Friday, 15 March 2024

डॉ. उत्तम सकट यांच्या सामाजिक कार्याचा विद्यापीठाला अभिमान: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 

शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. उत्तम सकट यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशासनातर्फे त्यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह अधिकारी


 

कोल्हापूर, दि. १५ मार्च: प्रामाणिक आणि जबाबदारीने काम करणारे विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. उत्तम सकट यांच्या सामाजिक कार्याचा विद्यापीठाला अभिमान आहे, असे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काढले.

डॉ.सकट यांना महाराष्ट्र शासनाचा २०२२-२३ साठीचा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापन सभागृहामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. सकट यांनी विद्यापीठाचे लोकविकास केंद्र, वाहन विभाग तसेच लेखा विभागामध्ये प्रामाणिकपणे काम केलेले आहे. कार्यालयीन कामाबरोबरच सामाजिक जाणीव ठेवून पीएच.डी. संशोधन प्रबंधाचा पुढे समाजासाठी उपयोग होणे आणि त्याची दखल शासन पातळीवर घेतली जाणे, हे विद्यापीठासाठी निश्चितच भूषणावह आहे.      

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, उपकुलसचिव डॉ. संजय कुबल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, कायदा अधिकारी अनुष्का कदम, उपकुलसचिव डॉ.वैभव ढेरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment