विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेत सूर; यशस्वी सांगता
![]() |
| शिवाजी विद्यापीठात पार पडलेल्या तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेमध्ये देशविदेशांतून सहभागी झालेले संख्याशास्त्रज्ञ, संशोधक, अभ्यासक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी |
कोल्हापूर, दि. २१ जून: एकविसाव्या शतकात डेटा प्रचंड प्रमाणात
उपलब्ध आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणात त्याच्या गतिमान संख्याशास्त्रीय विश्लेषणाचीही
आवश्यकता आहे. समाजाच्या समस्याही मोठ्या आहेत. त्या सोडविण्यासाठी या
क्षेत्रामध्ये सामाजिक जाणिवेच्या भावनेतून, आधुनिक ज्ञानसाधनांच्या आधारे काम करणाऱ्या
संशोधक, विश्लेषकांची मोठी गरज आहे. संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी
सुसज्ज व्हावे, असा सूर शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय
संख्याशास्त्र परिषदेत उमटला.
विद्यापीठात १९ जूनपासून ‘स्टॅटिस्टिकल
मेथड्स, डेटा सायन्स अँड ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स’ या व्यापक
विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद सुरू आहे. आज तिची प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी सांगता झाली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी
होते.
परिषदेमध्ये अमेरिका, मलेशिया, ग्रीस या
देशांसह भारतभरातील विविध विद्यापीठांमधून संख्याशास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी
सहभागी झाले. या परिषदेत विविध सत्रांमध्ये आधुनिक संख्याशास्त्राशी निगडित
अनेकविध विषयांवर सूक्ष्म चर्चा करण्यात आली. तज्ज्ञ मार्गदर्शकांबरोबरच शासकीय
सेवेत कार्यरत वरिष्ठ अधिकारी, रिझर्व्ह बँक, उद्योग, व्यवसाय, फायनान्स,
इकॉनॉमिक्स, वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या
तज्ज्ञांनीही आपापल्या अनुभवातून संख्याशास्त्राची भावी दिशा कशा स्वरुपाची असेल
आणि त्यामध्ये संधी मिळविण्यासाठी कोणत्या प्रकारची तयारी करावी लागेल, या
दृष्टीने मांडणी केली. डॉ. प्रकाश पाटील, डॉ. अनिल गोरे, डॉ. आर.एन. रट्टीहळ्ळी
आदी ज्येष्ठ तज्ज्ञांनी विविध सामाजिक-आर्थिक समस्यांची निवड करून त्या सोडवून समाजस्वास्थ्य
सुधारण्यासाठी संख्याशास्त्राचे उपयोजन कसे करावे, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. समारोप
सत्रात शिवाजी विद्यापीठाने या परिषदेचे नेटके संयोजन केले, याबद्दल सहभागींनी
समाधान व्यक्त केले आणि कुलगुरूंना धन्यवाद दिले.
परिषदेमध्ये प्रोबॅबिलिटीज अँड पॅटर्न्स, इंडस्ट्री फोकस्ड
स्टॅटिस्टिकल मेथड्स, टाईम सिरीज अॅनालिसीस, टाईम सिरीज मॉडेलिंग, स्टॅटिस्टिकल
मॉडेलिंग, ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स, स्टॅटिस्टिकल इन्फरन्स: एस्टीमेशन
थिअरी, स्टॅटिस्टिकल कन्सल्टन्सी: ऑपोर्च्युनिटीज, चॅलेंजेस अँड सक्सेस
स्टोरीज, स्टॅटिस्टिक्स अँड डेटा सायन्स इन प्रॅक्टीस, अॅडव्हान्सेस इन
स्टॅटिस्टिक्स, अॅडव्हान्सेस इन ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स, डेमोग्राफी, हेल्थ अँड
पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक्स, ऑपरेशन्स रिसर्च, रिलाएबिलिटी थिअरी अँड सर्व्हायव्हल अॅनालिसीस,
स्टॅटिस्टिकल प्रोसेस कन्ट्रोल, इंडियन स्टॅटिस्टिकल सिस्टीम अँड इट्स
इव्हॉल्व्हिंग रोल इन ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी, स्टॅटिस्टिकल मेथड्स अँड अॅप्लीकेशन्स,
स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग अँड प्रोसेस कन्ट्रोल, डिस्ट्रीब्युशन थिअरी अँड इन्फरन्स,
रिग्रेशन मॉडेलिंग, स्टॅटिस्टिकल इन्फरन्स: टेस्टींग ऑफ
हायपोथेसिस, डिस्ट्रीब्युशन थिअरी अँड अप्लाईड स्टॅटिस्टिक्स इत्यादी विषयांवर या
तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या विविध सत्रांमध्ये अत्यंत तपशीलवार चर्चा
करण्यात आली. यामध्ये नामवंत तज्ज्ञांसह संख्याशास्त्राचे संशोधक, अभ्यासक,
विद्यार्थी यांनीही सहभाग नोंदविला.
दरम्यान, काल (२० जून) सायंकाळच्या सत्रात
देशविदेशांतील पाहुण्यांसाठी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने विशेष
सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. विद्यापीठाच्या संख्याशास्त्र
अधिविभागाचे प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ.
सोमनाथ पवार यांनी आभार मानले.



No comments:
Post a Comment