Saturday 29 April 2023

व्यवस्थापनाचे ‘मास्टरपीस’ बना: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

एमबीए अधिविभागाच्या सिंहावलोकन उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागातर्फे आयोजित सिंहावलोकन उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. समोर विविध महाविद्यालयांतून आलेले व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी व शिक्षक.

शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागातर्फे आयोजित सिंहावलोकन उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात (डावीकडून) डॉ. प्रकाश राऊत, डॉ. आण्णासाहेब गुरव, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व डॉ. दीपा इंगवले.

शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागातर्फे आयोजित सिंहावलोकन उपक्रमामध्ये निपाणी येथील केएलई जी.आय. बागेवाडी कॉलेजचा चमू सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला.

 

कोल्हापूर, दि. २९ एप्रिल: विद्यापीठीय शिक्षण घेऊन आपण व्यवस्थापनशास्त्राचे मास्टर तर बनालच, पण या शिक्षणापलिकडे इतरांपेक्षा काही अधिक कलाकौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी मास्टरपीस बनावे. त्या दृष्टीने त्यांना तयार करणारा सिंहावलोकन हा उपक्रम आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी काल (दि. २८) येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या एम.बी.ए. अधिविभागाच्या वतीने आयोजित ''सिंहावलोकन २०२३'' या एकदिवसीय व्यवस्थापन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या उपक्रमांत अधिविभागासह विविध १६ महाविद्यालयांतील ४५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत, विभागाचे संचालक डॉ. आण्णासाहेब गुरव आणि डॉ. दीपा इंगवले उपस्थित होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन कलाकौशल्ये अवगत करणे गरजेचे आहे. जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी असेल तरच जीवनात यशस्वी होता येते. सिंहावलोकन या व्यवस्थापन कार्यक्रमातील बिझनेस प्लॅन, बिझनेस क्विझ, ॲड सम्राट, ॲड मॅड शो, रायझिंग बुल्स आदी स्पर्धांमुळे स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिचा त्यांनी लाभ करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. व्यवस्थापकीय कार्यक्रमांमुळे विविध प्रकारची तर्क-कौशल्ये व समस्या सोडवणूक कौशल्ये प्रभावीपणे वापरता येतात. त्याद्वारे आपली बलस्थाने, दुर्बलस्थाने यांच्या अनुषंगाने विश्लेषणही करता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. प्रकाश राऊत यांनी संशोधनाच्या बळावरच देशाचा आर्थिक, सामाजिक विकास अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांनी संशोधन कौशल्ये विकसित करणे व जोपासणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी एम. बी. ए. विभागाचे संचालक डॉ. आण्णासाहेब गुरव यांनी प्रास्ताविक केले आणि डॉ. दीपा इंगवले यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. रामदास बोलके, डॉ. तेजश्री घोडके, जयश्री लोखंडे व दिपाली पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनास भारत डेअरी (स्फुर्ती) चे संचालक धवल मेहता, हर्षद भोसले (फॅशन टॅग, राजारामपुरी), शुभम उडाळे (फोटोग्राफी), सीए ए. एस. पाटील, पेटीएम वेल्थ सेंटर, धनश्री पब्लीकेशन, ॲड ऑन मल्टिसर्व्हीसेस, गेट ॲक्टीव्ह डिझाइनिंग आदींचे सहकार्य लाभले.

सिंहावलोकन उपक्रमांतर्गत झालेल्या विविध स्पर्धा व विजेते यांची माहिती पुढीलप्रमाणे-

सिंहावलोकन उपक्रमाचे सर्वसाधारण विजेतेपद निपाणी येथील केएलई संस्थेच्या जी.आय. बागेवाडी कॉलेजच्या बीबीएच्या चमूने पटकावले. त्यांनी स्पर्धेतील रु. ११,१११/- चे पारितोषिक पटकावले.

Ø  बिझनेस क्वीझ- द आयक्यू वॉर:

या स्पर्धेत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात सहभागी विद्यार्थ्याची व्यवसायिक ज्ञान व कौशल्ये यांची चाचणी घेण्यात आली. बिझनेस क्विझच्या तीन फेऱ्यांतून विजेत्यांची निवड करण्यात आली.

विजेते असे- रनरअप- श्रध्दा शिंदे व कावेरी सावंत आणि विनरअप- रिशी झा व सोहम करंबळेकर, केएलई सोसायटी बीबीए कॉलेज, निपाणी.

Ø  चातुर्य बिझनेस प्लॅन:

या स्पर्धेत ८ विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये विद्यार्थ्याची तांत्रिक, आर्थिक, विपणन आणि मानव संसाधन पैलूंसह त्यांची नाविन्यपूर्ण व्यवसाय योजना सादर करण्याची क्षमता तपासण्यात आली. विजेते असे- रनरअप- रिषी झा आणि सौरभ बेडकर व विनरअप- सुरज कांबळे, सोहम करंबळेकर केएलई सोसायटी बीबीए कॉलेज निपाणी.

Ø  रायझिंग बुल्स स्टॉक ट्रेडिंग:

या स्पर्धेत ६० विद्यार्थी सहभागी झाले. स्टॉक ट्रेडिंग शेअर मार्केट यांसंदर्भात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा उपयोग आभासी स्टॉक ट्रेडिंगसाठी, व्यवसाय वाढ व वृद्धीसाठी कौशल्य तपासणी करण्यात आली. विजेते रनरअप- विश्वजीत आबदार तसेच विनरअप- आदित्य पाटील  डीवायपी कॉलेज इंजिनिअरींग, कसबा बावडा.

Ø  पोस्टर प्रेझेंटेशन:

स्पर्धेत २० विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर पोस्टर प्रेझेंटेशन केले. यामध्ये विजेते रनरअप- मुस्कान नायकवडी, डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज आणि विनरअप- भावना जनमाने आणि सृष्टी वागडे.

Ø  कार्पोरेट चाणक्य रोल प्ले:

या स्पर्धेत ४ विद्यार्थी गट सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या व्यावसायिक परिस्थितीवर भूमिका मांडली. यातून त्यांच्या उद्योग व्यवसायविषयक ज्ञानाची तपासणी करण्यात आली.  विजेते- रनरअप जयेश पाटील, मित पगारिया यांना तर विनरअप- संयुक्ता कलांत्री, प्रिती वैष्णव, सुझान डिसुझा, डीकेटीई, इचलकरंजी.

Ø  ॲड सम्राट ॲड मॅड शो:

या स्पर्धेत विद्यार्थ्यांची ऑडिओव्हिज्युअल स्वरुपात जाहिरात निर्मितीची सर्जनशीलता तपासण्यात आली. विजेते- रनरअप- श्रेअस नवले, अथर्व पाटील, प्रथमेश ठोंबरे, आदित्य धूमाळ आर आय टी कॉलेज इस्लामपूर व विनरअप- स्नेहल चौगुले सायली सरदेसाई, पूजा घाटगे, प्रतिक्षा गायकवाड, ऋतुजा कुंभार, डीकेटीई इचलकरंजी.

Ø  ट्रेझर हंट:

यात ६० विद्यार्थी सहभागी झाले. यात एजीपीएम अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विनरअप ठरले.


Friday 28 April 2023

इतिहास समजून घेण्यासाठी मोडी लिपी महत्त्वाचे माध्यम: डॉ. वसंत भोसले

 

मोडी लिपी तज्ज्ञ व मार्गदर्शक वसंत सिंघण यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सपत्निक सत्कार करताना डॉ. वसंत भोसले. शेजारी डॉ. रामचंद्र पवार.

कोल्हापूर, दि. २८ एप्रिल: मोडी लिपी हे इतिहास समजून घेण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. या लिपीचे शिक्षण देण्याचा शिवाजी विद्यापीठाचा उपक्रम स्तुत्य असून हा अभ्यासक्रम तीन महिन्यांचा करावा, अशी सूचना ज्येष्ठ संपादक डॉ. वसंत भोसले यांनी आज येथे केली.

शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राच्या मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या सांगता समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार होते.

डॉ. भोसले म्हणाले, इतिहासाकडे आपण खूप संकुचित दृष्टीने पाहतो. इतिहास अभ्यासण्याची आणि जतन करण्याची व्यापक दृष्टी युरोपियन माणसांकडून आपण घ्यायला हवी. मोडी लिपीच्या अभ्यासातून इतिहासाची अनेक भाषिक साधने आपल्याला अभ्यासता येणे शक्य आहे. अनेक ठिकाणी चित्र, शिल्पकलेच्या माध्यमातूनही इतिहास पाहता, शिकता येतो. या सर्व साधनांचा अतिशय गांभिर्यपूर्वक अभ्यास करण्याची आज मोठी गरज आहे. वस्तुनिष्ठ इतिहास सामोरा येण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त अधिकृत व विश्वासार्ह साधनेही उपलब्ध होणे आवश्यक असते. केवळ अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी विद्याशाखांच्या अभ्यासाच्या मागे लागण्यापेक्षा जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या विषयांचा, कला-कौशल्यांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याची नितांत गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी मोडी लिपीचे हजारो विद्यार्थी घडविणारे वसंत सिंघण यांचा केंद्रातर्फे डॉ. भोसले यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. सिंघण यांनी, मोडीतील बारकावे तपासणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांनी मोडीमध्ये आढळणाऱ्या ९ भाषांच्या संदर्भांचा अभ्यास करावा, अशी इच्छा व्यक्त केली. 

यावेळी संचालक डॉ. रामचंद्र पवार अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते, हे मोडी लिपीच्या अभ्यासकांकडे पाहून लक्षात येते. आपला इतिहास कसा लिहावा, याबाबतचे ज्ञान आपण प्राप्त करण्याची गरज आहे. अभ्यासक्रम पूर्ण होत असताना यापुढेही सर्वांनी अभ्यास व संशोधनाच्या बाबतीत एकसंघपणाने कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अमर पाटील व लक्ष्मण तराळ यांनी स्वागत केले. डॉ. आनंद पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर संदीपराव जाधव, श्रद्धा गोंगाणे, सुहेल बोबडे यांनी संयोजन केले. क्षितिजा पाटील यांनी सूत्रसंचालन  केले, तर योगिता खबाले यांनी आभार मानले.

कार्यक्रमाला रवींद्र खैरे, आर. एम. जाधव, निखिल चव्हाण, अमर घाटगे, महेश नायकवडी, सौरभ पोवार यांच्यासह विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday 26 April 2023

सुगंधी वनस्पतींमधील तेलाचे प्रमाण मोजण्याच्या उपकरणास पेटंट

 शिवाजी विद्यापीठातील संशोधकांच्या संशोधनास यश

सुगंधी वनस्पतींमधील तेलाचे प्रमाण मोजण्यासाठी विकसित करण्यात आलेले उपकरण

कुलगुरू डॉ. राजनीश कामत

डॉ. गणेश निगवेकर

डॉ. क्रांतीवीर मोरे

डॉ. मानसिंगराज निंबाळकर

डॉ. तुकाराम डोंगळे


कोल्हापूर, दि. २६ एप्रिल: सुगंधी वनस्पतींमधील तेलाचे प्रमाण मोजण्यासाठी विशेष पोर्टेबल उपकरणाची निर्मिती करण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना यश आले असून या संशोधनास भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे.

शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक व सध्या डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्यासह सहाय्यक प्राध्यापक डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ.गणेश निगवेकर, डॉ. क्रांतिवीर मोरे आणि डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांचा या संशोधन चमूमध्ये समावेश आहे.

सुगंधी वनस्पतींमधील तेल सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी निर्माण केलेल्या उपकरणासाठी हे पेटंट मिळाले आहे. या उपकरणामध्ये तेलाचे प्रमाण मोजण्यासाठी अस्थिर सेंद्रिय संयुगे (Volatile oil compound sensor) सेन्सर वापरला आहे. सेन्सरचे आउटपुट मायक्रो-कंट्रोलरद्वारे दिले जाते, तेव्हा सॅम्पलमधील तेलाचे प्रमाण दर्शविले जाते. हे उपकरण अगदी हाताच्या तळव्यावर मावण्याइतके असून ते सहज हाताळता येते. प्रत्यक्ष चाचणीच्या ठिकाणीही त्यामुळे सहज वापरता येऊ शकते.

सुगंधी वनस्पतींच्या लागवडीमधून होणारा नफा हा त्या वनस्पतीमधील तेलाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. हे तेलाचे प्रमाण वनस्पतीचे वय, हवामान आणि जमिनीची उत्पादनक्षमता आदी घटकांवर अवलंबून असते. योग्य वेळी पिकाची काढणी केली तरच जास्तीत जास्त तेल मिळून शेतकऱ्यांचा नफा वाढू शकतो. परंतु वनस्पतीमध्ये तेल योग्य प्रमाणात तयार झाले आहे की नाही, हे ओळखण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या पद्धती अत्यंत खर्चिक व वेळखाऊ असल्याने तसेच त्या शेतकऱ्यांना उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडून चुकीच्या वेळी पिकाची कापणी केली जाते आणि त्यामुळे त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागते. यामुळेच बरेचसे शेतकरी सुगंधी पिकांच्या लागवडीपासून दूर चाललेले आहेत. मात्र आता शिवाजी विद्यापीठाच्या या अभिनव संशोधनामुळे थेट शेतामध्ये जाऊन या उपकरणाच्या सहाय्याने पिकामध्ये तेलाचे प्रमाण किती आहे, याचा अंदाज बांधता येणे शक्य आहे. हे उपकरण शेतामध्ये कितीही वेळा चाचणीसाठी वापरता येते. यामध्ये थोडा बदल करून इतर वनस्पतींच्या तेलाची चाचणी करता येऊ शकते. किंबहुना विविध वनस्पतींसाठी एकच उपकरण तयार करता येणेही शक्य आहे. भविष्यात याच्या मध्ये कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून या उपकरणाची अचूकता वाढवता येऊ शकते, अशी माहिती डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी दिली आहे.

या संशोधक चमूला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे मार्गदर्शन सहकार्य लाभले.

 सुगंधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक चमूने सुगंधी वनस्पतींमधील तेलाची चाचणी करण्यासाठी विकसित केलेले पोर्टेबल उपकरण हा एक अत्यंत महत्त्वाचा शोध असून सुगंधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या चाचणी शेतकऱ्यांना परवडत नाहीत. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याच्या शेतात जाऊन तेथील वनस्पतीमधील तेलाचे प्रमाण मोजणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्याचे अकाली कापणीमुळे होऊ शकणारे संभाव्य नुकसान टाळले जाईल. अशा समाजोपयोगी संशोधनाबद्दल सर्वच संशोधक अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली आहे.

Saturday 22 April 2023

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज: कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के

 शिवस्पंदन क्रीडा महोत्सवामध्ये तंत्रज्ञान अधिविभाग सर्वसाधारण विजेता

शिवस्पंदन क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण प्रसंगी विविध स्पर्धांत सहभागी होऊन यशस्वी झालेले विद्यापीठाचे विद्यार्थी.


कोल्हापूर, दि.22 एप्रिल - आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा शारीरिक शिक्षण अधिविभागामार्फत विद्यापीठ परिसरातील अधिविभागांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिवस्पंदन क्रीडा महोत्सव 2022-2023च्या सांगता समारंभ पारितोषिक प्रदान समारंभात कुलगुरू डॉ.शिर्के बोलत होते. हा सांगता समारंभ विद्यापीठाच्या कुस्ती मैदानावर (ओपन एअर थेटर) आयोजित करण्यात आला. या स्पर्धेमध्ये तंत्रज्ञान अधिविभाग सर्वसाधारण प्रथम विजेता (131 गुणांसह) आणि रसायनशास्त्र अधिविभाग सर्वसाधारण उपविजेता ठरला. प्राणीशास्त्र अधिविभागाने तृतीय स्थान पटकावले.

कुलगुरू डॉ.शिर्के म्हणाले, शिवस्पंदन क्रीडामहोत्सव 2022-2023 क्रीडा स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरणामध्ये झाल्या. चार दिवसांत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यापीठ परिसरातील अधिविभागांमधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थींनींनी सहभाग घेतला. उन्हाळा असूनही या स्पर्धा विस्मरणीय आणि उत्साहवर्धक ठरल्या. अभ्यासाइतके जीवनात खेळ आणि व्यायाम यांना महत्व दिले पाहिजे. मानसिक विकासाबरोबरच शारीरिक विकास झाला पाहिजे. स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो. खेळामुळे चपळता आणि उत्साह टिकून राहतो. तो अभ्यासाच्या कामी येतो.

विद्यापीठाचे क्रीडा शारीरिक संचालक डॉ.शरद बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन औद्योगिक रसायनशास्त्राचे समन्वयक डॉ. अविराज कुलदीप यांनी केले. 

याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. सागर डेळेकर, डॉ.केशव राजपुरे, डॉ. निलांबरी जगताप, तंत्रज्ञान अधिविभागप्रमुख डॉ. शिवलिंगप्पा सपली, डॉ. सचिन पाटील, डॉ. कैलास सोनवणे यांच्यासह स्पर्धा समन्वयक डॉ. नितीन नाईक, डॉ. दिप्ती कोल्हे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सुनिल कुंभार, डॉ. सिद्धार्थ लोखंडे, डॉ. इब्राहीम मुल्ला, डॉ. एन.आर. कांबळे, डॉ. विक्र नांगरे-पाटील, डॉ.अर्जुन कोकरे, डॉ.पंकज पवार आदी उपस्थित होते.

शिवस्पंदन वार्षिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चा अंतिम निकाल (अनुक्रमे व कंसात अधिविभाग याप्रमाणे) असा:- सर्वसाधारण विजेतेपद: तंत्रज्ञान अधिविभाग, रसायनशास्त्र अधिविभाग, प्राणीशास्त्र अधिविभाग. १०० मीटर धावणे (पुरूष): अर्जुन पवार (पर्यावरणशास्त्र), गणेशानंद रविंद्र भट (औद्योगिक रसायनशास्त्र), करण उमाकांत जाधव (गणित), २०० मीटर धावणे (पुरूष): संकेत पाटील (वाय.सी.एस.आर.डी.), विश्वजीत मधुकर हवालदार (रसायनशास्त्र), ऋषीकेश किशोर पाटील (राज्यशास्त्र), ४०० मीटर धावणे (पुरूष): मयुरेश जयेंद्र हसोलकर (इतिहास), रोहित बंडू शेवाळे (औद्योगिक रसायनशास्त्र), अक्षय महांकाळे (तंत्रज्ञान), गोळाफेक (पुरूष): गजानन विष्णू मोरबाळे (संगणकशास्त्र), सचिन कांबळे (गणित), मनोज लहू संकपाळ (वनस्पतीशास्त्र), लांब उडी (पुरूष): ओम जाधव (तंत्रज्ञान), संतोष नालकर (रसायनशास्त्र), गणेशानंद रविंद्र भट (औद्योगिक रसायनशास्त्र), x१०० मीटर मिश्र रिले: चांगदेव खाडे, दिपाली पाटोळे, गौरव चव्हाण व रचना पाटील (भौतिकशास्त्र), देवयानी सबनीस, आकाश महांकाळे, प्रेरणा घोरपडे व ओम जाधव (तंत्रज्ञान), अनिकेत पाटील, सागरिका लोंढे, आदित्य पाटील व निकिता अवताडे (प्राणीशास्त्र), १०० मीटर धावणे (महिला): सागरिका लोंढे (प्राणीशास्त्र), श्रद्धा पाटील (नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान), शीतल सुतार (समाजशास्त्र), २०० मीटर धावणे (महिला): दीपाली पाटोळे (भौतिकशास्त्र), दीक्षा पाटील (राज्यशास्त्र), लक्ष्मी बंडगर (वनस्पतीशास्त्र), ४०० मीटर धावणे (महिला): प्रेरणा घोडके (तंत्रज्ञान), स्नेहल खामकर (समाजशास्त्र), अंबिका पांढरबळे (पर्यावरणशास्त्र), गोळाफेक (महिला): रविना यादव (इंग्रजी), दीक्षा पाटील (राज्यशास्त्र), अनिता गुलिक (भूगोल), लांब उडी (महिला): देवयानी सबनीस (तंत्रज्ञान), श्रद्धा माने (नॅनोविज्ञान व तंत्रज्ञान), अंकिता भास्कर (पर्यावरणशास्त्र), मॅरेथॉन (पुरूष): मयुरेश हसोलकर (इतिहास), विश्वजीत हवालदार (रसायनशास्त्र), सूरज पाटील (ए.जी.पी.एम.), मॅरेथॉन (महिला): प्रेरणा घोडके (तंत्रज्ञान), निकिता अवताडे (प्राणीशास्त्र), गीता चव्हाण (भौतिकशास्त्र), मॅरेथॉन (शिक्षक): डॉ. एस.डी. डेळेकर (रसायनशास्त्र), डॉ. ए.बी. कोळेकर (तंत्रज्ञान), डॉ. चेतन आवडी (तंत्रज्ञान), मॅरेथॉन (शिक्षिका): डॉ. नीलांबरी जगताप (इतिहास), अनुप्रिया नीलेश तरवाळ (भौतिकशास्त्र), बुद्धीबळ (पुरूष): सोहम खासबारदार (पर्यावरणशास्त्र), जयेश बागूल (तंत्रज्ञान), राहुल लोखंडे (प्राणीशास्त्र), बुद्धीबळ (महिला): प्रतीक्षा गोसावी (तंत्रज्ञान), श्रद्धा साळुंखे (सूक्ष्मजीवशास्त्र), अनुजा माळी (जैव-रसायनशास्त्र), क्रिकेट (पुरूष): तंत्रज्ञान अधिविभाग, सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभाग, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग, क्रिकेट (महिला): सूक्ष्म-जीवशास्त्र अधिविभाग, अर्थशास्त्र अधिविभाग, कबड्डी (पुरूष): तंत्रज्ञान अधिविभाग, पर्यावरणशास्त्र अधिविभाग, गणित अधिविभाग, कबड्डी (महिला): तंत्रज्ञान अधिविभाग, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग, सूक्ष्म-जीवशास्त्र अधिविभाग, रस्सीखेच (पुरूष): तंत्रज्ञान अधिविभाग, रसायनशास्त्र अधिविभाग, संगणकशास्त्र अधिविभाग, रस्सीखेच (महिला): नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान अधिविभाग, इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग, प्राणीशास्त्र अधिविभाग, संचलन: नॅनोविज्ञान व तंत्रज्ञान अधिविभाग, वनस्पतीशास्त्र अधिविभाग, अन्नविज्ञान व तंत्रज्ञान अधिविभाग.