Thursday 28 March 2024

अधिविभागांमधील संशोधकीय साहचर्य वृद्धिंगत व्हावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 

शिवाजी विद्यापीठातील विविध पेटंटप्राप्त, संशोधन प्रकल्पप्राप्त तसेच आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित संशोधकांच्या गौरव प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि डॉ. सागर डेळेकर.


कोल्हापूर, दि. २८ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांमध्ये निर्माण होत असलेले संशोधकीय साहचर्य व देवाणघेवाण वृद्धिंगत होत राहावे, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि लिंकेजेसच्या वतीने आज विद्यापीठातील पेटंटप्राप्त तसेच प्रकल्प अनुदानप्राप्त आणि आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित झालेल्या संशोधकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन आणि इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधीपासूनच विद्यापीठातील विविध अधिविभागांतील संशोधकांमध्ये संशोधन सहकार्य सुरू झाले. विशेष म्हणजे विज्ञान शाखांमध्ये अंतर्गत सहकार्यवृद्धीबरोबरच सामाजिक विज्ञान शाखांशीही सहकार्य सुरू झाले. आज अशा प्रकारच्या आंतरविभागीय, आंतरविद्याशाखीय संशोधन प्रकल्पांमध्ये वृद्धी होण्याची मोठी आवश्यकता आहे. त्याचबरोबर भावी पिढीमध्ये उच्चशिक्षणाविषयी ओढ जागृत व्हावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांनाही आतापासूनच विद्यापीठाशी जोडणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, विद्यापीठातील संशोधकांनी विषयांतर्गत तसेच आंतरविद्याशाखीय संशोधनात घेतलेली आघाडी कौतुकास्पद आहे. ती अबाधित राखण्यासाठी संशोधनात सातत्य ठेवा. आता पेटंटच्या पुढचा विचार करताना त्याचे तंत्रज्ञानात अथवा वाणिज्यिक उपयोजनात रुपांतर करता येऊ शकेल का, या दृष्टीने विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी डॉ. महाजन यांनी कुलगुरू व प्र-कुलगुरू हे दोघेही संशोधनकार्य करणाऱ्यांना सातत्याने उभारी देण्याचे काम करतात आणि त्यांचे मार्गदर्शन उत्तम नेतृत्वाचे उदाहरण असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. राहुल माने, डॉ. के.डी. कुचे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. एम.के. भानारकर, डॉ. पद्मा दांडगे, डॉ. संतोष सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते डॉ. राहुल माने, डॉ. किशोर खोत, डॉ. मुरलीधर भानारकर, डॉ. संतोष शिंदे, डॉ. कबीर खराडे, प्रमोद कोयले (सर्व पेटंटधारक), डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ. एस.ए. संकपाळ, डॉ. के.डी. कुचे (सर्व विविध संशोधन प्रकल्पधारक), डॉ. सुनील गायकवाड, अक्षय खांडेकर, डॉ. डोंगळे, डॉ. संतोष सुतार, डॉ. क्रांतीवीर मोरे आणि डॉ. पद्मा दांडगे (आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित शोधनिबंधांचे लेखक) यांचा ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. डॉ. डेळेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आणि आभार मानले.

गायत्री गोखलेला पेटंटदूत पत्र प्रदान

 विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाची बी.टे. तृतीय वर्षात शिकणारी पेटंटधारक विद्यार्थिनी गायत्री गोखले हिला विद्यापीठाची पेटंट सदिच्छादूत बनवावे, अशी सूचना कुलगुरू डॉ. शिर्के यांनी गेल्या बैठकीमध्ये केली होती. त्यानुसार तिला आज कुलगुरूंच्या हस्ते पेटंटदूत म्हणून पत्र प्रदान करण्यात आले. विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी तिने संवाद साधून त्यांना संशोधनासाठी प्रेरित करावे, अशी अपेक्षा कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केली.

 

शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या जडणघडणीत

डॉ. प्रतिभा पाटणकर यांचे योगदान मोलाचे: डॉ. महाजन

शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातर्फे डॉ. प्रतिभा पाटणकर यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. पाटणकर यांना मानपत्र प्रदान करून गौरव करताना अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन. सोबत (डावीकडून) डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. एस.बी. पाटणकर, डॉ. चेतना सोनकांबळे व डॉ. रुपाली संकपाळ.


 

कोल्हापूर,२८ मार्च: डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. पाटणकर येत्या ३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने अधिविभागाच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आज आयोजित करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते.

डॉ. महाजन म्हणाले, डॉ. पाटणकर यांनी शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचे विद्यार्थी विविध महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांत शिक्षण म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने गुरु घडविणाऱ्या गुरु आहेत. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी केलेले कार्य अशा व्यक्तिमत्त्वामुळे सार्थ झालेले दिसते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

डॉ. पाटणकर सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, अधिविभाग हे माझे जणू दुसरे घरच बनले होते, इतकी मी त्याच्याशी एकरुप झाले. विद्यार्थ्यांनी अध्ययन आणि संशोधन या दोन गोष्टी सातत्याने करण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अधिविभागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी डॉ. पाटणकर यांच्या योगदानाविषयी मनोगते व्यक्त केली. यामध्ये डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. एम.के. भानारकर, डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. विद्यानंद खंडागळे, सुहाना नायकवडी, प्राची पाटील, अतुल जाधव, स्मिता पाटील, सरस्वती कांबळे, आरती पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमास अॅड. डॉ. एस.बी. पाटणकर यांच्यासह त्यांचे कुटुंबिय, डॉ. निलिमा सप्रे, डॉ. के.बी. पाटील प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. प्रतिभा पाटणकर यांच्या जीवनावरील तीन मिनिटांची ध्वनी-चित्रफित दाखविण्यात आली. डॉ. महाजन यांच्या हस्ते डॉ. प्रतिभा पाटणकर यांचा मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. डॉ. सोनकांबळे यांनी मानपत्राचे वाचन केले. शिस्त, निष्ठा आणि समर्पण ही जीवनाची त्रिसूत्री असणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. प्रतिभा पाटणकर असा गौरव मानपत्रात करण्यात आला. डॉ. खंडागळे यांनी आभार मानले.


शिवाजी विद्यापीठाच्या ऊर्जा साठवणूकविषयक उपकरणाच्या संशोधनास दोन पेटंट

 डॉ. सागर डेळेकर, स्वप्नजीत मुळीक यांचे संशोधन

 

डॉ. सागर डेळेकर


स्वप्नजीत मुळीक





कोल्हापूर, दि. २८ मार्च: नॅनो संमिश्रांवर आधारित ऊर्जा साठवणूकविषयक उपकरण निर्मितीच्या महत्त्वपूर्ण संशोधनास जर्मन आणि भारतीय अशी दोन पेटंट नुकतीच प्राप्त झाली आहेत. विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. सागर डेळेकर आणि स्वप्नजीत मुळीक यांनी या संदर्भातील संशोधन केले आहे.

नॅनो संमिश्रांवर आधारित मटेरियलपासून तयार केलेल्या कॅथोडद्वारे सुपर कॅपॅसिटरची क्षमता वाढवण्यासाठीचे हे संशोधन आहे. सुपरकॅपॅसिटरच्या उपकरणासाठी निकेल कोबाल्टाइट, कोबाल्ट ऑक्साईड आणि पोरस कार्बनचा वापर करण्यात आला आहे. या नॅनो संमिश्रामुळे सदर उपकरणाची कार्यक्षमता विकसित होणार असून या संशोधनाद्वारे ऊर्जा क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडून येईल. जगाची वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे ऊर्जेवरील वाढता ताण लक्षात घेता हे संशोधन ऊर्जा क्षेत्राला नवीन दिशा देणारे ठरेल.

हे उपकरण स्वच्छ, कमी र्चि स्वरूपाचे असून पारंपरिक ऊर्जेच्या वापराऐवजी हे नवीन उपकरण ऊर्जा संवर्धनासाठी नक्कीच प्रभावशाली ठरणार आहे. सदर संशोधनाचा लाभ ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संशोधकांसह समाजातील ऊर्जेच्या समस्यांवर उपाय म्हणूनही होणार आहे. या संशोधनामुळे तयार करण्यात येणारी उपकरणे ही सध्याच्या ऊर्जेची गरज लक्षात घेता ऊर्जा क्षेत्रासाठी अनमोल देणगी देणारी ठरतील, असा विश्वास डॉ. डेळेकर यांनी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल डॉ. सागर डेळेकर स्वप्नजीत मुळीक यांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Tuesday 26 March 2024

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांकडून पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध

 आंतरराष्ट्रीय आघाडीच्या झूटॅक्साशोधपत्रिकेकडून दखल; विशेषांक प्रकाशित

Cnemaspis barkiensis (निमास्पिस बर्कीएन्सिस)

Cnemaspis chandoliensis (निमास्पिस चांदोलीएन्सिस)

Cnemaspis maharashtraensis (निमास्पिस महाराष्ट्राएन्सिस)

Cnemaspis sahyadriensis (निमास्पिस सह्याद्रीएन्सिस)


कोल्हापूर, दि. २६ मार्च: महाराष्ट्रातील वायव्येकडील घाटामधून निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध लावण्यात शिवाजी विद्यापीठ आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनमध्ये कार्यरत संशोधकांना यश आलेले आहे. सदर संशोधनाची दखल प्राणीशास्त्राच्या क्षेत्रातील आघाडीच्या झूटॅक्सा या शोधपत्रिकेकडून घेण्यात आली असून ऑकलंड (न्यूझीलंड) येथील या शोधपत्रिकेने केवळ या संशोधनाला वाहिलेला ११४ पृष्ठांचा विशेषांक आज (दि. २६) प्रकाशित केला आहे. हा शिवाजी विद्यापीठासह महाराष्ट्रातील युवा संशोधकांचा एक प्रकारे बहुमानच आहे.

सदरचे संशोधन अक्षय खांडेकर या विद्यार्थ्याच्या शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र अधिविभागांतर्गत सुरु असलेल्या पीएचडी संशोधनाचा भाग आहे. डॉ. सुनील गायकवाड त्याचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या बरोबर या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे, सत्पाल गंगलमाले आणि डॉ. ईशान अगरवाल यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे. या पाच संशोधकांनी मिळून अ प्रिलिमिनरी टॅक्सॉनॉमिक रिव्हिजन ऑफ दि गिरी क्लेड ऑफ साऊथ एशियन निमास्पिस स्ट्रॉऊच, १८८७ (स्क्वामाटा: गेक्कोनीडे) विथ दि डिस्क्रिप्शन ऑफ फोर न्यू स्पेसीज फ्रॉम साऊथ महाराष्ट्र, इंडिया’ (A preliminary taxonomic revision of the girii clade of South Asian Cnemaspis Strauch, 1887 (Squamata: Gekkonidae) with the description of four new species from southern Maharashtra, India) हा ११४ पानांचा प्रदीर्घ शोधनिबंध सादर केला. या संशोधनाला वाहिलेला स्वतंत्र विशेषांक झूटॅक्सा शोधपत्रिकेने आज प्रकाशित केला. त्यास स्वतंत्र आयएसबीएन क्रमांकही प्रदान करण्यात आला आहे. या संशोधनामध्ये निमास्पिस गिरी गटातील इतर नऊ प्रजातींचे नव्याने वर्णन करून जुन्या शोधनिबंधांमधील विसंगतीही दूर करण्यात आल्या आहेत.

या संदर्भात डॉ. गायकवाड व खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने शोध लागलेल्या पालींच्या वैशिष्ट्यपूर्ण गोल बुबुळांवरुन त्यांचा समावेश निमास्पिस या कुळात केलेला आहे. या सर्व प्रजातींचे नामकरण त्या त्या आढळक्षेत्रावरुन करण्यात आले आहे. 'निमास्पिस बर्कीएन्सिस' या प्रजातीचा शोध कोल्हापूरमधील बर्की (शाहूवाडी), वाशी (पन्हाळा) आणि तळये बुद्रुक (गगनबावडा) या ठिकाणी लागला आहे. बर्की राखीव वनक्षेत्रामधील आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण 'निमास्पिस बर्कीएन्सिस' असे करण्यात आले. 'निमास्पिस चांदोलीएन्सिस' ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील चांदेल रेंजमध्ये आढळून आली. चांदोली निमास्पिस महाराष्ट्राएन्सिस ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील रुंदीव रेंजमध्ये आढळली, तर निमास्पिस सह्याद्रीएन्सिस ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या वेत्ती रेंजमध्ये आढळली.

डॉ. सुनील गायकवाड यांनी सांगितले की, निमास्पिस कुळातील पाली त्यांच्या प्रदेशनिष्ठतेसाठी ओळखल्या जातात. त्यांचे आढळक्षेत्र छोट्या भूप्रदेशावर विस्तारलेले असते. थंडाव्याच्या जागांशिवाय त्या तग धरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे आढळक्षेत्र मर्यादित अनुकूल जागांपुरतेच सीमित असते. सदरच्या संशोधन मोहीमांमध्ये नव्याने शोधलेल्या पाली त्यांचे आढळक्षेत्र सोडून अन्यत्र कुठेही आढळल्या नाहीत. शिवाय चांदोली राष्ट्रीय उद्यानामधून शोधलेल्या तीन प्रजाती एकमेकांपासून केवळ ८ ते १२ किलोमीटर अंतरावर आढळल्या. गर्द झाडीच्या जंगलांच्या मध्ये पसरलेल्या उघड्या माळसदृश्य सड्यांनी या प्रजातींचा वावर सीमित केला असावा. अशी टोकाची प्रदेशनिष्ठता हे निमास्पिस कुळातील पालींचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच या पालींचे आढळक्षेत्र असणारी जंगले संवर्धनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची ठरतात. या संशोधनामध्ये महाराष्ट्र वन विभागाने आवश्यक ते परवाने देऊन सहकार्य केले. तसेच, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील (चांदोली राष्ट्रीय उद्यान) वन अधिकारी आणि कर्मचार्‍यांचीही सर्वेक्षणादरम्यान मोलाची मदत झाली.

अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका

मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलच्या रांगांची संख्या, शेपटीच्या खालच्या बाजूला असणार्‍या खवल्यांच्या रचना आणि विशिष्ट जनुकीय संचांवरुन या पाली एकमेकांपासून आणि कुळातील इतरांपासून वेगळ्या प्रजातीच्या आहेत, हे स्पष्ट करण्यात यश आले. या चारही पाली दिनचर आहेत. झाडांचे बुंधे आणि दगडांच्या आडोशाने त्या वावरतात. छोटे किटक त्यांचे प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे या पाली अन्नसाखळीत समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

निमास्पिस गिरी गटाच्या वैशिष्ट्यांची नव्याने मांडणी

संशोधक अक्षय खांडेकर यांनी सांगितले की, यापूर्वी झालेल्या संशोधनांमधून निमास्पिस गिरी गटात महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातून एकूण दहा प्रजाती नोंदवलेल्या होत्या. यापैकी बहुतांश प्रजातींच्या वर्गीकरणामधील विसंगती आणि चुकांमुळे निमास्पिस गिरी गटातील पालींवर नव्याने अभ्यास करणे आव्हानात्मक बनले होते. वेगवेगळ्या प्रजातींमधील बाह्य वैशिष्ट्ये नोंदवण्यासाठी यापूर्वीच्या संशोधकांनी निवडलेल्या अनेक पद्धतींमध्ये सुसूत्रता नसल्याचे आढळून आले. जनुकीय संचामधील वेगळेपणाच्या पुष्टीनंतर संशोधकांकडून बाह्य वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष होणे, ही चिंतेची बाब आहे. या विसंगती दूर करण्यासाठी, सदरच्या संशोधनांतर्गत जुने नमुने तपासण्यात आले; तसेच पूर्वीपासून ज्ञात असलेल्या प्रजातींच्या आढळक्षेत्रामधून नव्याने नमुने गोळा करुन त्यांच्यात स्थिर राहणारी बाह्य वैशिष्ट्ये नव्याने मांडण्यात आली, हे या संशोधनाचे महत्त्वाचे वेगळेपण ठरले. याची दखल झूटॅक्सासारख्या प्रतिष्ठित जर्नलने घेतली, याचा आनंद मोठा आहे.


Tuesday 19 March 2024

विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतिगृहासाठी

विलो मॅथर कंपनीकडून १३ लाखांचा निधी

 

शिवाजी विद्यापीठाच्या प्रस्तावित लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे  मदतनिधी सुपूर्द करताना विलो मॅथर अँड प्लॅट कंपनीचे अध्यक्ष हेमंत वाटवे. सोबत प्र-कुलुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह विद्यापीठाचे व कंपनीचे अधिकारी, पदाधिकारी.

(सदर कार्यक्रमाची लघु-चित्रफीत)


कोल्हापूर, दि. १९ मार्च: लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहामुळे दात्यांच्या कृतज्ञ स्मृती खऱ्या अर्थाने विद्यार्थिनींसमवेत आयुष्यभर राहतील, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

मूळ जर्मन असलेल्या पुणेस्थित विलो मॅथर अँड प्लॅट पंप प्रा. लि. या कंपनीमार्फत शिवाजी विद्यापीठाच्या प्रस्तावित लोकस्मृती वसतिगृहासाठी १३ लाख २१ हजार १७१ रुपये इतका निधी आज कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, जलसमृद्धी आणि शुद्ध जलपुरवठ्यासाठी कार्यरत विलो मॅथर कंपनीसोबत शिवाजी विद्यापीठाचे जुने ऋणानुबंध आहेत. कंपनीने विद्यापीठाला जल शुद्धीकरण यंत्रांचा पुरवठा केलेला आहे. आता लोकस्मृती वसतिगृहाला दिलेल्या देणगीतून हे बंध अधिक दृढ झाले आहेत. मात्र, ते आता दुतर्फा निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी कंपनीला आवश्यकता भासल्यास विद्यापीठ ज्ञानाची देणगी देण्यास सदैव तत्पर असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक हेमंत वाटवे म्हणाले, शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत संकल्पनांचा विकास करण्याच्या बाबतीत विलो मॅथर कंपनी बांधील आहे. तदअनुषंगिक धोरणे आणि उत्पादने यासाठी आम्ही कार्यरत आहोत. निर्मिती-संगोपन आणि त्यानंतर समाजाशी तिची सांधेजोड या त्रयीवर आधारित कार्यप्रणाली आम्ही विकसित केली आहे. त्यामुळेच आमची संकल्पना अधिक यशस्वी होत जाते. यातूनच सांडपाण्यावर प्रक्रिया करून पूर्णतः दुर्गंधीमुक्त आणि जवळपास पिण्यायोग्य पाणीनिर्मितीचे तंत्रज्ञान आम्ही विकसित करू शकलो आहोत. या क्षेत्रामध्ये विद्यापीठासमवेत काम करायला निश्चित आनंद वाटेल, असे त्यांनी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या श्री. वाटवे यांनी लोकस्मृती वसतिगृहासाठी मदतनिधीचा धनादेश कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी विद्यापीठातील विविध उपक्रमांची माहिती दिली. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

यावेळी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सार डेळेकर, उपकुलसचिव रणजीत यादव यांच्यासह विलो मॅथर अंड प्लॅट पंप कंपनीचे उपाध्यक्ष (फायनान्स व कंन्ट्रोलिंग) श्रीकांत शिरोडकर, उपाध्यक्ष (मनुष्यबळ विकास) नितीन असाळकर, प्रकल्प विक्री प्रमुख सुधीर जोशी, सहयोगी उपाध्यक्ष (आंतरराष्ट्रीय विक्री) मनोज बाफना, वितरण प्रमुख अनिल केसवानी, विभागीय व्यवस्थापक संजीव कुमार, उपप्रमुख विजयानंद सोनटक्के, मनुष्यबळ व्यवस्थापक संदीप सावंत आदी उपस्थित होते.

लोकस्मृती वसतिगृह संकल्पनेविषयी...

शिवाजी विद्यापीठाने लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृह हा सुमारे शंभर विद्यार्थिनींच्या निवास व्यवस्थेसाठीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. हे वसतिगृह लोकांच्या सहभागातून उभारावे आणि त्यातून लोकांच्या स्मृती जतन केल्या जाव्यात, अशा हेतूने विद्यापीठाने या वसतिगृहाची संकल्पना मांडली. लोकांनी आपले कुटुंब, आप्तस्वकीय यांमधील प्रिय व्यक्तीच्या नावे ठराविक निधी विद्यापीठाकडे द्यावयाचा आणि त्या व्यक्तीच्या नावे निवासी खोल्यांची उभारणी करावयाची, अशी ही संकल्पना आहे.

आंतरराष्ट्रीय ‘अन्वेषण’ संशोधन स्पर्धेत

विद्यापीठाचा सुरजित अडगळे द्वितिय

 पर्यावरणपूरक प्लास्टीक निर्मितीचे संशोधन



आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेतील द्वितिय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना सुरजित अडगळे. सोबत डॉ. सिद्धेश्वर जाधव व राहुल जाधव

 

कोल्हापूर, दि. १९ मार्च: आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा संशोधक सुरजित अडगळे याच्या सिंथेसाइझिंग बायोप्लास्टीक अँड वेगन लेदरया संशोधनास मूलभूत विज्ञान प्रकारामध्ये द्वितिय क्रमांक प्राप्त झाला. मुंबई विद्यापीठात नुकत्याच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धा पार पडल्या.

सुरजित अडगळे याने निवडुंगाच्या गरापासून जैविक प्लास्टीक आणि चामडे यशस्वीपणे बनवून या प्रकल्पाचे स्पर्धेत सादरीकरण केले. त्याच्या या प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले.

शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेचे यजमानपद शिवाजी विद्यापीठाने भूषविले. दि. २८ व २९ डिसेंबर, २०२३ या कालावधीत सदर स्पर्धा विद्यापीठात झाली. यात महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील ११ विद्यापीठांचे १०६ संशोधक विद्यार्थी एकूण ६४ प्रकल्पांसह सहभी झाले. शिवाजी विद्यापीठाचा सहा जणाचा संघ होता. या स्पर्धेत सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयाच्या सुरजित घनश्याम अडगळे याला तृतीय क्रमांक मिळाला आणि त्याची पुढील स्पर्धांसाठी निवड झाली. यंदा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धा एकत्रितपणे ११ व १२ मार्च २०२४ रोजी मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय अन्वेषन संशोधन स्पर्धेमध्ये विविध विषयातील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. संशोधक अशा त्रिस्तरीय स्पर्धेत देशातील २८ विद्यापीठांतील एकूण १५७ विद्यार्थी सहभागी झाले. सुरजित अडगळे याच्या प्रकल्पाला मूलभूत विज्ञान गटात द्वितिय क्रमांक मिळाला. त्याला बक्षिसापोटी रु. ५०,०००/- रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी संघ व्यवस्थापक म्हणून राहुल जाधव आणि अन्वेषण समन्वयक म्हणून डॉ. सिध्देश्वर जाधव (दोघेही विलिंग्डन कॉलेज, सांगली) उपस्थित होते.

अडगळे यांच्या यशाबद्दल कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.

Saturday 16 March 2024

स्त्रियांचा मानवतावादी दृष्टीने विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजे: डॉ. मंजुश्री पवार

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानमालेत बोलताना डॉ. मंजुश्री पवार. मंचावर (डावीकडून) डॉ. भारती पाटील व डॉ. अवनीश पाटील


कोल्हापूर, दि. १६ मार्च: स्त्रियांचा मानवतावादी दृष्टीकोनातून विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे मध्ययीन कालखंडातील एकमेवाद्वितिय राजे होते, असे गौरवोद्गार मराठा इतिहास अभ्यासक डॉ. मंजुश्री पवार यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेअंतर्त प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कै. शारदाबाई पवार अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील होत्या.

डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा काळ हा स्त्रियांच्या बाबतीत मानवतावादी दृष्टीकोनातून विचार करण्यासाठीचा आश्वासक काळ होता. मध्ययुगीन जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते, ज्यांनी स्त्रियांना समाजात आदराची व सन्मानाची वागणूक दिली. स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करणारा कोणीही असो, त्याला अतिशय कडक शिक्षा केल्या. सद्यस्थितीत स्त्रियांवरील अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देवून भागणार नाही, तर त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. भारती पाटील म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन नेहमीच समतावादी होता. त्यांच्या समतावादी दृष्टिकोनाचे प्रतिबिंब त्यांनी स्थापित केलेल्या प्रशासनिक राज्यव्यवस्थेमध्ये आढळून येते. औरंगजेबाच्या दरबारातील लेखक खाफीखान यानेही शिवाजी महाराजांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, तत्कालीन राजेशाही व्यवस्थेमध्ये शिवाजी महाराजांपूर्वी आणि त्यांच्या नंतरही अन्य कोणाही राजाने स्त्रियांच्या बाबतीत इतकी आदराची, सन्मानाची भूमिका घेतलेली दिसत नाही. म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराज महान ठरतात. त्यांच्या विचाराचा जागर प्रत्येकाने करायला हवा.

यावेळी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. राजश्री जगताप यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले. व्याख्यानास मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, शिवचरित्रकार डॉ. इस्माईल पठाण यांच्यासह विविध महाविद्यालयांचे व अधिविभागाचे विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Friday 15 March 2024

‘कीटकविश्वाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला’

 शालेय विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया; कीटक प्रदर्शनाचा समारोप

शिवाजी विद्यापीठात आयोजित कीटक प्रदर्शन पाहण्यासाठी अखेरच्या दिवशीही शालेय विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली.


कोल्हापूर, दि. १५ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीटक प्रदर्शनामुळे कीटकविश्वाकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोन बदलून गेला. यापुढे आम्ही कीटकांना, मधमाशांना मारणार नाही, तर त्यांना जगविणार, कारण ते जगले, तरच आपण जगू शकू, अशी भावना आज अखेरच्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय कीटक प्रदर्शनाला दररोज सरासरी पाच हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी भेट दिली. आज अखेरच्या दिवशी तर गर्दीचा उच्चांक गाठला गेला. तरीही अभ्यागत शिक्षक, विद्यार्थ्यांनी अत्यंत चोख शिस्तीचे पालन करून प्रदर्शनाचा लाभ घेतला. तिन्ही दिवसांत मिळून पंधरा हजारांहून अधिक जणांनी प्रदर्शन पाहिले.

प्रदर्शन पाहिल्यानंतर अनेक अभ्यागतांनी याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. सिद्धांत खोत या शालेय विद्यार्थ्याने सांगितले की, या प्रदर्शनामुळे माझा कीटकांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलला. पूर्वी मला त्यांची कीळस वाटायची आणि मी त्यांना मारुन टाकायचो. आता मात्र मी कीटक मारणार नाही. त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी माझी आहे, हे मला समजले.

आर्या हडपल या विद्यार्थिनीने सांगितले की, पर्यावरणामध्ये इतके वैविध्यपूर्ण कीटक, फुलपाखरे आहेत, हे मला पहिल्यांदाच समजले. त्यांच्यामुळेच जीवसृष्टीचे अस्तित्व कायम आहे. जैवसाखळीमधील त्यांचे महत्त्व येथील संशोधकांनी आम्हाला सांगितले. त्यामुळे या कीटकवर्गाची हानी होणार नाही, यासाठी आपण मिळून प्रयत्न करायला हवेत.

संजय डावत इंटरनॅशनल स्लूकचे शिक्षक इंद्रजीत थोरात म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाने या प्रदर्शनाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनाही पर्यावरणविषयक जनजागृतीच्या कार्यात सहभागी करून घेतले, ही बाब राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी अत्यंत सुसंगत आहे. यापुढील काळातही असे विद्यार्थीभिमुख उपक्रम आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्या ताकवले या पालक आपल्या मुलाला प्रदर्शन दाखविण्यासाठी घेऊन आल्या होत्या. त्या म्हणाल्या, या प्रदर्शनामुळे केवळ मुलालाच नाही, तर मलाही अनोख्या कीटकविश्वाची ओळख झाली. कीटक आपल्या पर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना जपायला हवे, याची जाणीव झाल्याचे त्यांनी सांगितले.

विभागाच्या ३५ वर्षांतील संशोधनाचे फलित

शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी गेल्या ३५ वर्षांत वन विभाग आणि जैवविविधता मंडळ यांच्या सौजन्याने संशोधनासाठी विविध कीटक परिसरातील निसर्गसंपदेमधून संकलित केले आहेत. भावी पिढीमध्ये या कीटकांविषयी जाणीवजृती व्हावी म्हणून यामधील विविध प्रजातींच्या २२०० कीटकांचे प्रदर्शन मांडले. यासाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे समन्वयक डॉ. सुनील गायकवाड यांनी सांगितले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या समस्त शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक आणि नागरिकांना त्यांनी धन्यवाद दिले.

परजिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांचीही भेट

या प्रदर्शनाला कोल्हापूर शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्याच. त्याबरोबरच हेर्ले, उजळाईवाडी, तामगांव, दुधाळ, पेठ वडगांव, इचलकरंजी, गडहिंग्लज, कुंभोज, शिरोळ, निपाणी, चंदगड, जत, सांगली या ठिकाणच्या शाळा-महाविद्यालयांनीही भेटी दिल्या.