोडसे, दिनेश हेलवाडे, रिझर्व्ह बँकेचे मधुसूदन
अडकी, प्रा. बी.व्ही. धांद्रा, आयआयटी-तिरुपतीचे प्रा. एन. बाळकृष्ण, पंजाबच्या
प्लाक्ष विद्यापीठाचे प्रा. टी.व्ही. रामनाथन, आयआयटी-मुंबईचे प्रा. सुब्रमण्यम,
गुजरातचे प्रा. के. मुरलीधरन, आयआयएससी- बेंगलोरचे प्रा. शिरीष शेवडे, प्रा.
व्ही.बी. घुटे, प्रा. एल.आर. शिंदे, प्रा. एस.रवी, टेक्सास विद्यापीठाचे प्रा.
संजय शेटे, प्रा. आशिष सेनगुप्ता, प्रा. एच.व्ही. कुलकर्णी, प्रा. दत्तात्रय काशीद
यांनी मनोगते व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाचे माजी संख्याशास्त्र विभाग प्रमुख
डॉ. एम.एस. प्रसाद यांनी शिर्के यांना व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या, तर प्रा.
एस.आर. कुलकर्णी यांनी पत्राद्वारे आपल्या भावना कळविल्या. राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या प्रतिनिधींनीही डॉ. शिर्के यांचा सत्कार केला.
कार्यक्रमात डॉ.
रट्टीहळ्ळी यांच्या हस्ते डॉ. शिर्के यांचा कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ,
स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सौ. शिर्के यांना साडी व
श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास डॉ. शिर्के यांचे वडील तुकाराम शिर्के,
बंधू अरविंद व मधुकर तसेच सौ. शिर्के यांचे आईवडील आणि कुटुंबिय उपस्थित होते.
त्यांचाही रट्टीहळ्ळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. अधिविभाग
प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुकुमार राजगुरू
यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सोमनाथ पवार यांनी आभार मानले.


No comments:
Post a Comment