Tuesday, 5 March 2024

संशोधक विद्यार्थिनीकडून विद्यापीठास ४० दुर्मिळ नाणी भेट

 

शिवाजी विद्यापीठासाठी दुर्मिळ नाण्यांचा संग्रह कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना अफसाना मणेरी. सोबत (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रतिभा पाटणकर, नईम शेख, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. श्रीकांत भोसले.

कोल्हापूर, दि. ५ मार्: शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थिनी अफसाना हरूण मणेरी यांनी त्यांच्या संशोधनांतर्गत प्राप्त केलेल्या ४० दुर्मिळ नाण्यांचा संग्रह नुकताच विद्यापीठाकडे सुपूर्द केला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी तो स्वीकारला.

शिवाजी विद्यापीठाचे संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी आपल्या संशोधनाद्वारे बौद्धिक संपदेची भर विद्यापीठाच्या ज्ञानसंग्रहामध्ये घालत असतात. पण, त्यापलिकडेही अन्य काही संदर्भसाधने, वस्तू यांचीही भर विद्यापीठाच्या संग्रहामध्ये घालत असतात. त्यामधील ही एक अतिशय मोलाची देणगी आहे, असे उद्गार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी या प्रसंगी काढले आणि मणेरी यांच्या उदार देणगीचे स्वागत केले.

श्रीमती अफसाना हरूण मणेरी यांनी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातून डॉ. प्रतिभा पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डेव्हलपमेंट ऑफ न्यूमिस्मॅटिक्स ई-कन्टेंन्ट मोड्यूल फॉर सेकंडरी टू पोस्ट-ग्रॅज्युएट लेव्हल या विषयावर पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केले आहे. नाणकशास्त्र हा विषय शिकविण्यासाठी मणेरी यांनी ई-कन्टेंन्ट मोड्यूल विकसित केले आहेत. हे संशोधन करीत असतानाच त्यांना वेगवेगळ्या कालखंडातील दुर्मिळ ४० नाणी प्राप्त झाली. ती त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संग्रहालयासाठी भेट दिली. मध्ययुगीन कालखंडातील गोल, चौकोनी आकारातील बहुतांश तांब्याच्या नाण्यांचा यात समावेश आहे. पर्शियन (फारसी) लिपीतील मजकूर त्यांवर आहे. १.६ ते १६ ग्रॅमपर्यंतच्या वजनाची ही नाणी आहेत.

मणेरी यांनी दिलेल्या नाण्यांमध्ये पुढील सल्तनतींच्या कालखंडातील नाण्यांचा समावेश आहे. बहामनी (सन १३४७-१५२८)- १३ नाणी, मुघल काळ (१२३५-१५१७)- ९ नाणी, आदिलशाही (१५५८-१६७२)- ५ नाणी, निजामशाही (१५५६-१६३१)- ४ नाणी, गोवळकोंडा (१६२६-१६८७), गुजरात सुल्तान (१४११-१५३७), मालवा सुल्तान (१४३६-१५५७)- प्रत्येकी २ नाणी, बिदरशाही (१५०४-१५४२), खान्देश सुल्तान (१५९७-१६०१) आणि जौनपुर सुल्तान (१४४०-१४५६)- प्रत्येकी १ नाणे.

मणेरी यांनी दिलेला हा संग्रह कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या म्युझियम कॉम्प्लेक्सचे समन्वयक डॉ. श्रीकांत भोसले यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द केला. यावेळी नाणे अभ्यासक व संग्राहक नईम शेख यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिभा पाटणकर, डॉ. श्रीकांत भोसले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment