Saturday, 15 April 2023

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचणे शक्य: डॉ. महादेव देशमुख

  

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यशाळेत बोलताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख. मंचावर (डावीकडून) रमेश लिधडे, सिद्धार्थ शिंदे, विवेककुमार सिन्हा, डॉ. तानाजी चौगुले, शीतल उगले व डॉ. प्रकाश गायकवाड.


कोल्हापूर, दि. १५ एप्रिल - राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयकांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचणे शक्य आहे. हा विभाग समाजाशी जोडलेला आहे. त्यामुळे विविध योजना, धोरणे यांचा प्रचार आणि प्रसार उत्तमरित्या करणे शक्य आहे. त्या दृष्टीने समन्वयकांनी कार्यरत राहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित 'सार्वजनिक वित्तिय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळे'च्या उद्घाटन प्रसंगी डॉ. देशमुख अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  यावेळी व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाच्या कक्ष अधिकारी शीतल उगले यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. देशमुख म्हणाले, शिवाजी विद्यापीठ संलग्नित २८६ महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर, समानता आणि गुणवत्ता यावरही भर दिला जात आहे.  एनएसएस, एनसीसी, संरक्षण सेवा क्रेडिट सिस्टीम अंतर्गत घेतले जात आहे.  एनएसएसचे विद्यार्थी नोकरी करणारे न बनता नोकरी निर्माण करणारे बनावेत, अशी अपेक्षा आहे. देशामध्ये तरूणांची संख्या ६५ टक्के आहे.  या तरूणांचे सरासरी आयुर्मान ३२ वर्षे आहे. यांना मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. ती जबाबदारी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे.

शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिध्दार्थ शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यापीठास समाजाशी जोडण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मोठे योगदान आहे.  विद्यार्थी हा प्रगतीशील समाजाचा घटक बनण्यासाठी हा विभाग नेहमी विविध योजना राबवित असतो. त्यांना समाजघटकांनीही योग्य प्रतिसाद देऊन त्या योजना यशस्वीरित्या राबवून शासनाला सहकार्य करावे.

पीएफएमएस योजनेची माहिती देताना स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक विवेककुमार सिन्हा म्हणाले, पीएफएमएस ही एक सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सेवा आणि संगणकीय प्रणाली आहे.  तिच्या सहाय्याने शासनाकडून दिले जाणारे विविध योजनांशी संबंधित अनुदान, सवलती आणि त्या संबंधित प्राप्त होत असलेले इतर आर्थिक लाभ हे कोणाच्याही हस्तक्षेपाविना इंटरनेटच्या माध्यमातून थेट युजरच्या बँक खात्यामध्ये जमा होते. युजरला कुठलीही धावपळ न करता त्याची रक्कम ऑनलाईन पद्धतीने थेट बँक खात्यावर प्राप्त करता यावी, तसेच आपले बँक स्टेटस ऑनलाईन चेक करता यावे, हा पीएफएमएसचा मुख्य हेतू आहे. या पद्धतीमुळे युजर्सचा वेळ वाचतो आणि कामात पारदर्शकता येते.

राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कराड येथील संत गाडगेबाबा महाराज महाविद्यालयाचे अभय पाटील यांनी आभार मानले. यावेळी, लेखा विभागाचे उपकुलसचिव रमेश लिधडे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे दिनेश जाधव यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील समन्वयक आणि कार्यक्रम अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment